श्रीगुरुजी : वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था

- श्री. भि. रा. इदाते

श्रीगुरुजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने हिंदुत्वाचे सर्वांगीण दर्शन घडविण्याची जबाबदारी स्वाभाविकपणेच हिंदुत्वनिष्ठांना पार पाडावी लागेल. कारण श्री. गोळवलकर गुरुजींचे जीवन हे हिंदुत्वाशी तादात्म्य पावलेले स्फटिकासारखे निर्मळ जीवन होते. आपल्या हयातीमध्ये रा.स्व. संघाचे काम देशव्यापी करण्याची निसर्गदत्त कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. गेल्या किमान एक हजार वर्षांनंतर आसेतू हिमाचल हिंदुत्वाची मंगलमय अनुभूती प्रथमच दृगोच्चर झाली आहे. त्याचे माध्यम आहे रा.स्व.संघ!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पू. डॉ. हेडगेवार यांनी दिलेला हिंदुराष्ट्राचा सत्य सिध्दांत प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रीगुरुजींनी केलेले प्रयास अभूतपूर्व व ऐतिहासिक आहेत. परंतु आपल्या देशात श्रीगुरुजींच्या संदर्भात अनेक विद्वानांनी (?) अत्यंत योजनापूर्वक गैरसमज पसरविलेले आहेत. जगातील सर्व तत्त्वज्ञानांचा व आचारपध्दतींचा सखोल अभ्यास केलेल्या श्रीगुरुजींची विचार प्रक्रिया समजावून न घेता केवळ विरोधकासाठी विरोध करणार्‍या या तथाकथित विचारवंतांची कीव करावी तेवढी थोडीच आहे.
श्रीगुरुजींची निर्भत्सना जातीयवादी, संकुचित, वर्णव्यवस्थेचा पुरस्कर्ता, दलितांना पुन्हा पेशवाईच्या कालखंडात ढकलणारा, ब्राह्मणवादी, मनुवादी, सेक्युलर विचारधारेचा विरोधक, हुकूमशहा इ. शेलक्या विशेषणांनी वारंवार केली जाते. परंतु वस्तुस्थिती काय आहे? डाव्या विचारधारेला, कम्युनिझमच्या प्रसाराला, समाजवादी विचारधारेला, भांडवलशाही तत्त्वज्ञानाला त्यांनी यशस्वीपणे गतिरोध उत्पन्न केला. विचार व व्यवहार या दोन्ही स्तरावर हिंदुत्वाचा विचार प्रबळ केला. राष्ट्रव्यापी जागृती केली आणि यामुळेच चिडून जाऊन श्रीगुरुजींच्या विरोधात एक संघटित आघाडी उघडली गेली आहे.

कोणतेही संघटन हे समतेच्या-समरसतेच्या पायावरच उभे राहू शकते. तरच ते टिकते. अन्यथा विघटित होते. गेल्या ८० वर्षांत रा.स्व.संघ विविध अंगाने सतत वाढतच गेला व संघाला विरोध करणारे कमी-कमी होत गेले. त्याचेही मूळ कारण कार्याचा भावात्मक आधार, समताधारित आचार, एकात्मतेचा दृढ संस्कार. त्यामुळे ज्याला संघटन करायचे आहे, त्याला विषमतेचा कोणताही आधार घेताच येणार नाही. जो घेईल तो संपेल. श्रीगुरुजींच्या शब्दात Intense Love is the basis of our work. अर्थात जेथे आत्यंतिक प्रेम आहे, तेथे द्वेषाचा लवलेशसुध्दा असू शकत नाही.

