श्रीगुरूजींचे सर्वंकष नेतृत्व

- श्री. मिलिंद ओक

भारतीय संसदेच्या कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला संसदेने श्रध्दांजली अर्पण केली, अशा व्यक्ती फारच थोडया असतील. त्यातही श्रध्दांजलीपर नामोल्लेख नव्हे, तर लोकसभा, राज्यसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान, सर्वपक्षीय प्रमुख नेते यांनी आदरांजलीपर भाषणे केली असे तर फारच अपवादात्मक व्यक्तींबाबत झाले असावे. अशा अत्यंत विरळ व्यक्तिमत्वांपैकी एक असलेल्या श्रीगुरूजींच्या जीवनाचे आकलन करणे, त्यातही त्यांच्या नेतृत्वाचा वेध घेणे असा विषय असेल तर स्वाभाविकच या विषयाच्या मर्यादांचा विचार सर्वप्रथम मनात येतो. अशा मर्यादा व्यक्तिगत, परिस्थितीच्या आणि विषयाच्या अशा तीनही आहेत.

विषयाच्या म्हणजे सामाजिक नेतृत्वाच्या आकलनाच्या म्हणून काही मर्यादा असतात. बाळासाहेब देवरसांनी हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अब्राहम लिंकनच्या चरित्राच्या प्रस्तावनेतील अवतरण दिले आहे. सेनाधिकारी, वैज्ञानिक, कलाकार, कवी यांच्या तुलनेत श्रेष्ठ राजनीतीज्ञाच्या महानतेचे मूल्यमापन करताना - (1) त्याचे निश्चित मापदंड नसतात. (2) तो जितका महान असतो व जितके त्याचे कार्य दूरगामी असते, तितक्याच प्रमाणात त्याच्या कार्याच्या परिणामाचा निश्चित निर्देश करणाऱ्या त्याच्या आयुष्यातील घटना दाखविणे कठीण जाते. (3) अशा व्यक्तीची साधने आणि उद्देश यांचे आकलन समकालीनांना होणे कठीण असते. असा त्या अवतरणाचा सर्वसाधारण आशय आहे.

न्यायमूर्ती रानडेंच्या 101व्या जन्मदिनानिमित्त 1943 साली केलेल्या भाषणात सुरूवातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच मुद्याची विस्ताराने व उत्कृष्ट मांडणी केली आहे. सेनापतीच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन एका अर्थाने सोपे आहे. शेळयामेंढयांमध्ये सिंह उठून दिसावा तसा तो माणसांमध्ये दिसतो, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु त्याच्या कार्याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम फारच कमी असतो हे स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, नेपोलियन त्याच्या अनेक विजयांनंतरही त्याला मिळालेल्या फ्रान्सपेक्षा छोटा फ्रान्स मागे ठेवून गेला. सामाजिक नेतृत्वाच्या बाबतीत त्यांनी कार्लाइल इत्यादी विचारवंतांचे संदर्भ देऊन, अंगीकृत कार्याविषयीची खरी कळकळ, समाजाच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याची बुध्दिमत्ता या गोष्टी आवश्यक आहेतच, परंतु अशा उल्लेखनीय व्यक्तींमधूनही थोर माणूस ठरवायचा झाल्यास "A great man must be motivated by the dynamics of a social purpose & must act as the scourge & scavenger of the society. These are the elements which distinguish an eminent individual from a great man & constitute his titledeeds to respect & reverence." अशा वैशिष्टयपूर्ण शब्दांत मांडली गेली आहे. (scourge म्हणजे whip, राष्ट्राला आवश्यक तेथे कठोर शब्दात जागरूक ठेवणारा प्रहरी व scavenge म्हणजे to comb, pick, समाजातून चाळण करून माणसे उचलणारा).

परिस्थितीच्या मर्यादांमध्ये एखाद्या घटनेचे वास्तव आणि त्याविषयी समाजात असलेली प्रतिमा यातील फरक ही फार मोठी मर्यादा असते. संघनेतृत्वाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास प्रतिमा आणि वास्तव यातील फरक हा विचार करायला लावणारा आहे. संघाचे नेतृत्व म्हणजे हुकुमशाही, एकाच्या आज्ञेत बाकी सगळयांनी (स्वत:चे डोके न वापरता) काम करणे अशा प्रतिमा संघाविषयी बाहेर आहेत की काय असे बऱ्याचदा वाटते.

वास्तव संघनेतृत्वाची कार्यपध्दती संघ साहित्यात व बाहेर काय दिसते?

