श्रीगुरुजी आणि समरसतेचा आचार

- श्री. रामभाऊ बोंडाळे

श्रीगुरुजींच्या घरचे वातावरणही समरसतेला अनुकूल होते. श्रीगुरुजी वडिलांना 'भाऊजी' म्हणत असत. ते सुरुवातीच्या दिवसांत खेडयामध्ये शिक्षक होते. त्यावेळी त्यांच्या घरी शंका विचारायला किंवा पाठ समजून घ्यायला विद्यार्थी आला की त्याची जात विचारात न घेता जवळ बसून त्याला शिकवीत असत आणि तेही नि:शुल्क.

आई, 'ताई' सुध्दा खेडयांत कोणी महिला आजारी असेल तर तिच्या जातीचा विचार न करता तिची विचारपूस औषधपाण्याची व्यवस्था करण्याकरीता तिच्या घरी जात असत. पुढे संघाच्या कामासाठी अनेक जाती, भाषाभाषी स्वयंसेवक येत. त्यांचे चहापाणी, खाणेपिणे, जेवण सर्वांच्याबरोबर एकाच पंक्तीत होत असे.

श्रीगुरुजी बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिकत असताना एक तथाकथित अस्पृश्य विद्यार्थी त्यांना भेटला व त्याची जेवणाची व्यवस्था करता येईल का? अशी विचारणा त्याने केली. श्रीगुरुजींनी भोजनालयामधील इतर विद्यार्थ्याचे मन वळवून मेसमध्ये सर्वांबरोबर जेवणाची नि:शुल्क व्यवस्था केली. त्याचे शुल्क बाकी सारे भरत असत. ही व्यवस्था दोन वर्षे चालू होती. (श्रीगुरुजी समग्र दर्शन खंड ५ - पृ. १५२).

एकसंध समाज
मद्रासला शोध निबंधाच्या अभ्यासासाठी असताना आपल्या बाबुराव तेलंग या मित्राला पाठविलेल्या पत्रात 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे, भेद नष्ट करून समाज एकसंध केला पाहिजे असे विचार त्यांनी मांडले होते.' त्यांचे आध्यात्मिक गुरू स्वामी अखंडानंद हिमालयात तपश्चर्या करायला जात असताना 'सारगाछी' भागात दुष्काळामुळे होणारी गरीब लोकांची दुर्गती पाहून तपश्चर्येचा विचार त्यागून त्यांची सेवा करण्यात ते रमले. त्यांनी व त्यांचे गुरुबंधू स्वामी विवेकानंदांनी हीच मोठी तपश्चर्या मानली.
डॉ. हेडगेवार यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांचा हाच अनुभव आला. डॉ. जेवायला बसले असताना कोणी बाहेरगावचा स्वयंसेवक आला, तर त्याला आपल्या शेजारी आग्रहपूर्वक जेवायला बसवीत.

श्रीगुरुजी प्रवृत्तीने आणि वातावरणाने समरसता जगणारे होते. संघामध्ये त्यांना असेच समरसतेचे स्वाभाविक वातावरण दिसल्यामुळेच ते संघात रमले, अन्यथा ते रमले नसते असे पुष्कळ वेळा मला वाटते.

