सर्वत्र यशच यश
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
याचबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवावे लागेल की, शाखेशिवाय आपण ही निरनिराळी कामे करू शकणार नाही. जिथे आपली शाखा चांगल्या प्रकारे चालते तिथे कोणतेही कार्य आपण हाती घेतले तरी ते आपण हमखास यशस्वी करू शकू. म्हणून संघशाखेचे कार्यक्रम, आचारपध्दती, स्वयंसेवकांची वागणूक, स्वयंसेवकांचा स्वभाव तसेच त्यांचा गुणोत्कर्ष आदी गोष्टींकडे आपण लक्ष द्यावे आणि या बाबींचा प्रसार करणे आणि त्या दृढ करणे यासाठी एकाग्रतेने प्रयत्न करावा. इतके जर आपण केले तर सर्व क्षेत्रांवर आपण यश मिळवू शकू आणि जितके हे कार्य सुदृढ प्रकारे चालेल आणि ते जितके आम्ही एकदिलाने करू तितके सर्वत्र आपल्याला यशच यश मिळत जाईल, यावर माझी अगदी पूर्ण श्रध्दा आहे.
 
मानवप्रतिष्ठा संकटात
देशाच्या परिस्थितीच्या बाबतीत आपल्याला हे दिसते आहे की, दिवसेंदिवस साऱ्या देशाची परिस्थिती ही हुकुमशाहीकडे वेगाने जात आहे. लोक असे म्हणतात की, रशियासारखी हुकुमशाही येथे येत आहे. हुकुमशाही कोणतीही असो, कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्याने मनुष्य प्रचाराचा कसा गुलाम बनून जातो हे आज आपल्याला दिसून येत आहे. आजकाल सरकारीकरणाचा प्रचार होत आहे. तेच वारे आज वाहात असल्यामुळे सर्वच आवश्यक वस्तूंच्या सरकारीकरणाची मागणी केली जात आहे. नागपूरच्या मिर्ची व्यापाऱ्यांनीसुध्दा संपूर्ण मिर्ची व्यापार सरकारने आपल्या हाती घ्यावा, असा ठराव पास करून मागणी केली आहे. केवळ अन्नधान्याचेच सरकारीकरण करून भागणार नाही तर सर्वच वस्तूंचे सरकारीकरण केले पाहिजे, असे एका मोठया काँग्रेसी नेत्याने नुकतेच म्हटले आहे. लोकांना असे वाटते की, सरकारीकरण हा सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे.
 
याचबरोबर लोक असेही म्हणतात की, आपले हे सरकार सोने जरी जाती धरील तरी त्याची माती होईल. नोव्हेंबरच्या अखेरीस मी इंदूरला होतो. तिथे वृत्तपत्रांतून अशी बातमी वाचण्यात आली की, सरकारी गहू-गोदामात मातीची मोठमोठी ढेकले निघाली व त्या ढेकळांना कुठे कुठे थोडासा गहू चिकटलेला होता. सरकारीकरणाची अशी ही अवस्था आहे. तरीही प्रचाराची केवढी हवा आहे! लोकांचा कलही सरकारीकरणाकडेच आहे. आज देशात अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे की, काही मूठभरच लोक सत्ताधारी असावेत आणि बाकीचे सर्व गुलाम! मानवाच्या प्रतिष्ठेचा जो भाव निर्माण व्हावयास हवा होता तो कुठे आहे? तो तर गुलाम म्हणजेच अगदी कुत्र्यासारखा ठरत चालला आहे. त्याच्यात कसल्याही प्रकारची तेजस्विता उरलेली नाही. मारही खावा लागला तरी भाकरीच्या तुकडयासाठी तो लाळ गाळतोच.
