सरसंघचालकही स्वयंसेवक आहेत!

1971 साली कॅन्सरवर शस्त्रक्रिया झाली होती. पण पुढेही रोगाशी अटीतटीची झुंज चालूच होती. डॉ. प्रफुल्ल देसाईंची ऍलोपॅथिक औषधे व पं. रामनारायण शास्त्रींची आर्युर्वेदीय औषधे ही जणू झुंजीच्या रथाची दोन चाके होती! रोग व उपचार दोघेही प. पू. श्रीगुरुजींचे भारतभ्रमण रोखू शकले नाहीत.

1972 मध्ये मध्यभारत प्रांताचा संघशिक्षा वर्ग ग्वाल्हेरात होता. श्रीगुरुजी त्या वर्गाला भेट देण्यासाठी ग्वाल्हेरला आले. त्याच दिवशी योगायोगाने गिर्द मतदार संघात पोटनिवडणूक व्हावयाची होती. त्यामुळे श्री. अटल बिहारी वाजपेयी आणि राजमाता श्रीमती विजयाराजे शिंदे हे दोघेही ग्वाल्हेरात आले होते. सर्वांचे भोजन श्रीगुरुजींबरोबर वर्गाच्या ठिकाणीच होते. मधल्या रांगेत विशेष निमंत्रित व्यक्ती व श्रीगुरुजी जेवायला बसले होते. भोजन समाप्त झाल्यावर व्यवस्था प्रमुख श्री. माखनसिंह चौहान यांनी सूचना देण्यास प्रारंभ केला. शेवटची सूचना अशी होती - ''सर्व स्वयंसेवक आपापल्याच ठिकाणी बसून राहतील. फक्त मधल्या रांगेतील व्यक्तीच हात धुण्यासाठी प्रथम उठतील.'' श्री. अटल बिहारी, श्री. सकलेचाजी आदी आपापल्या जागी पत्रावळ हाती घेऊन श्रीगुरुजी केव्हा उठतात, याची वाट बघत उभे राहिले. परंतु श्रीगुरुजी उठले नाहीत. जेव्हा त्यांना आग्रह केला, तेव्हा ते मुक्तपणे हसून उदगारले, ''अहो, मी सुध्दा एक स्वयंसेवकच आहे. आताच जी सूचना दिली गेली ती काय आहे? स्वयंसेवक इथेच बसतील. मग मी कसा उठू शकेन?'' प्रतिष्ठितांना वाटले की, गुरुजी विनोद करीत आहेत. उठतील थोडया वेळात. परंतु श्रीगुरुजी आपल्या स्थानावरून उठले नाहीत. आपली चूक कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्याने शिट्टी वाजवून पुन्हा सूचना केली - ''सर्व स्वयंसेवक उठू शकतात.'' तेव्हा कुठे श्रीगुरुजी आपल्या स्थानावरून उठले!

आपण स्वयंसेवक आहोत याचे भान श्रीगुरुजींना प्रत्येक क्षणी असे. सूचनांचे अक्षरश: पालन करणे हा त्यांचा स्वभाव होता.

मंत्र छोटा, तंत्र सोपे, परी यशस्वी ठरले ते
रीत साधी, शिस्त बांधी, कार्य व्यापक उभवीते ॥ धृ ॥
व्यक्ती व्यक्ती जमवुनी भवती, जागृत करणे तयाप्रती
मनात प्रीती, हृदयी भक्ती, सेवा करणे नि:स्वार्थी ॥ 1 ॥