Navigation |
अस्पृश्यता आणि धर्मांतर- के. सुर्यनारायण राव हिंदू पुनरुज्जीवनाचे प्रणेते मानले जाणार्या महर्षी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर महापुरुषांनी आपल्या हिंदू समाजात निर्माण झालेल्या अनेक विकृतींची आणि कृत्रिम भेदभावांची जाणीव आपल्या समाजाला करून देण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी अविश्रांतपणे लढा दिला. हिंदू समाजाला अत्यंत अनिष्ट अशा अस्पृश्यतेच्या प्रथेचा त्याग करण्याचे, त्या प्रथेच्या घातक विळख्यामधून मुक्त होण्याचे त्यांनी आवाहन केले. एकाही हिंदूला दुसर्या धर्मात जाऊ देता कामा नये, त्याच्यावर तसा प्रसंग येऊ देता कामा नये, अशी कळकळीची सूचना स्वामी विवेकानंदांनी केली होती. ''हिंदू समाजातून एक हिंदू बाहेर गेल्यामुळे केवळ हिंदूंची संख्या एकाने कमी होते एवढेच नाही, तर आपल्या समाजाच्या शत्रूंची संख्या एकाने वाढते'', असे स्वामीजी म्हणाले होते. आपल्या अशा धर्मांतरित बांधवांना आपण परत हिंदू धर्मात आणले पाहिजे, अशी इच्छादेखील स्वामीजींनी व्यक्त केली होती. हिंदू समाजातील अनेक दोषांवर, विकृतींवर मात करून, आपला हा हिंदू समाज संघटित करण्यासाठी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'ची स्थापना केली. आपल्या प्रत्येक देशबांधवाला प्रांत, भाषा, वर्ग, जात इत्यादी भेदभाव न मानता, तो हिंदू आहे, माझा भाऊच आहे याच भावनेने पाहण्यास व त्यानुसार वागण्यास शिकविले. १९३० नंतरच्या दशकात संघाच्या शिबिरांना महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेटी दिल्या होत्या. या शिबिरातील संघ स्वयंसेवक कोणत्याही प्रकारे जाती-भेद न पाळता अत्यंत समरसतेने, बंधुभावाने परस्परांशी वागताना पाहून, तिथे अस्पृश्यतेचा लवलेशसुध्दा नसल्याचे पाहून, अनुभवून त्यांना अत्यंत आनंद आणि समाधान वाटले. बाहेर सामान्यत: हिंदू समाज या प्रथांच्या आहारी गेला असताना हे सर्व पाहिल्याने त्यांना संघ शिबिरातील या अनुभवाचे विशेष कौतुक वाटले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अस्पृश्यतेची ही निंद्य आणि क्रूर पध्दत पाळणार्यांना शिक्षा देण्याचा कायदा झाला, तरीदेखील अजूनही ही पध्दत सुरूच असल्याचे अनेकदा दिसून येते. ह्या दुर्दैवी, हीन प्रथेमुळे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मप्रसारकांना मात्र आयतेच मोकळे रान मिळाले आहे. एक समान व्यासपीठ विश्व हिंदू परिषदेचे पहिले सम्मेलन १९६६ मध्ये प्रयाग येथील त्रिवेणी संगमाच्या पवित्र भूमीवर झाले. या सम्मेलनासाठी शेकडो धर्माचार्य, महामंडलेश्वर, मठाधिपती, पंतप्रमुख, आचार्य, विविध पीठांचे शंकराचार्य यांच्यासह ५०,००० हून अधिक प्रतिनिधी देशाच्या काना-कोपर्यातून आलेले होते. श्रीगुरुजींनी विचारांती ठरविले, की धर्मांतर केल्यामुळे अन्य धर्मात गेलेल्या आपल्या बांधवांविषयीचा प्रश्न, हिंदू धर्माच्या सर्व स्तरांचे, पंथांचे सार्थ प्रतिनिधित्व करणार्या या विशाल प्रतिनिधी समूहापुढे मांडण्यासाठी, त्यावर विस्तृत चर्चा करून काही सुयोग्य निर्णय घेण्यासाठी ही अगदी सर्वथा योग्य वेळ आहे. म्हणूनच