काही वर्षांपूर्वी दै. नवाकाळला दिलेल्या चातुरर्वण्यावरील मुलाखतीमुळे महाराष्ट्रात खूप खळबळ उडाली होती. त्यावर विविध प्रकारे भाष्य केले गेले. खरं म्हणजे आपल्या देशात पूर्वी असलेल्या वर्णव्यवस्थेची एक शास्त्रीय चर्चा त्यांनी केली होती. ती समजून न घेता संघाची कार्यपध्दती व आचारपध्दती लक्षात न घेता आंधळेपणाने श्रीगुरुजींवर हेत्वारोप केले गेले. वर्णव्यवस्थेबाबत श्रीगुरुजींचे मत जाणून घ्यायचे तर वर्णव्यवस्थेचे कट्टर पुरस्कर्ते स्वामी करपात्रीजी महाराज यांच्याशी झालेला संवाद बघण्यासारखा आहे. १९६०-६१ च्या सुमारास दिल्लीच्या निगम बोध घाटावरील करपात्रीजी महाराजांच्या निवासस्थानी श्रीगुरुजींनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी श्रीगुरुजींना करपात्रीजी महाराजांनी आग्रह केला की तुम्ही तुमच्या स्वयंसेवकांना आपापल्या वर्णाप्रमाणे वागायला सांगा. प. श्रीगुरुजी म्हणाले की, मी संघाच्या प्रमुख स्थानावर आहे, पण सर्व स्वयंसेवक माझे शिष्य नाहीत, बंधू आहेत. त्यांना मी आज्ञा करीत नाही... परंतु आपले हजारो शिष्य आहेत, आपण गुरू आहात, तेव्हा आपणच आपल्या शिष्यांना आज्ञा करा... करपात्रीजी महाराज खूप रागावले. तेव्हा श्रीगुरुजी म्हणाले, ''रागावू नका, पण मला सांगा, आज खरोखर कोठे वर्णाश्रम धर्म राहिला आहे काय? जातिव्यवस्था राहिली आहे काय? ही जीर्ण व्यवस्था पुन्हा: उभी करण्याचे प्रयास व्यर्थ आहेत. हे सर्व एक वेळ पूर्ण मोडून एकच वर्ण निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. त्यातूनच नवीन समाजरचना तयार होईल... evolve होईल आणि तेच योग्य आहे. वास्तविक संघ हेच काम करीत आहे. सर्वांना एकत्र आणून धर्म, जाती आदींच्या आधारावर नव्हे तर समाज, राष्ट्र हा चिरंतन आधार घेऊन एक सुसूत्र संघटित समाज उभा करावयाचा, कोणतेही भेद राहू द्यायचे नाहीत हाच संघाचा विचार आहे.'' (सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर-दत्तोपंत ठेंगडी, पृष्ठ २०१-०२).

श्रीगुरुजी केवळ असे म्हणून थांबले नाहीत, त्यांनी प्रत्यक्ष व्यवहार उभा केला. ते म्हणत, ''शतकानुशतके चालत आलेले पूर्वग्रह कोरडया शब्दांनी वा केवळ सदिच्छा बाळगून दूर होणार नाहीत. त्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील. शहराशहरातून, गावागावातून, घराघरातून योग्य दिशेने प्रचार करावा लागेल आणि हे सर्व परिस्थितीच्या दडपणापुढे अगतिक होऊन नव्हे, तर एक स्थायी सिध्दांत आणि जीवनपध्दती म्हणून. भूतकाळातील आपल्या चुकांचे परिमार्जन करण्याच्या विनम्र भावनेने प्रत्यक्ष जीवनात आणावयाचे आहे, हे लोकांना शिकवावे लागेल. त्यासाठी आपल्या आचार-विचारांमध्ये, व्यवहारामध्ये संपूर्ण भावनिक आणि नैतिक परिवर्तन घडवून आणण्याची, हृदय परिवर्तनाची गरज आहे. (कित्ता पृष्ठ २०५)