महारवाडयात बामण
श्रीगुरुजी १९४० मध्ये सरसंघचालक झाले. १९४१ किंवा ४२ मध्ये प्रवासावरुन नागपूरला आल्यावर त्यांना कळले की, पांडुरंग धारगावे हा छोटा स्वयंसेवक आजारी आहे. संघात आजारी स्वयंसेवकाची चौकशी, औषधपाण्याची व सेवेची व्यवस्था करणे हा स्वयंसेवकांचा स्वभाव बनावा असे संस्कार दिले जातात. त्या संस्कारानुरूप श्रीगुरुजी कृष्णराव मोहरील यांना बरोबर घेऊन त्याच्या घराकडे निघाले. पांडुरंग अंथरुणावर पडून होता. त्याच्या वडिलांना कोणीतरी चांगल्या वेषांतले लोक आपल्याकडे येताना दिसले ते पांडुरंगला म्हणाले, ''आपल्या महारवाडयात हे कोण बामण येताहेत. त्यातले एक तर कोणी महाराज वाटताहेत.'' पांडुरंग उत्सुकतेपोटी अतिशय कष्टाने दरवाजाशी आला तोपर्यंत हे सर्व लोक दरवाजात आले होते. श्रीगुरुजींनी पांडुरंगाला पाहिल्याने झोपायला सांगितले. मग त्याच्या जवळ बसून चौकशी केली. नाडी पाहिली आणि पांडुरंगच्या औषधपाण्याची काय व्यवस्था आहे विचारले. त्यांनी म्हटले, डॉक्टरकडे जाणे परवडत नाही. या भागातल्या वैदूचे औषध चालू आहे. श्रीगुरुजींनी लगेच कृष्णरावजींना सांगितले 'आज डॉ. पांडेंना घेऊन या. त्यांचे औषध चालू करू.' त्याप्रमाणे डॉ. पांडे आले व त्यांचे औषध चालू झाले. त्यांनी पैसेही घेतले नाहीत.

हे दाढीवाले कोण?
नागपुरात कमाल टॉकीजच्या मागे शिवाजी शाखा लागते. त्या शाखेतही श्रीगुरुजी जात असत. एकदा शाखेत गेले असताना तेथील मुख्य शिक्षक गोपाल हुमने दिसला नाही म्हणून चौकशी करता कळले की तो आजारी आहे. शाखा सुटल्यावर गुरुजी त्याच्या घरी जाऊया म्हणाले. दिवस पावसाचे होते. रस्ता असा नव्हताच. चिखल तुडवीत ४-५ जण गोपालच्या घराकडे निघाले सुमारे १ किलोमीटर या पध्दतीने जाऊन श्रीगुरुजींनी त्याच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याच्याही औषधपाण्याची व्यवस्था केली. हा सर्व प्रवास रस्त्याच्या बाजूच्या झोपडयांतील लोक पाहत होते. त्यांनी श्रीगुरुजींच्या बरोबरच्या ओळखीच्या लोकांना 'हे दाढीवाले कोण आहेत?' असे विचारले असता ज्यावेळी त्यांना ते संघाचे सार्‍या भारताचे नेते आहेत, असे कळले, तेव्हा ते लोक म्हणाले 'आमचे प्रांताचे पुढारीही कधी आमच्या या झोपडपट्टीत आले नाहीत आणि हे एवढे मोठे पुढारी असून एका लहान मुलाला पाहायला आले.'