मुळात दंडसत्ता व धनसत्ता म्हणजे काम न केल्यास दंड अथवा काम केल्यास लाभ, हे दोन्ही जिथे नाहीत अशा सामाजिक चळवळींमध्ये माणसे ही मुख्यत: विचाराच्या आधाराने, सहचिंतनाच्या आधाराने, त्यातून विकसित केलेल्या समान कार्यपध्दतीच्या आधाराने, व्यक्तिगत स्नेहाच्या आधाराने एकत्र काम करतात, हे साधे वास्तव प्रथम लक्षात घेतले पाहिजे. सहचिंतनामध्ये मोकळी चर्चा व क्वचित मतभेद हे गृहीतच आहे. संघाच्या अगदी स्थापनेपासूनच याच्या खुणा आपण पाहु शकतो.

संघाचे नाव ठरविण्यासाठी जेव्हा बैठक झाली तेव्हा संघाकरिता अनेक नावे सुचविण्यात आली व त्यावर बराच वादविवाद होऊन तीन नावे मताकरिता सभेपुढे ठेवण्यात आली.

21 जुन 1926 च्या बैठकीत सर्व स्वयंसेवकांना संघाचे ध्येय काय असावे व आपण संघाचे चालक झालो तर घटना व कार्यपध्दती कशी ठेवू हे लिहून डॉक्टरांकडे द्यायला सांगण्यात आले.

1929 साली संघाच्या केवळ 56 शाखा असताना 'अगदी जवळच्या काळात होऊ घातलेल्या अनेक राजकीय व सामाजिक आंदोलनाच्या वावटळीतून संघाचे तारू सुरक्षित कसे हाकावे, संघाचे धोरण कशा प्रकारे ठेवावे....' असा विचार करण्यासाठी सर्व संघचालकांची पूर्ण दोन दिवसांची बैठक झाली.

1939 साली सिंदी येथे सलग 10 दिवस अनेक मुद्यांचा दीर्घकालीन विचार निवडक कार्यकर्त्यांनी केला. 'एवढया वेळेत अनेक विषयांवर कडाक्याची चर्चा होई व त्यात निरनिराळया मंडळींच्या स्वभावानुसार केव्हा केव्हा रागाचा पारा बराच वर चढे!'

डॉक्टरांच्या काळात नागपूर शाखेत कार्यरत असलेल्या व 49 नंतर वेगळया भूमिकेत गेलेल्या प्रा. शिरसीकरांनी 42च्या चळवळीच्या वेळी अशा बैठकीचा उल्लेख "I still remember a stormy meeting in 1942, which lasted for eight to 10 hours....." अशा शब्दांत केला आहे.

प्रथम बंदी उठल्यानंतर नागपूरला प्रदीर्घ बैठका झाल्या आहेत व त्या सर्व चिंतनाचे निष्कर्ष श्रीगुरूजींनी सर्व स्वयंसेवकांपुढे बौध्दिक वर्गातून मांडले आहेत. 'हाल ही में कार्यकर्ताओं की जो प्रदीर्घ बैठके हुई, उसमें इस आघात का स्वरूप बहुत कुछ स्पष्ट हुआ । मूलभूत प्रश्न ये है कि कार्यपध्दति में परिवर्तन आवश्यक है क्या ? अपनी पध्दती सफल हुई है क्या ? परिस्थिती में परिवर्तन हुआ है क्या?''

1949 साली J. A. Curran या व्यक्तीने संघाचे अध्ययन केले. 1979 साली श्री. राजनारायण आणि सहकाऱ्यांनी संघाविरूध्द प्रचार मोहिमेचा भाग म्हणुन ते पुनर्मुद्रित केले यावरून या अध्ययनाचा पोत लक्षात यावा.

या अध्ययनासाठी संघाच्या सर्वोच्च नेत्यापासून ते सामान्य नवीन स्वयंसेवकांपर्यंत सगळयांनी खुल्या दिलाने सहकार्य दिल्याचा त्याने प्रस्तावनेत कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. 'गुप्त कामकाज', 'खुलेपणा नसलेली संघटना' वगैरे त्या वेळच्या विरोधकांच्या आरोपांच्या संदर्भात हा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. संघनेतृत्वाविषयी त्याचे मत काय झाले ? "Golwalkar & his chief aides meet frequently, what may be later announced by Sarsanghchalak is decided upon usually at these meetings. Golwalkar's relations with the K.K.M. may most aptly be compared with a Prime Minister's relations with a cabinet composed of men who deeply respect him but are not "Yes-men."१० (K.K.M. = केंद्रीय कार्यकारी मंडल)

