हजरजबाबीपणा, नर्म विनोद

थट्टा, विनोदाची हातोटी!

एकदा श्रीगुरुजी उत्तर प्रदेशचे मा. प्रांत संघचालक बॅ. नरेंद्रजित सिंह यांच्याबरोबर गप्पागोष्टी करत होते. बॅरिस्टर साहेबांनी वेदान्तशास्त्र शब्दात मांडण्याचा प्रयत्न करताना जेव्हा असे म्हटले की, वेदान्तशास्त्र हे अशा एका प्रयत्त्नाचे नाव आहे, जो प्रयत्त्न म्हणजे रात्री एक अंधे¬या खोलीत काळया मांजराचा शोध घेणे होय. बॅरिस्टर साहेबांचे इंग्लीश वाक्य अशा प्रकारचे होते की, 'सर्चिंग ए ब्लॅक कॅट इन ए डार्करूम'. हे वाक्य पुरे होते न होते तोच श्रीगुरुजींनी म्हटले की, व्हिच इज नॉट देअर. (अंधा¬या खोलीत अशा मांजराचा शोध जे तेथे नाहीच) आणि सारे वातावरण हास्याच्या फवा¬यांनी भरून गेले.

सन् १९४३ मध्ये मेरठ येथील देवनागरी कॉलेजमध्ये संघ शिक्षा वर्ग सुरू होता. समारोप प्रसंगी जागेच्या अभावी व्यासपीठासाठी व्हरांडयाचा उपयोग केला गेला. व्यासपीठ अशा पध्दतीने तयार केले गेले होते की, त्याचा अर्धा भाग व्हरांडयाच्या दरवाजाच्या बाहेर होता आणि अर्धा आत. वक्त्याने दरवाज्याच्या खाली उभे रहावे अशी योजना होती. श्रीगुरुजी, सर्वाधिकारी लाला रामेश्वरदयालांबरोबर व्यासपीठापाशी आले. श्रीगुरुजींची भरभर चालण्याची सवय! त्यामुळे स्वाभाविकपणे ते व्यासपीठावर आधी आले. परंतु ज्यांनी व्यासपीठ तयार केले त्यांनी लक्षपूर्वक काम न केल्यामुळे व्यासपीठ आणि दरवाजाची उंची यात इतके थोडे अंतर राहिले होते की, जसे श्रीगुरुजी व्यासपीठावर चढले, त्यांच्या डोक्यास मेहरप इतक्या जोराने लागली की, डोक्यास खोकच पडावी. परंतु श्रीगुरुजी रागावले नाहीत. ते लगेच लालाजींकडे वळून म्हणाले, ''माझ्या डोक्यावर भरपूर केस आहेत, परंतु आपण मात्र सांभाळून राहा कारण आपल्या डोक्यावर केस नाहीत.''

त्रास झाला तरी त्याचा परिणाम न होऊ देण्याकरिता थट्टा, विनोद यांचा उपयोग करण्याची श्रीगुरुजींची हातोटी निश्चितच विलक्षण होती.

- माधवराव देवळे

संघ व जनसंघ यातील अंतर

कार्यक्रमाच्या दरम्यान एका बैठकीत एका व्यक्तीने प्रश्न विचारला, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'' आणि ''भारतीय जनसंघ'' यात किती अंतर आहे?'' मी आणि माझा भाऊ दोन वेगवेगळया घरात राहात होतो. श्रीगुरुजी माझ्या घरी उतरले होते. आमच्या भावाच्या घरावर भारतीय जनसंघाचा झेंडा लागला होता. श्रीगुरुजींनी लगेच उत्तर दिले, ''हे घर आणि ते घर यात जेवढे अंतर आहे तेवढेच.''

- रामदुलारे मिश्र

इंग्लीश-उर्दूच्या प्रश्नावर श्रीगुरुजींशी महत्त्वाची मुलाखत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्रीगुरुजी राष्ट्राचे द्रष्टे, तपस्वी तसेच तेजस्वी पुरुष होते. आज ते आपल्यात नाहीत; पण वेळोवेळी व्यक्त केले गेलेले त्यांचे विचार, इशारे आणि सल्ले सदैव राष्ट्राला प्रेरणा देत राहतील.

मी 'हिंदुस्थान समाचार'च्या संपादकीय विभागात काम करत असतानाचा एक प्रसंग. एक दिवस मला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय! या मुलाखतीचे विवरण माझ्या पत्रकार डायरीचा अमोल ठेवा आहे. तो अमोल ठेवा या लेखात मी शब्दांकित करतोय.