'मी' तुमच्यासारखाच आहे
श्रीगुरुजींचा समरसताभाव फक्त स्वयंसेवकांपुरता मर्यादित नव्हता. नागपूरला काही वर्षे संखाचा मकरसंक्रमण उत्सव प्रत्येक वार्डात घ्यावा असा प्रयत्न झाला. पहिल्या वर्षी ज्या भागात शाखा नाहीत अशाही भागात हा उत्सव झाला. त्यामुळे दुसर्‍या वर्षी आणखी व्यापक प्रमाणात हा उत्सव घ्यावा असे ठरले. त्याला विरोध करण्यासाठी कम्युनिस्ट व काही रिपब्लिकन नेत्यांनी सभा घेऊन 'संघ जातीयवादी आहे. यांना ब्राह्मणशाही आणायची आहे. हे अस्पृश्यांना तुच्छ लेखणारे आहेत. अशा प्रकारचा प्रचार सभा घेऊन सुरू केला. अशीच एक सभा रामरतन जानोरकर यांच्या घराजवळ चालू होती. रामरतनजी त्या सभेत गेले व 'मलाही बोलू द्या' अशी विनंती त्यांनी केली. परवानगी मिळाल्यावर त्यांनी म्हटले, 'संघ व गुरुजींवर जी टीका चालू आहे ती अगदी अयोग्य. संघ अस्पृश्यांनाही बरोबरीचे मानतो, आपले मानतो हा माझा स्वत:चा अनुभव आहे. मागील वर्षी अशाच एका उत्सवाला मी अध्यक्ष होतो. त्या सभेत संघाच्या कार्यकर्त्याचे भाषण मला चांगले वाटले. मीही थोडेसे बोललो. सभेनंतर विलास फडणीसांना मी म्हटले माझ्या काही शंका आहेत त्याबद्दल गुरुजींशी मला बोलायचे आहे. विलासराव म्हणाले, यावेळी गुरुजी नागपुरात नाहीत. पुढच्या महिन्यात ते आल्यावर यावर्षी नागपुरात जे उत्सव झाले त्यांच्या अध्यक्षांची श्रीगुरुजी समवेत बैठक आहे. तेथे तुम्हाला जे प्रश्न विचारयचे असतील ते विचारा. तसे श्रीगुरुजींना कोणीही भेटू शकतो. मला रीतसर निमंत्रण आले. आपल्या भागातील संघाच्या कार्यकर्त्यांनीही आग्रह केला. बैठकीला मी गेलो. तेव्हा गुरुजींनी मला आपल्याजवळ बसवले. गुरुजींचे भाषण झाले. मग चहापान व नंतर चर्चा अशी योजना होती. चहापानाच्या वेळी चहा आला तेव्हा गुरुजींनी स्वत:च्या हाताने पहिल्यांदा मला चहा दिला मग स्वत: घेतला. नंतर रिकाम्या कपबशा गोळा करायला स्वयंसेवक आला त्यावेळी गुरुजींनी माझा उष्टा कप त्याच्याकडे पहिल्यांदा दिला व नंतर आपला कप दिला. मध्यंतरी माझ्याशी खूप मोकळेपणाने आत्मीयतेने ते बोलले. चर्चा संपल्यावर त्यांना नमस्कार करायला मी झुकणार त्या आधीच त्यांनी मला आपल्या मिठीत घेतले व म्हणाला नमस्कार देवाला करायचा मी तर तुमच्यासारखाच आहे. हा माझा स्वत:चा अनुभव आल्याने माझी खात्री झाली आहे की श्रीगुरुजी कोणालाही हीन मानत नाहीत. परका मानत नाहीत.' सखारामजींच्या भाषणाने सभेचा सर्व नूरच पालटला.

पंडित कवाडे गहिवरले
नागपूरला संघ शिक्षावर्गाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष म्हणून कोणाला बोलवावे याची चर्चा चालू असताना श्रीगुरुजींना पं. रेवाराम कवाडे यांना बोलवावे असे सुचविले. रेवारामजी म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे चुलते. डॉ. आंबेडकरांनी बौध्द धर्माची सामुदायिक दीक्षा दिल्यानंतर त्याचे बाकी अनुयायी राजकारणाकडे वळले, पण रेवारामजींचा ओढा केवळ बौध्द धर्माकडे होता. रेवारामजींना बौध्द मतांतील धार्मिक विधींची बरीच माहिती होती त्यामुळे त्यांना पंडित ही पदवी पू. बाबासाहेबांनीच दिली होती. पं. रेवारामजींना रीतसर निमंत्रण दिले गेले व त्यांनी ते स्वीकारले. त्यानंतर त्यांच्या काही मित्रांनी सांगितले की त्यांनी संघाच्या कार्यक्रमाला जाणे योग्य होणार नाही, परंतु या विरोधास न जुमानता पंडित रेवारामजी उत्सवासाठी उपस्थित झाले. श्रीगुरुजींनी स्वत: त्यांचे स्वागत करून स्वत:जवळ बसवले व आपल्या हाताने त्यांना चहा दिला. तेव्हा पं. कवाडेंना गहिवरून आले. पं. कवाडेंनी समारोप समारंभाच्या भाषणात या गोष्टींचा उल्लेख करून गुरुजी व संघाची प्रशंसा केली.