संघाच्या इतिहासात जिल्हा किंवा विभाग (3-4 जिल्हे) प्रचारकांबरोबर झालेल्या प्रदीर्घ बैठका मोजल्या तर 1954 सिंदी, 60 इंदोर, 72 ठाणे, 81 बंगलोर, 97 वृंदावन अशी प्रत्येक दशकात एक दाखवता येते. या सर्व बैठकांमधून ज्या गोष्टी संघाविषयी गृहीत धरल्या जातात अशासुध्दा मुद्यांवर मूलभूत चिंतन झाले. उदा. 'हिंदूंच्या ऐवजी भारतीय शब्दप्रयोग करण्याची सूचना ठाणे बैठकीत काही जणांनी केली.११

असे असताना संघाविषयी वर उल्लेख केलेली प्रतिमा होण्याचे कारण काय? संघाव्यतिरिक्त विचारप्रवाहांचा व चळवळींचा भारतातील इतिहास याला कारणीभूत असावा. चर्चिल व चेम्बर्लेन यांची दुसऱ्या महायुध्दाविषयीची मते टोकाची, भिन्न होती. पक्ष बहुमत काही काळ चेम्बर्लेनच्या बाजूने व नंतर चर्चिलच्या बाजूने होते. त्यामुळे नेतृत्व बदलले, पण दोघेही एकाच पक्षात होते. या पार्श्वभूमीवर भारतातील समाजवादी, कम्युनिस्ट, काँग्रेस या चळवळींची आजची स्थिती काय आहे ? प्रत्येक मतभेदागणिक नवा पक्ष काढणारी समाजवादी पक्षांची मंडळी आज कुठल्या गटात आणि पक्षात आहेत याचा हिशेब लावणे शक्य आहे काय ? डाव्या विचारधारेचे एकटया बंगालमध्येच किती पक्ष आहेत ? काँग्रेसच्या इतिहासातही कार्यकर्त्यांनी निवडून दिलेल्या अध्यक्षाला नेत्यांच्या असहकारामुळे राजीनामा द्यावा लागला अशी दोन तरी ठळक उदाहरणे (1939 सुभाषचंद्र बोस, 1960 राजर्षी टंडन) दिसतातच, शिवाय 1967 नंतर घराण्याशी निष्ठा या मुद्यावर पडलेल्या असंख्य फुटी आहेत. या पार्श्वभूमीवर एकसंध नेतृत्वाचे, सामूहिक निर्णयाचे, एकजुटीचे उदाहरण म्हणजेच हुकुमशाही असे वाटले तर नवल नाही.

हा सगळा विचार इतक्या तपशिलात करण्याची कारणे दोन आहेत. एक असे की, एकेक अखिल भारतीय नवे संघटन उभे करण्याची क्षमता असलेल्या, एकेका प्रांतात काम रूजवण्याची क्षमता असलेल्या अतिशय कर्तृत्ववान कार्यकर्त्यांच्या संचाचे नेतृत्व श्रीगुरूजींनी 33 वर्षे केले यातच त्यांच्या नेतृत्वक्षमतेची एक विलक्षण पावती आहे. परंतु दुसरे आणि त्याहूनही महत्त्वाचे कारण असे की या सगळया कार्यकर्त्यांच्या कामाचा सुसंगत विचार केल्याशिवाय श्रीगुरूजींचे नेतृत्व उलगडणे शक्य नाही.

1950 साली संघ कुठे व कसा होता, अन्य विचारप्रवाह संघाशी कसे वागले आणि 1973 साली संघ कुठे पोहोचला, संघ कार्यकर्ते इतर विचारप्रवाहांच्या नेत्यांशी कसे वागले, एवढया एका व्यावहारिक मुद्याचा विचार केला तरी हे स्पष्ट होईल. महात्मा गांधीहत्येचा, हिंसाचाराचा आरोप ठेवून बंदी घालणारे सरकार, गांधीहत्येविषयी आणि हिंसाचाराविषयी एकही खटला संघावर न भरता संघाला लेखी घटना नाही या गंभीर गुन्ह्याविषयी (!) शेवटचे सहा महिने संघनेतृत्वाशी चर्चा करते आहे, हे पाहून कुठलाही उद्याचा इतिहासकार आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. पंडित नेहरूंनी, स्वतंत्र भारतातील पहिला सत्याग्रह, ज्यात आपल्याच देशातील 70 हजार तरूण तुरूंगात गेले आहेत अशा विषयात श्रीगुरूजींना भेटीसाठीसुध्दा नकार दिला आहे व जणू सामान्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असावा तसा गृहमंत्रालयाला भेटा, असा सल्ला दिला आहे.१२ डॉ. हेडगेवारांच्या समाधीवर हल्ला, श्रीगुरूजींच्या घरावर हल्ला असे प्रसंग होऊन गेले आहेत. समाजवादी मंडळींनी श्रीगुरूजींविरूध्द ठिकठिकाणी निदर्शने करणे, कम्युनिस्टांची धारदार टीका या सगळयांमुळे एक नवी राजकीय अस्पृश्यता जन्माला येऊन संघ एकाकी पडला आहे.