२९ सप्टेंबर १९६९ रोजी सकाळी साडेनऊची वेळ.

दिल्लीचे तत्कालीन महापौर श्री. लाला हंसराज गुप्ता यांच्या घरी, मी आपले पत्रकार मित्र श्री. ओमप्रकाश पंडितांबरोबर सरसंघचालक गोळवलकर यांची भेट घेण्यासाठी गेलो. तेव्हा श्री. माधवराव मुळे यांनी म्हटले की, बसा ते आताच बाहेर येतील. थोडयाच वेळात श्रीगुरुजी खोलीतून बाहेर आले आणि एका खुर्चीवर बसले.

'हिंदुस्थान समाचार' चे विशेष प्रतिनिधी श्री. ना. बा. लेले यांनी विषयास सुरुवात केली.....'' प्रादेशिक भाषा लागू करण्याच्या बाबतीत सरकारचे म्हणणे आहे की हे हळूहळू केले जाईल, तसेच इंग्लीश त्वरित हटविणे ठीक होणार नाही, यावर आपले काय मत आहे?'' हा प्रश्न ऐकताच श्रीगुरुजींनी गंभीर होत म्हटले की, हळूहळू लागू करण्याची गोष्ट अव्यावहारिक व धोकाजनक आहे. जे काम करायचे असते ते लगेच केले जाते, उशीर होण्याचा अर्थ दुसराच होतो.

श्रीगुरुजींनी क्षणभर थांबून एक उदाहरण दिले, ''सन १९३२ ची इंग्रजी राज्यातील गोष्ट आहे. तत्कालीन महाकोशल विदर्भ राज्यात तत्कालीन शिक्षण विभागाचे प्रमुख श्री. नारायणराव केळकर यांनी प्रदेशात मराठी व हिंदी भाषा त्वरित लागू केल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला की, थोडयाच काळात हिंदी व मराठीत पाठयपुस्तके तयार होऊ लागली आणि दोन्ही भाषांचा घरोघर प्रचार झाला. त्यांच्यासमोर कोणतीही अडचण आली नाही.

त्यांनी दुसरे उदाहरण म्यानमार (ब्रह्मदेश)चे दिले. त्याने स्वतंत्र होताच आपली भाषा लगेच लागू केली होती. त्यांच्याही समोर कोणती अडचण आली नाही.

श्रीगुरुजी पुढे म्हणाले, ''वास्तविक कारण तर असे आहे की, आपले सरकार इंग्रजीच्या मोहात इतक्या वाईट पध्दतीने जखडून गेले आहे की, ते यातून बाहेर पडायला तयार नाही. आपल्या सरकारला इंग्रजीचा मोह का आहे, कोण जाणे?''

मी म्हटले, ''त्यांचे म्हणणे आहे की इंग्रजी हटवल्याने ज्ञानाची खिडकी बंद होईल. विज्ञानाची प्रगती थांबेल.''

श्रीगुरुजींनी म्हटले, ''हा भ्रम आहे. जगाच्या सर्व विकसित देशांमध्ये आपापली भाषा हेच शिक्षणाचे माध्यम आहे. तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. श्री. सी. व्ही. रामन रशियास जाऊन आले. मी त्यांना विचारले की, आपण तर इंग्रजीतून काम केले असेल, भाषणे केली असतील. ते म्हणाले की, तेथे इंग्रजी कोण जाणतो? मला जर्मन भाषेतून बोलावे लागले. वस्तुस्थिती अशी आहे की, रशिया, चीन, जर्मनी इ. सर्व विकसित देशांमध्ये आपापल्या भाषाच शिक्षणाचे माध्यम आहे. तेथे राज्यघटनाही आपापल्या भाषेतून विकसित झालेली आहे. येथे तर लोकांना बहकवले जाते की, इंग्रजी हटवल्याने ज्ञानाची खिडकी बंद होईल. आपले तर असे म्हणणे आहे की, इंग्रजी हटवल्याने खिडकीऐवजी मोठा दरवाजाच उघडेल.''

दरवाजाची गोष्ट ऐकून सर्वजण खोखो हसू लागले.