या विषयावर चर्चा सुरू झाली. आपले जे हिंदू बांधव, त्यांनी अथवा त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर केल्यामुळे आज ते ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्माचे अनुयायी झाले आहेत, त्यांना त्यांच्या मूळ धर्मात, हिंदू धर्मात येण्यामध्ये आज ज्या अडचणी आहेत, त्या दूर करून, त्यांना हिंदू धर्माच्या विशाल कुटुंबात परत सन्मानपूर्वक सामावून घेण्यासाठी आवश्यक ती योग्य व्यवस्था केली पाहिजे असा ठराव मांडण्यात आला. अनेक वक्त्यांनी त्याबाबत आपले विचार मांडून त्याला पाठिंबा दिला. सर्व प्रतिनिधींनी या ठरावाचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. परंतु पुरीच्या गोवर्धन पीठाचे तत्कालीन जगद्गुरू शंकराचार्य यांनी मात्र आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अशा प्रकारे परधर्माचा स्वीकार केलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्याची कोणतीच तरतूद, कोणतीही व्यवस्था नाही. जो कोणी एकदा आपला मातृधर्म सोडून दुसर्या धर्माचा स्वीकार करेल, तो 'भ्रष्ट' होतो आणि तो 'बहिष्कृत' म्हणूनच वागविण्याच्या लायकीचा असतो. धर्मशास्त्राच्या विरुध्द कोणीच जाऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी या ठरावाला जोरदार विरोध केला. त्यांच्या या अनपेक्षित भाषणामुळे आणि भुमिकेमुळे सर्वत्र निराशेचे वातावरण पसरले. गुरुजींनी श्री शंकराचार्यांची भेट देऊन त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. धर्मांतरितांबद्दलचा हाच दृष्टीकोन, हीच वृत्ती कायम राहिली तर त्यामुळे हिंदू समाजाला आणि आपल्या या देशाला ज्या भयानक संकटांना तोंड द्यावे लागेल, त्याबाबत श्रीगुरुजींनी श्री शंकराचार्यांना सांगितले. आपल्या देशाची झालेली फाळणी, सध्या धगधगत असलेला काश्मीरचा प्रश्न या सर्वांच्या मुळाशी धर्मांतर हेच कारण असल्याचेही सांगितले. याच समस्येमुळे हिंदूंची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे आणि देशविघातक कारवायांचे प्रमाण वाढत असल्याचे, तसेच या धर्मांतरित लोकांचा शस्त्रासारखा वापर आपल्या देशाचे आणि आपल्या संस्कृतीचे शत्रू करत असल्याचेही त्यांनी शंकराचार्यांना सांगितले. या सर्व चर्चेनंतर मात्र श्री शंकराचार्यांना या समस्येच्या गांभीर्याची, तिच्या दूरगामी दुष्परिणामांची नीट कल्पना आली. पण त्यांनी तर आपल्या भाषणात धर्मशास्त्रांचा हवाला देऊन या ठरावाला जाहीर विरोध केलेला होता! त्यामुळे आता शंकराचार्य या नात्याने एकदा जाहीरपणे विरोधी भूमिका घेतली असताना परत माघार कशी घ्यावयाची, भूमिका कशी बदलावयाची हाच मोठा प्रश्न होऊन बसला! श्रीगुरुजींनी आचार्यांसमोर पुनश्च एकदा आपले विचार मांडून त्यांच्याशी अगदी मनमोकळी चर्चा केली. आत्यंतिक दारिद्रयावस्था आणि घोर अज्ञान यामुळे आपल्या समाजाकडून सदैव उपेक्षा आणि अवहेलनेचीच वागणूक मिळाल्यामुळे, त्यांच्या या अवस्थेकडे आपले दुर्लक्ष झाल्यामुळे, आपल्या या समाजबांधवांना विविध प्रलोभने दाखवून अथवा धमकावून, त्यांच्यावर दडपणे आणून त्यांचे धर्मांतरण केले गेले आहे आणि याला अपवाद अगदी विरळ, नगण्य असेच आहेत. चर्चेअखेरीस श्री शंकराचार्यांनी हेही सर्व मान्य केले आणि मग पुढे काय, कसे करावयाचे याविषयीपण चर्चा झाली. शेवटी, श्री शंकराचार्यांनी स्वत:च या संबंधातील आपली भूमिका पुन्हा मांडावी असे ठरले. चोरांनी लुटलेली संपत्ती आपलीच! सर्व प्रतिनिधींनी टाळयांच्या कडकडाटात या वक्तव्याचे स्वागत केले. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण पसरले! ठराव अगदी बिनविरोध, एकमताने स्वीकृत करण्यात आला. उडिपीचे मध्वाचार्य पेजावर स्वामीजी म्हणाले, ''न हिंदु: पतितो भवेत्!'' कोणी हिंदू व्यक्ती कधीच पतित किंवा भ्रष्ट ठरणार नाही. सर्व धर्माचार्यांनी आपले शुभाशीर्वाद दिले आणि यापुढे धर्मांतरितांना पुनश्च हिंदू धर्मात घेण्याच्या कार्यक्रमांना स्वत: उपस्थित राहून त्या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचेही त्यांनी मान्य केले! या सर्व प्रक्रियेला ''परावर्तन'', ''घरवापसी'' 'क्तदृ ङ्ढ-क्दृ त्दढ़' असे अत्यंत समर्पक नाव दिले गेले. हिंदू धर्मावरील, धर्मांतरितांवरील एक मोठा कलंक पुसण्याचे काम हिंदू धर्माच्या विविध अधिकारी आचार्यांच्या, गुरूंच्या, मठाधिपतींच्या, साधू-संतांच्या हस्ते सुरू झाले. हिंदू धर्माच्या इतिहासातील एक नवा अध्याय सुरू करण्याचे हे काम श्रीगुरुजींच्या सुज्ञ, दृढ आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळेच होऊ शकले. विश्व हिंदू परिषदेचे कर्नाटक प्रांताचे अधिवेशन १९६९ च्या डिसेंबर महिन्यात उडिपी येथे झाले. त्या अधिवेशनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता. १२०० हून अधिक ठिकाणांहून १५,००० प्रतिनिधी या अधिवेशनाला आले होते. त्याशिवाय त्यापेक्षा किती तरी अधिक लोकांनी अधिवेशनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली ती वेगळीच! या अधिवेशनात हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, लिंगायत, जैन, बौध्द, शीख इत्यादी ४० हून अधिक पंथांच्या, संप्रदायांच्या प्रमुखांनी आणि साधू-संतांनी स्वत: उपस्थित राहून आपले शुभाशीर्वाद दिले. या अधिवेशनातदेखील श्रीगुरुजी संपूर्ण वेळ सहभागी झाले होते. श्रीगुरुजींनी विचार केला, की हिंदू धर्मातील विविध पंथांच्या, जातींच्या बांधवांनी आपापसात उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य अशा प्रकारचा कोणताही भेदभाव आपल्या मनात न बाळगता, आपण सर्व हिंदू आहोत आणि म्हणून एकच आहोत, या भावनेने सर्व व्यवहार करावेत, या आपापल्या भूमिकेला, त्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांना विविध धर्मांचार्यांचे, साधूसंतांचे आशीर्वाद आणि पाठबळ मिळविण्यासाठी अत्यंत सुयोग्य वेळ आहे. प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी गुरुजींनी या सर्व थोर मंडळींना त्यांनी हिंदू समाजाला अशा स्वरूपाचा संदेश द्यावा, अशी अत्यंत कळकळीची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार या सर्व धर्मगुरूंनी, आचार्यांनी, महामंडलेश्वरांनी, पंथ, संप्रदाय प्रमुखांनी, मुनींनी, साधू-संतांनी एका अत्यंत परिणामकारक, महत्त्वपूर्ण