संपूर्ण समाजाचे संघटन
१९६० - ६१ च्या सुमारास श्रीगुरुजी स्वामी करपात्रींना दिल्लीच्या निवासस्थानी भेटायला गेले. गप्पा गोष्टी होता होता स्वामी करपात्री महाराज म्हणाले, ''गोळवलकरजी, आप एक काम करें। देशभर आपके इतने स्वयंसेवक हैं। उन्हें बताइये की वे अपने अपने वर्ण अनुसार व्यवहार करें। वे आपका मानेंगे।'' त्यावर गुरुजी म्हणाले, ''मी संघाच्या प्रमुख स्थानावर आहे, पण हे सर्व स्वयंसेवक माझे शिष्य नाहीत, बंधू आहेत. त्यांना मी आज्ञा करीत नाही. तरी पण आपण म्हणता तर मी त्यांना विचारीन. त्यांना पटले तर अवश्य तसा व्यवहार करतील, परंतु समाजात एकूणच अव्यवस्था आहे. तेव्हा त्यांच्यासमोर एखादे नमुनेदार समाजाचे उदाहरण उपस्थित केले तर असे सांगता येईल आणि तसे आपणच चांगले करू शकाल. कारण आपले हजारो शिष्य आहेत व आपण त्यांचे गुरू आहात आपली आज्ञा त्यांना मानावीच लागेल. आपण आपल्या शिष्यांना सांगावे की, आपआपल्या वर्णाप्रमाणे व्यवहार करून एक उदाहरण उपस्थित करा. मग मला काय जमते ते पाहीन. यावर स्वामीजी रागावले व म्हणाले, ''तुम्ही तर माझ्यावरच सर्व लादू इच्छिता आहात. तुम्हाला करायचे नसेल तर तसे म्हणा'' तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले, ''रागावू नका, पण मला सांगा आज कोठे वर्णव्यवस्था राहिली आहे का? जातिव्यवस्था राहिली आहे का? ही जीर्ण व्यवस्था पुनह्ा उभी करण्याचे प्रयास व्यर्थ आहेत. हे सर्व एकवेळ पूर्ण मोडून एकच समाज निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. त्यातूनच नवीन समाजरचना तयार (evolve) होईल आणि तेच योग्य आहे. वास्तविक संघ हेच काम करीत आहे. सर्वांना एकत्र आणून पंथ, जाती आदींच्या आधारावर नव्हे तर समाज, राष्ट्र हा चिरंतन आधार घेऊन एक सुसूत्र, एकास संघटित समाज उभा करायचा, कोणतेही भेद राहू द्यायचे नाहीत. हाच संघाचा विचार आहे.'' अर्थात स्वामी करपात्री महाराजांना हे म्हणणे पटले की नाही सांगता येत नाही, पण गुरुजींनी या प्रश्नासंबंधीची संघाची भूमिका त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

श्रीगुरुजी नेहमी म्हणत असत की, संघाला संपूर्ण समाजाचे संघटन करायचे आहे. समाजातील काही लोकांचे संघटन करून त्या शक्तीचा उपयोग जबरदस्तीने परिवर्तन घटविण्याचे आपले काम नाही.