या सर्वांना संघनेतृत्वाचे उत्तर काय व त्यामागची मानसिकता काय आहे ? शेवटच्या टप्प्यातले सरकार व संघ यांचे मध्यस्थ पं. मौलीचंद्र शर्मा यांचा या विषयातला प्रत्यक्ष अनुभव बोलका आहे. नागपूरमध्ये संघनेत्यांशी झालेल्या चर्चेबाबत (या वेळी श्रीगुरूजी सिवणी तुरूंगात आहेत.) ते म्हणतात, 'सरकार चाहे जब तक प्रतिबंध लगाए रखे, हम झुकेंगे नहीं, यह वे कह रहे थे । मैंने कहा सरकार की बात नहीं है । सरकार को संतुष्ट करना आपका काम नहीं । पर ये अपनेही लोग है ....। अपने लोगों का मन रखना है, मान रखना है। यह जब समझाया गया और जब उन्हें यह लगा की प्रतिबंध हटवाने अथवा जेलों में छूटने के लिए नहीं, बल्कि समाज में समरसता के लिए ही यह काम भी किया जा रहा है, यह सब उनके भीतर उतर गया, तब उन्होंने (संविधान) लिखकर दिया ।'१३

चाहे जब तक प्रतिबंध लगाए मह झुकेंगे नहीं हे वाक्य पुढे आवश्यकता पडल्यावर 75 साली संघाने खरे करून दाखविले हेही इथे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे संघाची भूमिका कुठल्याही भीतीपोटी नव्हती. या भूमिकेची एक दिशा ही विरोधकांनाच नव्हे तर संघाने अनेक गोष्टी कराव्यात असे वाटणाऱ्या समर्थकांनासुध्दा काही काळ प्रश्न पडला अशी आहे. या बाहेरील घटना व प्रतिकूलता जणू अस्तित्वातच नाही असे वाटावे इतक्या आग्रहपूर्वक संघाच्या नित्य कार्यपध्दतीचा आग्रह, शाखा-उपस्थिती, बृठका, शारीरिक, संघ शिक्षा वर्ग यांची चौकशी असे श्रीगुरूजी व संघाच्या नेतृत्वाने वर्षानुवर्षे केले. वर्षभरातील दोन भारतभ्रमणांपैकी फार मोठा काळ श्रीगुरूजींनी या विषयासाठी दिलेला असतो. परंतु त्यातूनच संघ कार्यपध्दतीचे मर्म समजलेली, प्रतिकूल परिस्थितीतही अविचल निष्ठेने काम करणारी कार्यकर्त्यांची एक देशव्यापी फळी आणि प्रतिवर्षी थोडी वा अधिक, परंतु विस्तार पावणारी कार्यपध्दती विकसित झालेली दिसते. वर उल्लेख केलेल्या प्रस्तावनेत बाळासाहेब देवरसांनी म्हटले आहे, 'यह उनके परिश्रम का दृश्यमान फल है, की कठीन और प्रतिकूल परिस्थितियों में भी कार्य वर्धिष्णु और दृढ है ।'