अशा या अवस्थेत माणसाची तसेच राष्ट्राची अस्मिता आणि चारित्र्य जागृत करण्यासाठी तसेच राष्ट्राची प्रतिष्ठा सर्व प्रकारे अक्षुण्ण राखण्यास समर्थ अशा समाजाची संघटित शक्ती निर्माण करण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आपल्या कार्याचा विस्तार आणि त्याचे दृढीकरण यातूनच हे शक्य होऊ शकेल. यासाठी एकेका व्यक्तीस आपल्या संपर्कात आणून कार्यासाठी उभे करावे लागेल. मनुष्य किती लाचार बनतो याचा अनुभव मी घेतला आहे. 1947 नंतर सिंधमधून आलेल्या निर्वासितांच्या वस्तीत मी गेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितले की, त्यांच्या घरांवर छप्पर टाकण्यासाठी काँग्रेस अधिवेशनासाठी मागविण्यात आलेली टिनाची पत्रे टाकली जातील, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु नंतर मात्र त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. टिनाची ती पत्रे त्यांना मिळाली नाहीतच, पण काळया बाजारात मात्र ती विकण्यात आली आणि त्यावर खूप नफा कमाविण्यात आला. आपण माझ्याकडे ही तक्रार करून काय होणार, असे मी त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी हा प्रश्न उपस्थित करावा अशी आमची इच्छा आहे. निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाला मत दिले होते, असे विचारले असता त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मी समजलो आणि त्यांना म्हणालो, ''तुम्ही मत एकाला द्याल आणि प्रश्न दुसऱ्याने उपस्थित करावेत, हे कसे चालेल ? त्यांनी तुमचे प्रश्न उपस्थित करावे असे वाटत असेल तर तुम्हाला त्यांना मते द्यावी लागतील.'' माणसाची आज ही अशी अवस्था झाली आहे. स्वार्थासाठी तो लांगूलचालन करीत आहे. समाजाची ही अवस्था बदलावयाची तर त्याला आत्मविश्वासयुक्त आणि स्वाभिमानी बनवावे लागेल. संघटित सामर्थ्य असेल तरच समाज सार्वभौम होऊ शकतो. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या शाखांचा विस्तार करणे आणि त्या सृदृढ करणे तसेच व्यक्ती-व्यक्तींमध्ये गुणसंवर्धन करणे याकडे लक्ष द्यावे लागेल.
आज देशात विघटनकारी शक्ती हातपाय पसरत आहेत. परकीय शक्ती यातून फायदा उपटण्यासाठी सिध्द आहेत. आसामात झालेल्या भाषिक दंगलीमागे परकीय शक्तींचा हात होता. हरिजनांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संबंधात ज्या भडक बातम्या प्रसिध्द होत असतात त्यामागे परकीय वृत्तवितरण संस्थांचा हात दिसतो. हिंदू समाज जर फोडला तरच तेथे त्यांना प्रभुत्व कायम करता येईल हे परकीय शक्तींनी चांगल्या प्रकारे जाणलेले आहे. हिंदू-मुसलमान भांडणाचे वृत्त देताना जातीच्या नावाचा उल्लेख करण्यावर प्रतिबंध आहे. सवर्ण हिंदू-हरिजन, ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर असे वाद भडकविणारे वृत्त मात्र दिले जाते. या प्रकारे समाजाच्या एकतेवर आघात करणाऱ्या प्रक्षोभक बातम्यांच्या प्रचारामागे परकीय शक्तींचा डाव आहे आणि भारतात त्याच परकीय शक्तींच्या सामर्थ्याच्या प्रभावामुळे अजूनपर्यंत या दिशेने कोणतीही प्रतिबंधक योजना केली जात नाही, असा मला दाट संशयआहे.
अशा संकटपूर्ण अवस्थेत समाजाचे एकीकरण आणि राष्ट्रीयत्वाची जागृती याचे कार्य पूर्ण करण्यात आपण यशस्वी झालो नाही. ज्या प्रमाणात आपण हे कार्य यशस्वी करू आणि सर्वांच्या समोर आपल्या कार्याचा एक ठोस आदर्श समोर ठेवू शकू तितक्या प्रमाणात हा परकीय हस्तक्षेप दूर होऊन आपल्या देशात एकात्मता आणि परस्परस्नेह यांचे वातावरण पाहावयास मिळेल. आपली ही जबाबदारी ओळखून आपण कार्याचा सर्व प्रकारे विचार केला पाहिजे, तसेच त्याच्या विस्तारासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना चहूबाजूंच्या कार्यात कामाला लावले पाहिजे. येथे संपूर्ण देशातून प्रतिनिधी आले आहेत. त्यांनी आपल्या क्षेत्रात या दृष्टीने प्रयत्न करावेत. यावेळी मी इतकेच सांगतो आहे.
आज तर मी बोललो आहे. पुढच्या खेपेला परमेश्वर बोलण्याची संधी देतो की नाही कोण जाणे - बस्स !