संघाने केला बाबासाहेबांचा प्रचार
यादृष्टीने संघाबाहेर काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे स्वत:चे घनिष्ठ संबंध होते. आपल्या अन्य कार्यकर्त्यांनाही असे संबंध ठेवावे असा त्यांचा आग्रह व प्रयत्न असे. दत्तोपंत ठेंगडींना जनसंघाचे काम सुरू झाले त्यावेळी त्यावेळच्या मध्य प्रदेशचे संघटन मंत्री करण्यात आले होते. त्यांनी श्रीगुरुजींनी शेडयुल्ड क्लास फेडरेशनच्या कार्यकर्त्यांशी आपलेपणाचे घनिष्ठ संबंध ठेवायला सांगितले होते. तसे करण्यामुळे त्यांचा पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांशींही संबंध आला. १९५२ च्या निवडणुकीत द्विसदस्यीय मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब व अशेक मेहता ही जोडी उभी होती. दोघेही पडले, पण लक्षात असे आले की, अशोक मेहता व त्यांचा समाजवादी पक्ष सवर्ण हिंदूंची मते आंबेडकरांकडे वळविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांत ही भावना पसली की अस्पृश्य व स्पृश्य यांच्यात कधी न तुटणारी तटबंदी आहे. इकडची मते तिकडे जाऊ शकत नाहीत व तिकडची मते इकडे येऊ शकत नाही. दत्तोपंतांकडून ही सर्व माहिती कळली त्यावेळी श्रीगुरुजी खूप चिंतित झाले. यावर काय उपाय योजावेत हा विचार ते करीत असताना १९५४ ला भंडारा लोकसभेची पोटनिवडणूक पुढे आली. या संबंधीची सर्व हकीकत आपण दत्तोपंतांच्याच शब्दांत पाहू... 'सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या आपल्या शेवटच्या ग्रंथांत पृष्ठ क्रमांक १२९, १३० मध्ये ते लिहातात. १९५४ साली भंडारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आली. त्यातही तीच जोडी समोर आली. डॉ. आंबेडकर व अशोक मेहता. त्यावेळी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. भंडारा मतदार क्षेत्रांत अस्पृश्यांची संख्या भरपूर होती. तरी केवळ अस्पृश्यांच्या मतांच्या आधारावर बाबासाहेब निवडून येऊ शकत नव्हते. हेही स्पष्ट होते. अस्पृश्य मते अशोक मेहतांकडे जातील, पण अशोक मेहतांचे एकही मत आपल्याला मिळणार नाही ही सर्वांची खात्री होती. तरी पण आपले दुसरे मत अशोक मेहतांना द्यावेच लागेल कारण दुसरा कोणताही पर्याय नव्हता. असे झाले तरी मुंबईप्रमाणेच याही वेळी होईल. फार तर अशोक मेहता निवडून येतील, पण बाबासाहेब मात्र हरतील. म्हणून बैठकीत असा निर्णय झाला की, आपण आपले दुसरे मत जाळू (त्यावेळी प्राथमिकतेच्या आधारावरील दुसरे मत न देणे याला मत जाळणे असे म्हणत असत.) ही बैठक चालू असताना बाबासाहेब तेथे आले. त्यांनी विचारले, ''काय चर्चा चालू आहे?'' त्यांना सांगण्यात आले की आम्ही दुसरे मत जाळण्याचा निर्णय घेतला आहे. कारण असे जर केले नाहीत तर तुम्ही हराल. हे ऐकून बाबासाहेब नाराज झाले. ते म्हणाले, ''मी हरणे पसंत करीन, पण तुम्हा लोकांना दुसरे मत जाळण्याची परवानगी देणार नाही. मी भारतीय घटना तयार केली. त्या घटनेच्या तरतुदींचा अवलंब करताना असा गैरप्रकार कधीही सहन करणार नाही.'' मग पुन्हा तोच प्रश्न आला की मत जाळायचे नाही तर कुणाला द्यायचे? दुसर्‍या कोणत्या तरी सवर्ण व्यक्तीला उभे करून त्याला दुसरे मत देऊ. त्या बैठकीत मी होतो त्यामुळे स्वाभाविकपणे माझे नाव पुढे आले. बाबासाहेब मला म्हणाले, ''तू उभा राहा.'' मी संघप्रचारक असल्याने निवडणुकीला उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता. मी म्हटले, ''माझ्या जवळ पैसे वा इतर साधने नाहीत.'' बाबासाहेब मला म्हणाला, ''ते सर्व आम्ही बघून घेऊ.'' त्यांना शेवटी मी म्हणालो, ''याविषयी मला माझ्या लोकांना विचारावे लागेल. मी पू. गुरुजींच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या. ते म्हणाले की ही संधी चांगली आहे, परंतु तू उभा राहिलास तर या संधीचा लाभ होणार नाही. कारण आपले सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांसाठी जीव तोडून काम करतील तरी सर्व लोक म्हणतील की तू उभा आहेस म्हणून संघाचे लोक बाबासांहेबासाठी काम करीत आहेत. याकरिता तू स्वत: निवडणूक लढवू नकोसच परंतु आपल्यापैकी कोणालाही निवडणुकीला उभे राहू देऊ नकोस. त्याऐवजी तू स्वत: भंडारा मतदारसंघातील आपले सर्व कार्यकर्ते पूर्णशक्ती पणाला लावून बाबासाहेबांसाठी प्रचार करा. संघाचे लोक बाबासाहेबांसाठी प्रचार करीत आहेत ही गोष्ट बाबासाहेबांच्या व इतर लोकांच्या ध्यानात आली पाहिजे, असे होण्याने आपल्याला अभिप्रेत असलेल्या सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने अधिक लभा होईल.