अशा पत्रकावर स्वाक्षर्या केल्या. या पत्रकात म्हटले होते - ''संपूर्ण हिंदू समाज एकजुटीने, एकसंधतेने उभा करणे, हे विश्व हिंदू परिषदेचे ध्येय आहे. हिंदू समाज असा अभेद्य, एकजुटीने, एकात्मकतेने उभा राहण्यासाठी त्यामध्ये उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य यासारख्या भावनांना, चाली-रीतींना, प्रथा-पध्दतींना थारा देऊन चालणार नाही. म्हणूनच असे सर्व भेदभाव विसरून, जगातील सर्व हिंदूंनी परस्परांत ''आपण हिंदू आहोत'' या एकाच भावनेने सर्व व्यवहार करून आपल्या समाजात एकात्मकता, एकता निर्माण करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले पाहिजेत.'' हिंदव: सोदरा सर्वे अध्यक्षांनी ठराव वाचून दाखविताच सर्व प्रतिनिधींनी टाळयांच्या आणि घोषणांच्या प्रचंड गजरात या ठरावाचे मन:पूर्वक स्वागत केले. या सर्व योजनेचे मुख्य शिल्पकार श्रीगुरुजींसाठीदेखील हा अत्यंत आनंदाचा प्रसंग होता. त्यांनी सुचविले, की हा ठराव होण्यासाठी ज्यांनी अत्यंत मन:पूर्वक सहकार्य केले, त्या सर्व धर्माचार्यांबद्दल, साधू-संतांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यानुसार अधिवेशनाच्या सचिवांनी व्यासपीठावर जाऊन आपल्या पूज्य धर्मगुरूंनी, साधू-संतांनी या अत्यंत जटील अशा समस्येचे निराकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुढच्याच क्षणी संपूर्ण सभामंडप ''आमच्या धर्मगुरूंचा विजय असो'', ''हिंदू एकता अमर रहे'' अशा घोषणांनी दुमदुमला. सर्वसाधारणपणे कधीही भावनाविवश न होणारे श्रीगुरुजीदेखील या आनंदोत्सवात सहभागी होऊन टाळया वाजवीत होते! पूज्य पेजावर स्वामीजींनी ''हिंदव: सोदरा सर्वे'' म्हणजेच सर्व हिंदू भाऊ-बहिणीच आहेत, अशी हिंदू समाजजीवनावरील अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकणारी घोषणा केली. अशा प्रकारे हिंदू समाजाच्या एकीकरणाच्या मार्गातील एक भावनात्मक अडथळा दूर करण्यात यश मिळाले. दीर्घकाळपासून चालू असलेल्या या तर्कदुष्ट आणि हानिकारक अशा कुप्रथेशी आमच्या धार्मिक तत्त्वांचा अथवा धर्मशास्त्राचा काहीही संबंध नाही हेही सिध्द झाले. श्रीगुरुजींच्या सूक्ष्म निरीक्षणाच्या आधारे केलेल्या अथक न्याय्य प्रयत्नांना पुनश्च उज्ज्वल यश मिळाले. त्यांच्या जीवनातील तो एक अत्यंत उत्कट आनंदाचा प्रसंग होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या विषयावर होणार्या चर्चेच्या सत्रासाठी उपस्थित राहावे, यासाठी आपल्या भरगच्च अशा शासकीय कामाच्या वेळापत्रकातून मोठया मुश्किलीने, पण निश्चयपूर्वक वेळ काढून श्री. भरनैया आलेले होते आणि या सत्रानंतर ते उडिपी येथून आपल्या पुढील नियोजित कामासाठी प्रयाण करणार होते. परंतु या सत्रातील चर्चा आणि ठरावाला धर्माचार्यांपासून सर्वसाधारण प्रतिनिधींपर्यंत सर्वांकडून अगदी एकमुखाने मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहून ते अक्षरश: भारावून गेले. अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रातील आपल्या भाषणात श्रीगुरुजींनी एक अत्यंत हृदयस्पर्शी आवाहन केले. श्रीगुरुजी म्हणाले, ''आता आपल्या