नि:स्पृहता - निर्मळपणा
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
स्वत:विषयी कठोर, दुस¬यांविषयी अत्यंत सहृदय
श्रीगुरुजी स्वत:विषयी अतिशय कठोर होते. सर्वसामान्यपणे असे दिसते की, स्वत:विषयी अतिशय कठोर राहणारा, दुस¬यांविषयीही, तितकाच कठोर राहतो, दुस¬यांना त्रास देत राहतो. श्रीगुरुजींची विशेषता ही होती की, त्यांचा स्वभाव असा नव्हता. ते दुस¬यांशी व्यवहार करताना अत्यंत सहृदयतेने वागत. जेव्हा मी त्यांच्या घरी रहायला गेलो होतो तेव्हा मला असा अनुभव आला. ही काही मला भूषणावह गोष्ट नाही पण तरी सांगतो की, व्यवस्थित राहण्याचा माझा स्वभाव नव्हता. सकाळी उठल्याबरोबर आपले अंथरुण-पांघरुण नीट गुंडाळून ठरलेल्या ठिकाणी ठेवायची मला सवय नव्हती. श्रीगुरुजींच्या घरी पहिल्या मजल्यावर मी रहात होतो, जवळच श्रीगुरुजींची खोली होती. मला सकाळीच लॉ कॉलेजमध्ये जावे लागे, त्यामुळे सकाळी लवकर उठून, प्रातर्विधी आटोपून, चहा घेऊन मी कॉलेजला जात असे. या गडबडीत आपले अंथरुण-पांघरुण गुंडाळून ठरलेल्या ठिकाणी ठेवायला मी विसरत असे. कॉलेजमध्ये गेले की, आठवण व्हायची की आपण आपले अंथरुण पांघरुण न गुंडाळताच आलो. पण कॉलेजमधून घरी परत आल्यावर मी पहात असे की अंथरुण-पांघरुण गुंडाळून ठरलेल्या ठिकाणी ठेवलेले आहे. खोलीत मी आणि नाना वैद्य दोघेच राहत होतो. मी नानाला म्हटले की, मला माफ कर, माझे अंथरुण-पांघरुण तुलाच गुंडाळून ठेवावे लागते त्यामुळे तुला त्रास होतो. परंतु काय करू, माझी ही सवयच वाईट. नाना म्हणाला की, तुझे अंथरुण-पांघरुण तेथे नसते. हे ऐकून मी घाबरून गेलो. मी ठरविले की, दुस¬या दिवशी कॉलेजमध्ये न जाता माळयावर जाऊन बसायचे आणि आपले अंथरुण-पांघरुण कोण गुंडाळून ठेवतो ते पहायचे. दुस¬या दिवशी मी तसे केल्यावर मला दिसले की, स्वत: श्रीगुरुजींनीच माझे अंथरुण-पांघरुण गुंडाळून ठरलेल्या ठिकाणी ठेवले होते. यासंबंधी त्यांनी मला कधी काही म्हटले नाही, टोमणा मारणे तर दूरच. स्वत:विषयी कठोर पण दुस¬यासंबंधी उदारता, ही त्यांची विशेषता होती.
- दत्तोपंत ठेंगडी
 
पूर्ण अनौपचारिक वातावरण
पहिल्यांदाच भेटताना लोकांना वाटते की, हा दाढी जटाधारी (श्रीगुरुजी) - एवढा श्रेष्ठ पुरुष - याच्या जवळ कसे जायचे? त्यांना संकोच वाटतो. परंतु जवळ गेल्यावर आपण एखाद्या श्रेष्ठ पुरुषाशी बोलत आहोत हे ते विसरून जातात. रात्रीच्या बैठकीत हलक्या फुलक्या गोष्टी थट्टाही चालत असे. किती अनौपचारिक मोकळे वातावरण रहात असे! एका दिवसाची मला आठवण आहे. बच्छराज व्यास नेहमी रात्री पावणेबारा वाजता बैठकीत येत असत. त्यांना ठाऊक असे की, बैठक रात्री बाराला संपायची. एके दिवशी रात्रीचे बारा वाजायला पाच मिनिटे कमी होती. अजून बच्छराजजी आले नव्हते. कोणी तरी म्हटले की, ते बहुतेक यायचे नाहीत. अनौपचारिक चर्चेत 'मेरा जूता है जपानी, पतलून इंग्लिस्तानी, सिर पर लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी' या आशयाच्या प्रचलित सिनेमातील गाण्याची थट्टा चालली होती. बैठकीतील एका किशोर स्वयंसेवकाने सांगितले की, बच्छराज आले आहेत. कोणीतरी त्यांना म्हटले की, 'मेरा जूता है जपानी...' या गाण्याची चर्चा चाललेली होती आणि ते गाणे ऐकण्याची श्रीगुरुजींची इच्छा आहे. गुरुजींची इच्छा आहे असे म्हटल्याबरोबर बच्छराज मांडा ठोकून बसले आणि त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली. सिनेमात जसे ताल, सूर अगदी तसेच जमवून गाणे चालले होते. कसल्याही प्रकारची औपचारिकता बैठकीत नव्हती.
- दत्तोपंत ठेंगडी
 
योग्य पध्दती आणि मर्यादांचे पालन
नागपूरमध्ये स्वामी विवेकानंद जन्म शताब्दी समारंभ व्यापक प्रमाणात साजरा व्हावा यासाठी स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांची एक समिती तयार करण्यात आलेली होती. त्या समितीचा मी पण एक सभासद होतो. या समारंभाच्या संदर्भात मला श्रीगुरुजींशी चर्चा करावयाची होती. श्रीगुरुजींना भेटण्यासाठी मी संघाच्या कार्यालयात गेलो. जेव्हा गेलो तेव्हा संघस्थानावर प्रार्थनेसाठी संपत होत होते. श्रीगुरुजी स्वत: संघस्थानावर उपस्थित होते.
 
मीही एका रांगेत उभा राहिलो. मला रांगेत पाहून श्रीगुरुजी माझ्याजवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात टाकून मला म्हणाले की, प्रार्थनेनंतर मला अवश्य भेट.
 
प्रार्थना झाल्यावर मी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितले की, त्यांचे मित्र स्वामी अपूर्वानंदांनी स्वामी विवेकानंदांचे एक चांगले जीवनचरित्र बंगाली भाषेत लिहिले आहे. नागपूर समितीने त्याचा हिंदी तसेच मराठीत अनुवाद करण्याची व्यवस्था अवश्य करावी.
 
मी समितीद्वारे ते काम करवून घेतले. श्रीगुरुजींनी दोन्ही पुस्तके पाहून समाधान व्यक्त केले. मलाही खूप समाधान मिळाले.
श्रीगुरुजी आदेश देऊन हे काम माझ्याकडून करवून घेऊ शकले असते. परंतु कोणतेही काम योग्य पध्दतीने आणि मर्यादांचे पालन करून केले पाहिजे याचा जणु ज्वलंत आदर्शच त्यांनी सर्वांच्या समोर ठेवला.
- श्री. कासखेडीकर