'अस्पृश्यता सवर्णांच्या मनातील संकुचित भावाचे नाव आहे' असे श्रीगुरुजी सांगत असत. म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाचे स्थान सवर्णांचे मन आहे. याकडे त्यांनी निर्देश केला आहे. अस्पृश्यता हा धर्माचाच एक भाग आहे, अशी चुकीची कल्पना लोकांच्या मनातच दृढमूल झाली असल्याने धर्माचार्यांनीच पुढाकार घेऊन ही दुरुस्ती केली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्याचाच परिणाम म्हणजे १९६९ साली उडुपी येथे वि.हिं.प. च्या पुढाकाराने झालेली विद्वत सभा. या सभेचे अध्यक्ष होते श्री. भरनैया. ते अनु-जातीचे (SC) असून कर्नाटकच्या लोकसेवा समितीचे पूर्वाध्यक्ष (KPSC) होते. संत, महंत, पू. शंकाराचार्य, धर्माचार्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत 'न हिंदू पतितो भवेत! हिंदव: सहोदरा सर्वे!!' म्हणजे कोणीही हिंदू दलित नाही, पतित नाही, अस्पृश्य नाही. तर बंधू आहेत. असा प्रस्ताव पारित करण्यात आला. श्रीगुरुजींनी सर्वांना धर्माचार्यांचा जयजयकार करावयास लावले. सभा संपल्यानंतर श्रीगुरुजींना श्री. भरनैया यानी कडकडून मिठी मारली. त्यांच्या डोळयातून अश्रुधारा वाहत होत्या. ते म्हणाले, ''गुरुजी आमच्या जीवनातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा प्रसंग केवळ तुमच्यामुळेच घडलेला आहे, हे मला माहीत आहे.'' या अविस्मरणीय घटनेमुळे व श्रीगुरुजींशी झालेल्या चर्चेमुळे मध्वाचार्य पू. विश्वेशतीर्थ यांनी गोषणा केली की We are Jagatgurus and Dalits include in that Jagat आणि झोपडपट्टीत जाऊन स्वत: त्यांनी प्रबोधन केले. प्रत्यक्ष कृती केली. श्रीगुरुजींनी यासाठी अथक प्रयत्न केले. एकात्म व एकरस समाज निर्मितीसाठी ते आवाहन करीत की, ''... ग्रामवासी, नगरवासी आणि वनवासी - सर्व समाज आपला आहे. कोणी कोणापासून वेगळा नाही, कोणी कोणापेक्षा उच्च नाही, कोण कोणापेक्षा नीच नाही. एकाच आईची सर्व लेकरे अकृत्रिम स्नेह आणि बंधुत्वाने एक दुसर्‍याशी जोडलेले आहेत. या अनुभूतीची आम्ही आठवण ठेवली पाहिजे, असे झाले म्हणजे वेगळेपणाची भावनाच राहणार नाही.'' (विजय पथ - मा. स. गोळवलकर, पृष्ठ ३७.)

श्रीगुरुजींचा हा व्यवहार जीवनभर चालू राहिला. संघ स्वयंसेवकाच्या मनात आपल्या समग्र समाजाबद्दल जी समरसतेची व एकात्मतेची भावना यामुळेच दृढ झाली. कोणताही वैचारिक गोंधळ व आचारातील भेद कधीच पाहावयास मिळाला नाही. हिंदुत्वाच्या या भावनेशी श्रीगुरुजी एवढे एकरूप झाले होते की, या भावनेला जराही धक्का लागू शकत नाही. बाह्य गोष्टी व परिस्थितीमुळे उत्पन्न झालेली स्थिती याचे सुयोग्य भान त्यांना असे व स्वयंसेवकांनाही त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळे. रा.स्व.संघाच्या बंगाल प्रांताच्या संघशिक्षावर्गातील एक प्रसंग, दत्तोपंत ठेंगडी यांनी नोंदलेला आहे. दार्जिलिंग येथे झालेल्या या वर्गात लेपच्या जनजातीचा एकतरुम आला होता. आमच्या जनजातीत गोमांस भक्षण करतात, असा झालेला उल्लेख ऐकून इतर स्वयंसेवक त्याला म्हणाले की, 'तू हिंदू नाहीस, कारण तू गोमांस खातोस' या वर्गात श्रीगुरुजी आले असता त्या तरुणाने त्याला विचारले की, 'गुरुजी, हे सर्व मला म्हणतात, की तू हिंदू नाहीस. कारण मी व माझ्या जनजातीचे लोक गोमांस भक्षण करतात, तर मला हे सांगा की, मी हिंदू आहे किंवा नाही? त्यावर गुरुजी उत्तरले, , ‘You are as much a Hindu as I am’ .. (सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर - दत्तोपंत ठेंगडी. पृष्ठ २०३) आणि सर्वांकडे वळून ते म्हणाले की, ही जी परिस्थिती उत्पन्न झाली आहे, त्याला आपला हिंदू समाज व धर्माचार्य जबाबदार आहेत. त्यांचा यात काहीच दोष नाही. गोहत्या बंदीसाठी सुमारे दोन कोटी सह्यांचा अर्ज राष्ट्रपतींना सादर करायला लावणार्‍या श्रीगुरुजींची ही भूमिका काय सांगते? एवढेच नव्हे, तर हिंदुंची लक्षणे कोणती? यावर वि.हिं.प. विचार करत असताना, 'जो गाईला माता मानतो तो हिंदू!' असे एक लक्षण असावे अशी चर्चा ज्यावेळी झाली. तेव्हा या प्रस्तावाला पू. श्रीगुरुजींनी विरोध केला व सांगितले की, आपल्याच समाजातील काही गिरीजन बंधू आपल्याच चुकीमुळे गोमांस भक्षण करतात. आपण जर हे लक्षण गृहीत धरले तर हा आपलाच समाज हिंदुत्वाच्या परिघाबाहेर जाता कामा नये, ही भावना केवळ हिंदुत्वाशी एकरूप झालेले व्यक्तिमत्वच व्यक्त करू शकते. हिंदू या भावनेशिवाय समाजाचे कोणतेही वेगळे रूप त्यांनी पाहिले नाही. मांडले नाही. त्यामुळे कोणत्याही घटनेकडे पाहण्याची त्यांची दृष्टी नेहमीच विशाल राहिली आहे. प्रत्येक घटनेचे विश्लेषण त्यांनी याच आधारे केले आहे. 'समाजात जाती असल्या तरी जातियता ही विकृती आहे, असेच शिक्षण मला प्राप्त झाले आहे.' (पत्ररूप श्रीगुरुजी - पृष्ठ २२९) असे स्पष्टपणे त्यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याकडेसुध्दा श्रीगुरुजी याच भावनेने पाहतात. भीमराव साहित्य संघ, मुंबईचे अध्यक्ष शिरीष कडलाक यांना डॉ. आंबेडकरांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त दि. ९.८.१९६३ रोजी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'वंदनीय डॉ. आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणे हे माझे स्वाभाविक कर्तव्य आहे.' डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना श्रीमंत् शंकराचार्यांची कुशाग्र बुध्दि व भगवान बुध्दांचे परमकारुणिक विशाल हृदय यांचा मेळ त्यांच्या जीवनात असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना ते म्हणतात, 'डॉ. आंबेडकरांनी अज्ञानात, दु:खात खितपत पडलेल्या व अवमानित अशा आपल्या समाजातील एका मोठया व महत्त्वाच्या भागाला आत्मसन्मानपूर्वक उभे केले ही त्यांची कामगिरी असामान्य आहे. आपल्या राष्ट्रावर हे अपार उपकार त्यांनी केले आहेत. त्यातून समाज उतराई होणे कठिण इतका श्रेष्ठ हा उपकार आहे.'' (पत्ररूप श्रीगुरुजी पृष्ठ २४४-४५)