कुठल्याही सामाजिक चळवळीप्रमाणोच संघनेतृत्वाच्या भूमिकेचा दुसरा पैलू समकालीन घटनांची दखल घेणे व त्याला योग्य प्रतिसाद, उत्तर देणे असा आहे. परंतु तो समजून घेण्यासाठी काँग्रेसमधील अंतर्प्रवाह समजून घेणे आवश्यक आहे. बंदी उठल्यानंतरसुध्दा संघ स्वयंसेवक काँग्रेसमध्ये का येत नाहीत, असा प्रश्न सरदार पटेलांनी पंडित माृलीचंद्र शर्मांना विचारला आहे.१४ 7 ऑक्टोबर 1949 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने (वर्किंग कमिटी) संघ स्वयंसेवक काँग्रेसमध्ये येऊ शकतात असा प्रस्ताव केलेला आहे.१५ (या प्रस्तावाच्या वेळी पंडित नेहरू अमेरिकेत होते.) 17 नोव्हेंबरला दुसरा प्रस्ताव करून, "Since no Congessman shall organise or join any voluntary organisation other than those officially sponsored by Congress, therefore the memebers of R.S.S. will not be exempt from this rule if they choose to become Congress members."१६ अशा शब्दांत पहिला प्रस्ताव जवळपास रद्द केला आहे. 14 जून 1947 रोजी काँग्रेसने जेव्हा फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला तेव्हा त्याला कडाडून विरोध करणारे, संघावर बंदी असताना संघाच्या बाजूने जनआंदोलन करण्यासाठी स्थापन झालेल्या जनाधिकार समितीच्या कार्यक्रमात व जाहीर सभेत उघडपणे सहभागी होणारे१७ श्री पुरूषोत्तमदास टंडन यांची सप्टेंबर 1950 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेली आहे (यातच सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याची मानसिकता प्रतिबिंबित होते) व नंतर पंडित नेहरूंच्या असहकारामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

या सगळया परिस्थितीत संघाने व श्रीगुरूजींनी काय केले ? एक म्हणजे द्वेषाने द्वषे वाढवण्याची भूमिका न घेता काँग्रेसमधील ज्यांची सहकार्य घेण्याची मानसिकता होती त्यांना देशहितार्थ सहकार्य दिले आहे. म्हणून तामीळनाडूत संघकार्याचा प्रारंभ करणारे प्रचारक श्री. जनार्दन चिंचाळकर, श्री. ठक्करबाप्पा यांच्या आदिमजाती सेवक संघाचे महामंत्री झाले. याचे अध्यक्ष श्री. मोरारजी देसाई होते. पुढे 77 साली मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर श्री. चिंचाळकरांना त्यांनी अध्यक्ष केले.१८ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. रविशंकर शुक्ल यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्या दौऱ्याच्या वेळी ख्रिस्ती मंडळींनी जिथे काळे झेंडे दाखवून स्वागत केले त्या जशपूरमध्ये श्री. बाळासाहेब देशपांडे या संघ स्वयंसेवकाने श्री. रविशंकर शुक्ल यांच्या सहकार्याने व ठक्करबाप्पांच्या मार्गदर्शनाने हे आव्हान स्वीकारले१९ खुद्द पंडित नेहरूंविषयी व्यक्तिगत कटुता श्रीगुरूजींनी कधीच ठेवली नाही. नागालँडमध्ये वा लंडनमध्ये त्यांच्याविरूध्द झालेल्या निदर्शनांनी ते व्यथित झाले आहेत.२० ही व्यथा दिखाव्याच्या जाहीर कार्यक्रमातील नसून व्यक्तिगत संभाषणांमध्ये व्यक्त झाली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. केवळ काँग्रेसमध्येच नव्हे तर सर्वच पक्षांतील लोकांशी संपर्क प्रस्थापित करण्याचे सतत प्रयास झाले आहेत. ''श्रीगुरूजींचे आम्हा दोघांना (दत्तोपंत ठेंगडी व बच्छराज व्यास) सांगणे असे की, विदर्भातील शे.का. फेडरेशनच्या पुढऱ्यांशी व स्वत: बाबासाहेबांशी (आंबेडकर) व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करावेत. कोणताही राजकीय हेतू मनात न ठेवता विशुध्द भावनेने वैयक्तिक संबंध जोडावेत.''२१