- शिवकुमार गोयल

केवळ नावाचे चतुर्वेदी

श्रीगुरुजी मोठया विनोदी स्वभावाची व्यक्ती होती. त्यांच्या बोधकथा तसेच उदाहरणे मोठी प्रेरक असत. त्यांनी म्हटले की, आजच्या तरुणांनी आपल्या भाषेबरोबर आपली संस्कृतीही सोडलेली आहे. ते नावे तर लावतात चतुर्वेदी, त्रिवेदी, द्विवेदी; परंतु धर्मासंबंधी एक अक्षर जाणत नाहीत.

त्यांनी एक उदाहरण दिले. एकदा चतुर्वेदी नावाचे सद़्गृहस्थ पश्चिम जर्मनीला जाण्यास निघाले. भारतातून चतुर्वेदी आपल्या देशात येणार हे कळताच जर्मनीत धामधूम उडून गेली. कारण त्यांची कल्पना अशी की, आपल्या देशात चतुर्वेदी येणार म्हणजे ज्या देशाचा प्राणच धर्म आहे अशा भारत देशातून चारही वेदांचे महान विद्वान आपल्याकडे येणार. जर्मनीने चारही वेदांच्या नावाने विशाल प्रवेशद्वार उभारली, त्यांच्या सन्मानार्थ ठिकठिकाणी कार्यक्रम ठेवले, संस्कृतमध्ये मानपत्रे तयार केली. परंतु जेव्हा चतुर्वेदी महाराज सुटाबुटात विमानातून उतरले तेव्हा त्यांची कल्पना चक्काचूर झाली. जेव्हा चतुर्वेदी यांनी संस्कृतचेही अज्ञान प्रकट केले तेव्हा तर त्यांना फारच मोठा धक्का बसला. त्यांनी श्री. चतुर्वेदींचे सर्व कार्यक्रम रद्द केले.

ही घटना सांगितल्यावर श्रीगुरुजी म्हणाले, ''मी तर सर्व ठिकाणी हेच सांगतो की, नावाच्या पुढे चतुर्वेदी, त्रिवेदी, द्विवेदी सारखे शब्द लावणे बंद केले पाहिजे. यामुळे उपहास मात्र होतो.''

- शिवकुमार गोयल

श्रीगुरुजींचा हास्यविनोद

सन् १९६४ च्या डिसेंबर महिन्यात कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांची शिबीरे योजलेली होती. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या भांडणतंटयामुळे मेरठ भागात संचारबंदी होती. त्यामुळे मेरठ विभागातील काही कार्यकर्ते वृंदावनच्या शिबीरात, तर काही हरिद्वारच्या शिबीरात गेले होते. मी वृंदावनच्या शिबीरात श्रीगुरुजींच्या व्यवस्थेत होतो. एक दिवस सर्व स्वयंसेवकांचे दुपारचे जेवण ब्रह्मचारींच्या आश्रमात होते. सुमारे पाच कि. मी. चा रस्ता पार करावयाचा होता. श्रीगुरुजींसमवेत मा. जिल्हा संघचालक श्री. किशोरीलाल मुख्तियार कारने जायचे होते. श्री. मुख्तियार यांना थोडी दाढी होती. वाटेत जेथे कोठे कार थांबत असे तेथे लोक उत्सुकतेने श्रीगुरुजींना पहात असत.

श्रीगुरुजी गालातल्या गालात हसत मुख्तियारांकडे खूण करून लोकांना सांगत की गुरुजी हे आहेत. दोघांनाही दाढी असल्याने लोक अचंब्यात पडत. श्री. मुख्तियारांनी लगेच हसत म्हटले की, गुरुजी तर हे आहेत. आपल्या दाढीकडे खूण करून पुन्हा सांगितले की, मास्टर तारा सिंह (तत्कालीन प्रसिध्द शीख नेता) पूजनीय श्रीगुरुजींना शरण आला आहे. या वाक्यावर श्रीगुरुजी मोकळेपणाने हसले. त्या खळखळून हसण्याची आठवण आजही मनाला प्रफुल्लित करते.

- चंद्रभान गुप्ता

शोधायला सोपे

श्री. विष्णुजी शरीराने बरेच लठ्ठ होते, तसे ते विनोदीही होते. ते परिचय करून देण्यासाठी उभे राहिले की सगळे स्वयंसेवक खळखळून हसत असत. श्रीगुरुजी रुग्णालयातील रुग्ण स्वयंसेवकांची व्यवस्था पहात पहात मैदानाकडे निघाले. तेथे काही स्वयंसेवक झोपले होते. चारी बाजूंनी नजर टाकून श्रीगुरुजींनी विचारले की मधेच दिसणारा तो उंच ढीग कशाचा आहे? मी म्हणालो की, ते मेरठचे स्वयंसेवक विष्णुजी आहेत. ते झोपले आहेत. श्रीगुरुजी आणि आम्ही सगळे हसलो. श्रीगुरुजी म्हणाले की, वीज प्रमुख, पाणी प्रमुख यांची केव्हाही गरज भासत असते. त्यांची विष्णुंजवळ झोपण्याची व्यवस्था करायला हवी म्हणजे त्यांना शोधायला त्रास पडणार नाही. लांबून जेथून कुठून उंच ढीग दिसेल, तेथे ते लोक आहेत असे समजायचे.

- बाबूलाल शर्मा

सौम्य थट्टेतून बोध

श्रीगुरुजींचा हास्यविनोद आणि थट्टाही प्रेरक असे. हरियाणात रोहतकमध्ये मा. संघचालक रामचंद्र सिंगला यांच्या घरी क़ार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत तत्कालीन जनसंघाचे प्रमुख कार्यकर्ते डॉ. मंगलसेनही होते. त्या काळी डॉ. मंगलसेन यांचे पोट सुटलेले होते. ते जेव्हा परिचयासाठी उभे राहिले तेव्हा श्रीगुरुजींनी त्यांना विचारले, तुम्ही सूर्यनमस्कार घालता का? आणि मग सल्ला दिला की, एक खड्डा खणा आणि नंतर सूर्य नमस्कार घाला. म्हणजे नमस्कार घालताना पोट खड्डयात जाईल. हा सल्लाही होता, प्रकृती नीट ठेवण्यासाठी, आणि सौम्य थट्टाही होती, मनाला न बोचणारी.

- डॉ. प्रेमचंद जैन

'हिंदुत्व' कुठला 'इजम' नाही

सन् १९५२ ची गोष्ट आहे. चंद्रपूरमध्ये एका सद़्गृहस्थाने श्रीगुरुजींना विचारले, ''संघ कोणत्या वादाचे (इजम) समर्थन करतो? तो भांडवलशाहीचा पुरस्कर्ता आहे की फॅसिस्ट आहे; का समाजवाद तसेच साम्यवादाचा समर्थक आहे?'' श्रीगुरुजींनी उत्तर दिले, ''संघ यातील कोणत्याही 'वादा'चा समर्थक नाही. 'हिंदुत्वा'चा समर्थक आहे. त्याचा आधारच 'हिंदुत्व' आहे.'' त्या सद़्गृहस्थाने म्हटले, ''परंतु हिंदुत्व तर काही कोणता 'वाद' नाही. हिंदू इजम इज नो इजम्. इट इज नॉट इंटरनॅशनली नोन ऍज ए सोशल ऍंड एकॉनॉमिक फिलॉसफी.'' श्रीगुरुजींनी उत्तरादाखल एक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले, ''एक भारतीय शेतकरी परदेशी लोकांना हत्तीसंबंधी सांगत होता. त्या परदेशी माणसांनी हत्ती कधी बघितला नव्हता. त्यांनी विचारले की, हत्ती कसा असतो? घोडयासारखा, गाढवासारखा, बैलासारखा की उंटासारखा? शेतकरी म्हणाला की, हत्ती, या कोणासारखा नाही, तो आपल्यासारखा असतो. परदेशी माणसे म्हणाली की, परंतु आम्ही तर असा प्राणी आमच्या देशात कधी पाहिला नाही. त्या शेतक¬याने उत्तर दिले की, 'याचा अर्थ असा होत नाही की हत्ती नावाचा कोणी प्राणीच नाही किंवा तो तुच्छ आहे.''

हा किस्सा ऐकून संघाचा 'इजम' विचारणारे सद्गृहस्थ हसले आणि निरुत्तर झाले.

- वा. नी. देशमुख

जरा व्याकरणही पहा

१९६५ ची गोष्ट. बंगलूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक चालू होती. आपला परिचय देताना एक स्वयंसेवक म्हणाला की, नेम..... शामण्णा आर... झटकन् श्रीगुरुजींनी म्हटले, ''नो, नो, यू शुड से शामण्णा इज.''
बैठकीतील सगळेजण पोट धरधरून हसले.

- वा. नी. देशमुख