धर्माचार्यांनी, धर्मगुरूंनी, साधू-संतांनी आपण सर्वांनी अस्पृश्यतेच्या हीन कुप्रथेचा सर्वस्वी त्याग केला पाहिजे अशी आज्ञा केल्यामुळे, त्या आज्ञेचे अंत:करणपूर्वक पालन करणे आपले कर्तव्यच आहे आणि ते आपण आपल्या जीवनव्यवहारात प्रत्यक्ष अमलात आणलेच पाहिजे. आपल्या या मातृभूमीत जन्म घेतलेल्या, आपल्या हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करणारा प्रत्येकजण, ज्याच्या जात-पात-वंश, प्रांत, भाषा यांचा विचार न करता आपला बंधूच आहे, अशा प्रकारची आपली वागणूक असली पाहिजे. जेव्हा आपण एकात्मतेला, समरसतेला पोषक अशा मुद्यांवर भर देऊ आणि भेदभाव, विभिन्नता यांना पोषक असे मुद्दे जाणीवपूर्वक टाळू तेव्हाच आपण अशी एकात्मता, समरसता साधू शकू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत काम करताना मला आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारानेच सांगतो आहे. आताच सांगितलेल्या या निखळ सोन्यासारख्या नियमाचे अगदी काटेकोर पालन केल्यामुळेच संघात आपल्याला जात-पात, भाषा, प्रांत, प्रदेश, वंश इत्यादी अनेक मुद्यांवरून भेदभावाचा, वेगळेपणाचा मागमूससुध्दा दिसत नाही. अखेरीस आपल्या आशीर्वादपर भाषणात, पेजावर स्वामीजींनी यापुढे पतित, पददलित, आपल्याच समाजाने आजवर धिक्कारलेल्या, दूर लोटलेल्या समाजबांधवांची सेवा करण्याचा आपला निर्णय सांगितला. सर्वात शेवटी झालेल्या संपूर्ण वंदेमातरम् च्या भावपूर्ण गायनाने सर्वच वातावरण भारून गेले. कार्यक्रम संपल्यानंतर, व्यासपीठावरील वंदनीय मंडळी हळू-हळू खाली उतरू लागली. श्रीगुरूजी व्यासपीठाखाली पायर्यांजवळच उभे होते आणि खाली उतरणार्या प्रत्येकाला अत्यंत नम्रपणे, प्रेमपूर्वक निरोप देत होते. सर्वजण गेले, तरी श्री. भरनैया मात्र व्यासपीठावरच भावनांच्या सागरात बुडून गेल्यासारखे बसून होते. कोणीतरी त्यांच्याजवळ जाऊन, त्यांना कार्यक्रम संपल्याचे सांगितले. मग ते उठले आणि खाली उतरू लागले. उतरतानाच त्यांनी खाली श्रीगुरुजी उभे असलेले पाहिले आणि पटकन उतरून आत्यंतिक आनंदाच्या आवेगात त्यांनी श्रीगुरुजींना घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळयांतून आनंदाश्रू घळघळा ओघळत होते. हे सर्व पाहून तिथे असलेले सर्वजण नि:शब्द शांततेने उभे होते. नंतर अत्यंत भावनावेगाने गळा दाटून आलेल्या स्थितीतच, भरलेल्या आवाजात ते श्रीगुरुजींना म्हणाले, ''आपण आमच्यासारख्यांच्या मदतीला धावून आलात आणि हे उदात्त काम आपण हाती घेतलेत, आमच्या पाठीशी उभे राहिलात, हा आपला चांगुलपणा आणि थोरपणा आहे!'' त्यावर श्रीगुरुजींनी अगदी मृदू आवाजात शांतपणे सांगितले की, ''अहो, केवळ माझेच काय घेऊन बसलात, संपूर्ण हिंदू समाजच आपल्याबरोबर आहे. संपूर्ण समाजानेच आता हे कार्य हाती घेतले आहे.'' श्री. भरनैय्यांच्या त्या अश्रुधारांमधून कित्येक शतकांचा अन्याय आणि मानहानीचा डाग पुसून टाकल्याबद्दलची कृतज्ञता आणि अत्यानंदाची भावनाच प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त होत होती. -------------------------------------------- |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |