हिंदू राष्ट्र सर्वांनाच मान्य होईल
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
काही लोक असे म्हणतील की, आपल्या हिंदू राष्ट्राचा विचार आपण मांडला तर सर्व लोक तो विचार मानणार नाहीत. परंतु हे सत्य काही लोक आज मान्य करोत वा न करोत त्यामुळे काही बिघडत नाही. आपला दृष्टिकोन स्पष्ट असेल आणि त्याबाबतीत आपल्या मनात पूर्ण विश्वास असेल तर मग आग्रहपूर्वक प्रतिपादन केल्यानंतर जी बाब सत्य आहे ती बाब लोक मान्य करावयास लागतील. आपणा सर्वांनाच हा अनुभव आला असेल आणि मलाही खात्री आहे की, लोक मान्य करू लागतात.
एखादा जर असे म्हणेल की, हा विश्वास मानावयास मी तयार नाही तर तो त्याचा दुबळेपणा आहे. आपापल्या क्षेत्रात विशेषकरून आपला सुस्पष्ट असा भाव अधिकाधिक प्रमाणात आपण लोकांना समजावून सांगितला तर नवीन नवीन मंडळी आपल्याजवळ येतील आणि आपले काय म्हणणे आहे तेही चांगल्या प्रकारे समजावून घेतील. यात कठीण असे काहीच नाही. पण आपणच दुबळे बनुन आपल्या ध्येयाच्या संबंधात लाचारीने बोलावयास लागलो तर मग साराच ग्रंथ आटोपेल आणि मग ध्येयाला पोषक ठरण्याऐवजी ही एक संकट उत्पन्न करणारी बाब ठरेल. ध्येयाबरोबरच आपण चारित्र्याचाही आदर्श ठेवला पाहिजे. आपण, सर्वांना समान असे एक राष्ट्रीय आणि सार्वजनिक चारित्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यात काही अंशी आपल्याला यशही मिळालेले आहे. डॉ. मुंजे स्मारक समितीकडून निधिसंकलनासाठी जनतेला आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या विनंतिपत्रकावर कुणाच्या सह्या असाव्यात यावर विचार झाला. आता ज्याच्याजवळ स्वत:चा असा पैसा नाही अशा माझ्यासारख्या व्यक्तीची त्या विनंतिपत्रकावर सही पाहिल्यावर कोण पैसा देणार? म्हणुन निरनिराळया प्रांतांतील सात व्यक्तींची नावे निवडली गेली. त्यात दक्षिणेतून राजाजींचे नाव होते. त्यांना भेटून त्यांची परवानगी घ्यावी म्हणून मी आपल्या मद्रास शाखेच्या संघचालकांना पत्र पाठवून सूचित केले. तेव्हा राजाजी त्यांना म्हणाले, ''निधिसंकलनासाठी काढण्यात येणाऱ्या कोणत्याही विनंतिपत्रकावर सही करावयाची नाही असा मी निर्णय घेतलेला आहे. कारण मला याचा फार वाईट अनुभव आलेला आहे,'' त्या संघचालकांजवळ माझे राजाजींना लिहिलेले पत्र होते. त्या पत्रात राजाजींनी विनंतिपत्रकावर सही करावी अशी मी त्यांना विनंती केलेली होती. राजाजींजवळ माझे हे संघचालकांनी दिलेले पत्र असल्यामुळे राजाजी म्हणाले, ''माझा त्यांच्यावर भरवसा आहे. ज्या कार्यासाठी ते पैसा गोळा करतील त्यावरच तो खर्च करतील.'' त्यांनी विनंतिपत्रकावर सही केली. लोक आपल्यावर कसा विश्वास टाकतात त्याचे हे एक उदाहरण आहे. म्हणून आपल्याला जी निरनिराळया प्रकारची कामे करावयाची आहेत त्यात आपला व्यवहार अतिशय शुध्द असला पाहिजे.