भंडारा जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवक बाबासाहेबांच्या प्रचारकार्यासाठी प्राणपणाने हिंडू लागले. अर्थातच या निवडणुकीत बाबासाहेब जरी हरले तरी त्यांनी जेव्हा आकडयांचे विश्लेषण केले; कुठून किती मते मिळाली ते पडताळून पाहिले, तेव्हा त्यांच्या ध्यानी आले की, त्या सांसदीय क्षेत्रांत अस्पृश्यांची एकूण जितकी मते होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मते त्यांना मिळाली आहेत. सवर्णातीलही अनेकांनी त्यांना मतदान केले आहे. त्यामुळे त्यांना संतोष झाला.

पुढे नागपुरातील दीक्षाविधीच्या दुसर्‍या दिवशी नागपुरातील शे. का. फेडरेशनचे पुढारी त्यांना भेटायला आले. त्या मंडळींना बाबासाहेब म्हणाले, ''तुम्हा लोकांना राजकारणात अधिक रुची आहे. मी भंडार्‍याची निवडणूक हरलो त्याचे मला दु:ख नाही, कारण मी हरणार याची मला सुरुवातीपासूनच कल्पना होती, परंतु मला एक गोष्ट फार चांगली वाटली. अस्पृश्य आणि सवर्ण समाज यांच्यामध्ये मला तटबंदी दिसत होती ती या भंडार्‍याच्या निवडणुकीत तुटून गेली. या निवडणुकीत मला अस्पृश्यांव्यतिरिक्त सवर्णांचीही बरीच मते प्राप्त झाली. यापुढे आपण आपला विचार बदलला पाहिजे. केवळ अस्पृश्य व मागासवर्गीयांसाठीच संघटन न बनवता आम्हाला सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम बनविले पाहिजेत.''

अर्थात अस्पृश्य व सवर्ण यांत जी तटबंदी होती ती तुटली होती. हा सर्व श्रीगुरुजींनी सामाजिक अभिसरणाचा संघाच्या व्यापक ध्येयवादाच्या अनुषंगाने केलेल्या रणनीतीच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा परिणाम होता. या निवडणुकीतील अनुभवामुळे नव्या राजकीय व्यूहरचनेचा बाबासाहेबांच्या मनातील विचार पक्का होऊ लागला. त्याचीच परिणती म्हणजे 'शेडयुल्ड क्लास फेडरेशन' या नावाचा त्याग करून सर्व समावेशक अशा 'रिपब्लिकन' पक्षाची १९५६ मध्ये स्थापना केली. दुर्दैवाने त्यानंतर काही महिन्यांतच बाबासाहेब बुध्दवासी झाल्यामुले हिंदू समाजातील सामाजिक अभिसरणाची क्रिया मंद झाली.''

पंतप्रधानांचा अपमान : राष्ट्राचा अपमान
जंगलातील वास्तव्यामुळे निर्माण झालेला दुरावा व त्याहून मुख्य कारण म्हणजे हिंदू समाजातील पुढारलेल्या लोकांचे शेकडो वर्षांचे दुर्लक्ष यामुळे वनवासी इतर हिंदू समाजापासून अलग झाल्यासारखे झाले होते. त्यांना पूर्णपणे तोडून पाकिस्तानसारखे ख्रिस्तिस्तान बनविण्याचा जोराचा प्रयत्न परकीय ख्रिश्चन मिशनर्‍यांनी चालविला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याला आणखी जोर आला. त्याचा परिणाम म्हणून स्वतंत्र नागालँडच्या मागणीला पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विरोध दर्शविताच त्यांच्या सभेतून सर्वांनी बहिर्गमन करून पंतप्रधानांचा अपमान करण्याइतकी त्यांची हिम्मत वाढली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पं. रविशंकर शुक्ल यांची सभा झारखंडची मागणी करणार्‍या मिशनरी प्रेरित वनवासी लोकांनी उधळून लावली. पं. नेहरूंचा संघविरोध, त्यापायी त्यांनी आणलेली संघबंदी या सगळया गोष्टींचा विचार करता अन्य कोणी असता तर नेहरूंच्या अपमानामुळे तो आनंदित झाला असता, पण श्रीगुरुजींचे राष्ट्राशी इतके तादात्म्य होते की, पंतप्रधानांचा अपमान हा राष्ट्राचा अपमान आहे या जाणिवेने श्रीगुरुजी दु:खित झाले. अत्यंत अस्वस्थ झाले.

वनवासी व बाकीचा हिंदू समाज यांच्या समरसता, एकात्म प्रस्थापित करण्यासाठी रामटेकला वकिली करीत असलेल्या बाबासाहेब देशपांडेंना १९५२ ला जशपूरला पाठविले. त्यांच्या मदतीसाठी मोरूभाऊ केतकर या प्रचारकाला पाठविले व १९५२ साली ५ विद्यार्थ्यांनीशी वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झाली. श्रीगुरुजींच्या निर्वाणापर्यंत जवळजवळ प्रत्येक प्रांतात वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाची सुरुवात होऊन त्या कामाने गती प्राप्त केली होती.

वनवासींच्या कामाला आणखी गती देण्यासाठी विद्यार्थी परिषदेतर्फे नागालँड, मिझोराम आदी पूर्वांचल क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना उर्वरित भारतातील स्वयंसेवकांच्या घरी ठेवून त्यांचे शिक्षण इकडच्याच शाळेत करावे असा प्रकल्प श्रीगुरुजींच्या प्रेरणेने सुरू झाला. जेथे चांगल्या शाखा व शिक्षणाची चांगली सोय आहे असा गावांतील आपल्या स्वयंसेवकांकडे, ही मुले घरच्यासारखी राहिली. घरचे रीतिरिवाज पाहून यापैकी बर्‍याचशा रीतिरिवाजांचे पारंपरिक रीतिरिवाजांशी साम्य आहे हे त्यांच्या मनात ठसले व प्रत्यक्ष अनुभूतीमुळे आपले सार्यांचे जीवन एक आहे, समान आहे ही भावजागृती त्यांच्यात आली. सुट्टयांमध्ये ते घरी जात त्यावेळी त्यांना भेटणार्‍या सर्वांना येथील स्वयंसेवकांच वागण्याची, आपलेपणाची प्रशंसा ही मुले करीत त्यामुळे हळूहळू अलगाववादाचा प्रभाव कमी होऊ लागला. आता तर ही संख्या इतकी वाढली आहे की, त्यांचे छात्रावास भारताच्या अन्य भागांत मोठया प्रमाणात सुरू झाले आहेत.

याशिवाय वनवासी भागांत मोठया प्रमाणावर प्रचारक पाठविले गेले. त्यांच्या प्रयत्नाने शाखा, शाळा, वसतिगृहे आदी विविध संस्कारोपयोगी उपक्रम चालू झाले. या सर्वांचा परिणाम होत आहे. अलगाववादाचा जोर कमी होऊ लागला आहे. भारतीय जीवनाशी समरसता वाढत आहे.