पू. श्रीगुरुजींच्या याच विचारांचा, आचारांचा व भावनेचा प्रभाव तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांच्या मार्गदर्शनातून स्पष्ट होतो. १९७४ मध्ये वसंत व्याख्यानमाला पुणे येथे 'सामाजिक समता व हिंदू संघटन' या विषयावर दिलेल्या भाषणात, ‘If untouchability is not wrong, nothing in the world is wrong’ असे सुस्पष्टपणे सांगून जाती व्यवस्था ही व्यवस्था राहिली नसून ती अव्यवस्था झाली आहे. ती सर्वांनी मिळून घालविली पाहिजे. (It must go lock, stock and barrel) असे मार्गदर्शन केले आहे आणि ही भूमिका श्रीगुरुजींशी झालेल्या चर्चेचा परिपाक होता.

आज समग्र हिंदू समाजाचे संघटन करताना, हिंदुराष्ट्राचा सिध्दांत समाजावून सांगताना श्रीगुरुजींची ही वैश्विक (universal) भावना समजावून घेतली पाहिजे. हिंदूंना ‘Theocratic state’ मान्य नाही. राज्यव्यवस्था ही Secular च असली पाहिजे. ही हिंदुत्वाची भूमिका अत्यंत आग्रहाने श्रीगुरुजींनी मांडली आहे. समरसता हे एक जीवनमूल्य आहे. भारतीय संस्कृतीचे ते आदितत्त्व आहे. याचे ठाम समर्थन म्हणजे पू. श्रीगुरुजींचे प्रत्यक्ष जीवन होय. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये संपूर्ण समाजाला जोडणार्‍या, आत्यंतिक प्रेमाचा, सहिष्णुतेचा, विश्वमांगल्याचा हा अनुपम ठेवा जपला पाहिजे. त्याच आधारावर पुढील वाटचाल केली पाहिजे.

---------------------------------------------
साभार: सा. विवेक श्रीगुरुजी आणि सामाजिक समरसता विशेषांक