असे करीत असतानाच देशहिताच्या प्रश्नांवर अतिशय परखड मते श्रीगुरूजींनी व्यक्त केली आहेत. यातील सर्वात उल्लेखनिय प्रसंग चीन युध्दाचा आहे. चीन युध्दाच्या शक्यतेविषयी व आक्रमणाविषयी 1960 च्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, गेली 4-5 वर्षे मी चीनच्या आक्रमणाचा उल्लेख करतो आहे. म्हणजे सारा देश पंचशीलाच्या घोषणांनी भारावलेला असताना श्रीगुरूजींनी हा मुद्दा मांडायला सुरूवात केली आहे. कुठल्याही अतर्क्य किंवा अंतर्गत कारणांमुळे चीनला मनात असूनही आक्रमण करणे शक्य झाले नसते तर श्रीगुरूजींची युध्दखोर म्हणून हेटाळणी होणे अटळ होते. तशी ती 55 ते 60 च्या दरम्यान काही काळ झालीही. परंतु हा धोका पत्करून श्रीगुरूजींनी देशहितासाठी आवश्यक तो विचार मांडला. युध्द झालेच तर लोकांमध्ये भीतीमुळे तात्कालिक प्रतिक्रिया काय होऊ शकते याचाही विचार त्यांनी इंदोरच्या संघ कार्यकर्त्यांच्या अखिल भारतीय बैठकीत मांडला आहे,२२ इतके त्यांना अटळ भविष्य स्पष्ट दिसते होते. प्रत्यक्ष युध्द सुरू झाल्ल्यावर मात्र त्यांची भूमिका 'अब प्रबल शत्रू देश की सीमा में घुस आया है । इस समय पुरानी भूलों को दोहराते रह कर आपस में टिका-टिप्पणी, छिंटाकसी करना बहुत भारी भूल होगी । अब सब राष्ट्रभक्तों को छोटे-मोटे आपसी मतभेद भुलाकर, कंधे से कंधा लगाकर एक अभेद्य शक्ति के रूप में खडा होना अनिवार्य है।'२३ अशी आहे.

या द्वेषाला प्रेमाने जिंकण्याच्या, सहकार्याच्या भावनेचा परिणाम का दिसतो ? पंडित नेहरूंचे व्यक्तिगत मत काही बदलले होते असे नव्हें. 62 सालच्या पत्रकार परिषदांमधील त्यांची उत्तरे त्यांची मते स्पष्ट करतात.

"You concentrated more on right-wing parties (Jansangh) than Communists?" (in elections) उत्तर "Right-wing parties are always the greatest threat. Nothing can be worse. Right-wing means going back to ancient world, feudalism and all that. It means ignorance, decay, stagnation and all that goes to the death of a nation." हे 21 मार्च 1962 च्या पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तर आहे. 13 जूनच्या पत्रकार परिषदेत एकाने विचारले, "Recently the Home Minister made a statement about Jamat-i-Islami. We would like to know if you consider RSS as equally dangerous?" उत्तर "It is difficult to compare, but they are both. I think very narrow in their outlook and therefore harmful to the idea of national integration." २४

परंतु चीन युध्दाचा दणका असा जबरदस्त होता की, 26 जानेवारी 1963 च्या संचलनात भारतीय सैन्यासमवेत संघाचे पथक सर्व पूर्वग्रह विसरून पंडित नेहरूंना सन्मानपूर्वक बोलवावे लागले. त्यानंतर अवघ्या वर्षभरात श्री. एकनाथजी रानडेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संसदेच्या 323 खासदारांच्या सह्यांचे निवेदन विवेकानंद स्मारकाच्या समर्थनासाठी लोकनायक अणेंच्या नेतृत्वाखाली पंडित नेहरूंना 26 डिसेंबर 1963 रोजी देण्यात आले. २५ या पत्रकावर काँग्रेसच्या 100 हून अधिक खासदारांच्या सह्या होत्या. श्री. एकनाथजी रानडे हे मार्च 1962 पर्यंत संघाचे सरकार्यवाह राहिलेले, संघनेता अशी ओळख असलेले व्यक्तिमत्व आहे. पंडित नेहरूंचे दृष्टिकोन स्पष्ट असूनही काँग्रेसचे अनेक खासदार या पत्रकावर सही करतात ही घटना खूप अर्थपूर्ण आहे. त्यानंतर 1965 च्या युध्दाच्य वेळी सर्वपक्षीय बैठकीत श्रीगुरूजींना तत्कालीन पंतप्रधान श्री. लालबहादुर शास्त्रींना बोलवावे लागले.२६

इतकेच नव्हे तर दिल्लीतील वाहतूक व्यवस्था संघ स्वयंसेवकांच्या ताब्यात द्यावी लागली. राजकीय अस्पृश्यतेच्या भिंती ढासळून संघ एक प्रमुख विचारप्रवाह म्हणून अवघ्या 15 वर्षांत प्रस्थापित झालेला दिसतो. अशाच प्रकारे संघाच्या सर्वपक्षीय संपर्काची परिणती पुढे राजकीय क्षेत्रात 1967 साली काँग्रेसविरोधी आघाडी होण्यात, सामाजिक क्षेत्रात 1974 साली जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या बिहारमध्ये विद्यार्थी परिषदेबरोबर आंदोलनात सहभागी होण्यात झालेली दिसते.

बाळासाहेब देवरसांविषयी श्री. स.ह. देशपांडे यांनी लिहिलेल्या लेखाला 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'अध्यात्माच्या अंतराळातून.... वास्तवाच्या भूमीवर' असे काहीसे शीर्षक दिलेले मला आठवते. असल्या 'मटा' छाप मत्रकारितेमुळे श्रीगुरूजींचे नेतृत्व वास्तवाशी संबंध नसलेले, आध्यात्मिक गूढगुंजन करणारे अशी प्रतिमा होते. वरील सर्व घटनाक्रम हा समकालीन घटनांवरचा त्यांचा सखोल अभ्यास व वास्तववादी पकड दाखणारा आहे.

परंतु श्रीगुरूजींच्या नेतृत्वाची अद्वितीयता याच्यापलीकडीलही काही गोष्टींत आहे. भारतामध्ये सत्ताकेंद्रित नसलेल्या सामाजिक, धार्मिक जागृतीच्या चळवळींची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा वैष्णव आखाडयांपासून शंकराचार्यांच्या पीठांपर्यंत, भगवान बुध्दांपासून ते भक्तिमार्गी संतपरंपरेपर्यंत आणि आधुनिक शिक्षण घेतलेल्या, पण भारतीय जीवनाचा गाभा न सोडलेल्या समाजसुधारक चळवळीपर्यंत खूप व्यापक आहे. या सर्वांच्या परिभाषा, पध्दती वेगवेगळया आहेत. या सर्वांशी त्यांच्या परिभाषेत बोलून काही समान राष्ट्रीय हितांच्या मुद्यांवर आणणे, ही क्षमता असणारे नेते देशात अभावानेच दिसतात. श्रीगुरूजी हे अशा अद्वितीय क्षमतेचे नेतृत्व आहे. एकच उदाहरण द्यायचे झाल्यास गोवधबंदीच्या आवश्यकतेची कारणमीमांसा करून हजारो सुशिक्षित तरूणांना स्वाक्षरीसंग्रहाच्या अभियानात उतरवणारे श्रीगुरूजी हे एक चित्र आहे. त्याच वेळी पूर्वांचलातील लोक जर कुठल्या कारणाने गोमांस भक्षण करू लागले असतील तर तेवढयासाठी ते अहिंदू ठरत नाहीत हे वैष्णव सत्राधिकाऱ्यांशी व द्वारकापीठाच्या शंकराचार्यांशी त्यांच्या परिभाषेत चर्चा करून पटवून देणारे व तसे त्यांना जाहीर सभेत मांडण्याची प्रेरणा देणारे श्रीगुरूजी हे दुसरे चित्र आहे. दोन्ही मिळून एक परिपूर्ण राष्ट्रीय दृष्टिकोन आहे. २७

महापुरूषांच्या कामाच्या आकलनातील शेवटची मर्यादा योग्य काळाची असते. कुरूंदकरांनी म्हटल्याप्रमाणे ''अशा महापुरूषांची नजर कित्येक शतके मागे-पुढे फिरत असते. त्यांचे कार्य बहुधा एका आयुष्यात पूर्ण होण्यासारखे नसते. त्यामुळे व्यक्ती गेल्यानंतरसुध्दा अशा व्यक्तींच्या कार्याचे अनेक पैलू पुढील काळावर प्रभाव टाकत असतात.'' भारतातील दलित चळवळीचे गेली 40 वर्षे अध्ययन करणाऱ्या या Eleanor Zelliot विदुषीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे अत्यंत चित्तवेधक व विश्लेषणपूर्ण चित्र रेखाटले आहे. 1937 ते 52 या काळात डॉ. बाबासाहेबांनी आपल्या चळवळीचा वैचारिक पाया मजबूत करण्याकडे आणि दलित वर्गासाठी संवैधानिक तरतुदी व आयुधे तयार करण्याकडे कसे लक्ष दिले हे त्यातून दिसते. उदाहरणार्थ - "The period between 1939 [end of his legistative service] and the election of 1946 was filled not with political activity, but with writing, with attempts to secure political benefits.... In 1940, Ambedkar published 'Thoughts on Pakistan', in July 1941 Ambedkar became a memeber of National Defence Council, in July 42 he was appointed to the Viceroy's Executive Council as member for Labour...."२८

त्यामुळे त्यांचे तात्कालिक तोटेही झाले. उदाहरणार्थ 1937 च्या तुलनेत 46 च्या निवडणुकीत भरीव यश मिळाले नाही. परंतु आज 50 वर्षांनंतर संपूर्ण भारतातील नवजागृत व नवशिक्षित बहुजन समाजाचा फार मोठा भाग जेव्हा बाबासाहेबांना श्रध्दास्थान मानून आपल्या आकांक्षा लोकशाही मार्गाने व्यक्त करतो तेव्हा त्यामागील दूरदृष्टी लक्षात येते.

श्रीगुरूजींच्या कार्याचे आकलन करण्यासाठी योग्य काळ आला आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर संघामध्ये आपल्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात आणण्याची ताकद आली आहे काय ? या प्रश्नाच्या उत्तराशी निगडित आहे. संघ आजही आपले नवे आयाम जोडण्याची सृजनक्षमता आणि विस्तार पावण्याची क्षमता दाखवून देत आहे. म्हणूनच या प्रश्नाचीही वैचारिक चिकित्सा यापुढे दीर्घकाळ होत राहील.
--------------------------------------
संदर्भसूची :
१) श्रीगुरुजी समग्र दर्शन, भारतीय विचार साधना नागपूर, प्रस्तावना खंड-६ व खंड-७
२) Dr. Babasaheb Ambedkar writings & speeches – Education Department, Government of Maharashtra, 1979. Pages 211-215
३) डॉ. हेडगेवार चरित्र, लेखक व प्रकाशक – नाना पालकर, प्रथमावृत्ती, पृ. १४६
४) डॉ. हेडगेवार चरित्र, पृ. १५२-१५३
५) डॉ. हेडगेवार चरित्र, पृ. २०५
६) डॉ. हेडगेवार चरित्र, पृ. ३५८
७) New Quest May-June 1983, “Looking Backwards”, V.M. Sirsikar
८) श्रीगुरुजी समग्र दर्शन, भारतीय विचार साधना नागपूर, खंड-२, पृष्ठ-१०७, १११ (हिंदी आवृत्ती)
९) Militant Hinduism in Indian Politics, J.A. Curran, Institute of Pacific Studies, New York, 1951, Author’s Preface
१०) Militant Hinduism in Indian Politics … The Leadership, Page-81
११)Shri Guruji – H.V. Sheshadri, Suruchi Prakashan, 2004
१२) पटेल-नेहरू-गुरुजी पत्रव्यवहार, पंडित नेहरूंचे पत्र दि. १० नोव्हेंबर ४८, सुरुची प्रकाशन
१३) पं. मौलीचंद्र शर्मा, लेखक- प्रो. रामेश्वर प्रसाद मिश्र, किताब महल प्रकाशन, प्रथम संस्करण २००२, पृष्ठ-३००
१४) पं. मौलीचंद्र शर्मा, पृष्ठ-३०३
१५) Indian Social Reformer, 15 Oct. 1949, as quoted in Militant Hinduism …
१६) The Hindu, 18 Nov.1948 as quoted in in Militant Hinduism …
१७) दैनिक ‘भारत वर्ष’, दिल्ली १३, १४, १५, सप्टेंबर १९४८
१८) सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर, द.बा. ठेंगडी, श्रमशोधन्यास, २००४, पृष्ठ-२०७
१९) वनयोगी, वनवासी कल्याण आश्रम, प्रथम आवृत्ती, पृष्ठ ३३ ते ३५
२०) श्रीगुरुजी जीवन प्रसंग, लोकहित प्रकाशन, पृष्ठ १८९
२१) सामाजिक क्रांतीची ... पृष्ठ-१२८
२२) श्रीगुरुजी समग्र दर्शन, खंड-४, पृष्ठ-३,४
२३) श्रीगुरुजी समग्र दर्शन, खंड-४, पृष्ठ-९६
२४) Ministry of External Affairs Publications Division
२५) The Story of Vivekanand Rock Memorial – Vivekananda Rock Memorial Trust
२६) श्रीगुरुजी समग्र दर्शन, खंड-५, छायाचित्र
२७) Shri Guruji – H.V. Sheshadri, Page 29,35
२८) Dr. Babasaheb Ambedkar & The Untouchable Movement – Eleanor Zelliot, Bluemoon Books, Delhi 2004
--------------------------------------
साभार - राष्ट्र-ऋषी श्रीगुरुजी
साप्ताहिक विवेक