विश्व हिंदू परिषदेची स्थापना
समरसतेच्या प्रयत्नाला जास्त व्यापकता व खोली निर्माण होण्यासाठी संत शक्तीचा सहयोग आवश्यक होता, पण हा सहयोग मिळवणे पारसे सोपे नव्हते. १९६७ साली चंद्रपूर संघ शाखेच्या संक्रांती उत्सवासाठी वंदनीय तुकडोजी महाराज आले होते. भाषणानंतर्या गप्पागोष्टींत त्यांनी सांगितले की, ''श्रीगुरुजी विश्व हिंदू परिषदेची कल्पना घेऊन मला भेटायला आले त्यावेळी मी त्यांना अ.भा.साधू समाजाचा उपाध्यक्ष या नात्याने साधूंनी एकत्र येऊन समाजाचा विचार करावा, समाजाच्या उत्थानासाठी विचार करावा यासाठी मी खूप खटपट केली. पण सर्व साधू एका ठिकाणी येणे व न भांडता एकत्र राहणे ही फारच असाध्य गोष्ट आहे. हा माझा अनुभव सांगून या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. श्रीगुरुजी म्हणाले, ''हे जर आवश्यक आहे तर ते यश येईपर्यंत परत परत चालू ठेवले पाहिजे. आपण पुन्हा प्रयत्न करूया.'' पण १९६४ ची सांदीपनी आश्रमातील बैठक व प्रयागचे यशस्वी व गुण्यागोविंदाने पार पडलेले यशस्वी अधिवेशन पाहिल्यानंतर श्रीगुरुजींची आध्यात्मिक उंची, चिकाटीचे प्रयत्न, सर्व समाज समरस झाला पाहिजे ही तळमळ, विद्वत्ता, संभाषण चातुर्य, वादाचे मुद्दे बाजूला काढून ऐक्याच्या मुद्यांवर सर्वाना आणण्याची कुशलता व विनम्रता यामुळेच ही अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली.''

श्रीगुरुजींनी मोठया प्रयत्नाने संतांना जोडून ठेवले. त्यांच्या मनावर बिंबवले की, आता मठांत बसून राहणे योग्य नाही. आपल्या पंथ, मताचा अत्याग्रह न धरता सामंजस्य दाखवून ऐक्य राखणे, संतांनी समाजाचा विचार करण्याची समाजाला योग्य गोष्टीसाठी प्रेरित करण्याचे आपले कर्तव्य पार पाडले नाही तर समाजच राहणार नाही आणि मग मठे किंवा पंथ कसे राहतील? श्रीगुरुजींच्या सतत चालू असलेल्या भेटी, पत्रव्यवहार, त्यांच्या या विचाराला अनुकूल असलेल्यांना कार्यप्रवृत्त करणे यातून योग्य वातावरण तयार झाले. आमचा मठ सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे मी सर्वांच्या बरोबर बसणार नाही, हा आग्रह मिटले. सर्व समान व्यासपीठावर बसायला तयार झाले. एकमेकांच्या मठात जाण्यात कमीपणा वाटत होता तो गेला व एकमेकांकडे जाऊ लागले व ही संतशक्ती समाजाच्या कामी येऊ लागली. प्रयागच्या सम्मेलनांत 'न हिंदू पातीतो भवेत्' या मिळालेल्या मंत्रामुळे परधर्मात गेलेल्यांचे 'स्वगृही येण्याचा प्रवाह सुरू झाला आणि १९६९ च्या उडुपी सम्मेलनात 'हिन्दव: सोदरा सर्वे' म्हणजे सर्व हिंदू भाऊ आहेत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सर्व समान, त्याहूनही सर्व बंधू, आत्मीय हा ठराव पेजावर स्वामींनी मांडला. एवढयावरच न थांबता पेजावर स्वामी दलित वस्तीत गेले तेथील लोकांना भेटले. त्यांच्या घरांत गेले. त्यांच्या काही जुनाट वळणाच्या शिष्यांनी विरोध केला, पण त्यांनी पर्वा न करता हा क्रम चालूच ठेवला. श्रीगुरुजी स्वयंसेवकांना तर वारंवार प्रेरणा देत होतेच. त्यांच्या प्रयत्नांना साधूंच्या प्रयत्नांची साथ मिळाल्याने त्यांचाही उत्साह वाढला. सर्व जातीच्या लोकांना संस्कृत, वेद आदींच्या अध्ययनासाठी मुक्तता लाभली.

--------------------------------------------
साभार: सा. विवेक श्रीगुरुजी आणि सामाजिक समरसता विशेषांक