अद्भुत क्षमता, विलक्षण प्रतिभा
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
एका कम्युनिस्ट विचारवंताचा अनुभव
निष्ठावान कम्युनिस्ट विचारवंत आणि पश्चिम बंगाल सरकारचे माजी अर्थमंत्री डॉ. अशोक मित्र यांनी कलकत्त्याहून प्रसिध्द होणारे दैनिक 'आजकल'च्या ९ जून १९९१ च्या अंकात 'गाय की कहानी, गुरू की कहानी' या मथळयाखाली एक लेख लिहिला. या लेखात गोहत्याबंदी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. ७ नोव्हेंबर १९६६ रोजी संसद मार्गावर गोभक्तांचे बळी गेल्यावर सरकारने एक समिती नेमली होती. या समितीत पुरीचे जगद्गुरू शंकराचार्य, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे वडील बंधू, न्यायमूर्ती रमा प्रसाद मुखर्जी आणि श्रीगुरुजी यांना विशेष निमंत्रित म्हणून घेतले होते. हा उल्लेख करताना डॉ. अशोक मित्र यांनी आपल्या वर उल्लेख केलेल्या लेखात म्हटले आहे, ''आम्हाला सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का दिला तो श्रीगुरुजींनी..... त्यांच्या कठोर स्वभावाविषयी बरेच ऐकले होते..... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते प्रतिष्ठित नेते होते, पण त्याबरोबरच ते अंधश्रध्दा आणि गंभीर दहशतीचेही केंद्रबिंदू होते. परंतु माझ्या सर्व समजुती चुकीच्या निघाल्या. मी पाहिले की, श्रीगुरुजी आवश्यकतेपेक्षा अधिक काहीही बोलत नसत. परंतु जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा अत्यंत विनयाने आणि आग्रहाने बोलत असत. त्यांना जरी एखाद्याचे विचार, त्याचे स्पष्टीकरण पसंत पडले नाही, तरी त्यांच्या त्याच्याशी बोलण्याचालण्यात काही फरक पडत नसे. त्यांना भारतातील जवळजवळ सर्व भाषा येत होत्या. माझ्याशी ते आवर्जून बंगाली भाषेत बोलत. माझी त्यांच्यासंबंधीची धारणा विषासारखी अत्यंत कडवट होती. परंतु, त्यांच्या विनम्र आणि सौजन्यपूर्ण वागण्याने माझ्या, त्यांच्या संबंधीच्या पूर्वीच्या सगळया समजुती संशयाच्या आवर्तात सापडल्या.
 
''वरील समितीच्या बैठकीत भाग घेण्यासाठी ते जितक्या वेळा आले तितक्या वेळा मला ते कधीच कठोर वाटले नाहीत. पुरीचे जगद्गुरू शंकराचार्यांच्या आचरणाच्या अगदी विरुध्द असे श्रीगुरुजींचे आचरण होते. श्रीगुरुजींच्या वागणुकीमुळे मी मुग्ध झालो होतो असे सांगताना मला कचरण्याचे कारण नाही. तेव्हा मला मुळीच कल्पना आली नाही की याहूनही मोहविणारा प्रसंग पुढे मला अनुभवावा लागणार आहे.''
 
'' ..... वरील समिती विसर्जित झाल्यावर सुमारे एक वर्षाने एकदा मी नवी दिल्लीहून रेल्वेने भोपाळला चाललो होतो. टू टायरच्या एका डब्यात मला जागा मिळाली होती. योगायोगाने त्याच डब्यात श्रीगुरुजी होते. त्यांना झाशीला जायचे होते. मला पाहताच त्यांनी मला आलिंगन दिले, माझ्या प्रकृतीची चौकशी केली, समिती (गोभक्तांवर गोळीबारासंबंधांची चौकशी समिती) तसेच देशाच्या निरनिराळया समस्यांविषयी चर्चा केली..... ते अत्यंत नम्रतेचे प्रतीक होते. मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान होतो. एका वडील भावाकडून जे प्रेम मिळू शकते त्याहूनही अधिक प्रेमळ वागणूक, त्यांची माझ्याशी होती.
 
''गाडी सुरू झाली. बाहेर हळूहळू अंधार पडू लागला होता. बोलणे बंद झाले होते. थोडया वेळाने मी ब्रीफकेसमधून एक पत्रिका काढून वाचू लागलो. मी असे पाहिले की श्रीगुरुजीही एक पुस्तक काढून वाचत होते..... आता आणखी आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली. सनातन धर्माचा, उग्र ध्वजाधारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! आणि त्याचा प्रमुख नेता! अशा व्यक्तीसंबंधी माझी समजूत होती की, ते कुठले तरी धार्मिक पुस्तक वा हिंदू तत्त्वज्ञानाविषयी एखादा गहन ग्रंथ वाचत असतील. परंतु त्यांच्या हातातील पुस्तक पाहून माझ्यावर विस्मयाने तोंडात बोट घालण्याची पाळी आली. ते वाचत होते नुकतीच प्रसिध्द झालेली अमेरिकेच्या हेन्री मिलरची कादंबरी.
'' ..... बस! उरलेले स्वत: समजून घ्यावे. सत्य दडवून काय उपयोग? त्यानंतर श्रीगुरुजींविषयी माझी श्रध्दा अधिकच वाढली.''
- श्री. भानुप्रताप शुक्ल
 
जगजीवन राम यांचा श्रीगुरुजींवर प्रगाढ विश्वास
मला एक प्रसंग आठवतो. नागपूरचे मा. बाबासाहेब घटाटे, डॉ. मुंजे यांचे परम भक्त होते. त्यांचा मोठा आग्रह होता की, 'डॉ. मुंजे स्मारक समिती' तयार झाली पाहिजे आणि श्रीगुरुजींनी त्या समितीचे अध्यक्ष झाले पाहिजे. श्रीगुरुजींची अध्यक्ष होण्याची इच्छा नव्हती. परंतु बाबासाहेब घटाटे जुने, डॉ. हेडगेवारांच्या काळापासूनचे स्वयंसेवक! त्यांच्यावर डॉ. हेडगेवारांचा खूपच मोठा लोभ होता. म्हणून आपला नियम बाजूला ठेवून, श्रीगुरुजी समितीचे अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यावर ते दिल्लीला आले. आम्ही काही खासदार त्यांना भेटण्यासाठी गेलो. त्यांनी डॉ. मुंजे स्मारक समितीसंबंधी काही माहिती सांगितली आणि अशी इच्छा व्यक्त केली की, या समितीत श्री जगजीवन रामांचा समावेश झाला पाहिजे. खासदारांनी आश्चर्याने म्हटले, ''आपण हे काय सांगता आहात? ते यावर स्वाक्षरी करतील, असे तुम्हाला वाटते? ना. हे कसे शक्य आहे?'' श्रीगुरुजींनी मला थांबवून घेतले आणि म्हणाले, ''उद्या जगजीवन रामांकडे जाऊन या.'' माझे जगजीवन रामांशी अत्यंत घनिष्ट संबंध होते. इतके घनिष्ट संबंध होते की, मला त्यांना भेटण्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट घेण्याची गरज पडत नसे. मी त्यांना भेटावयास गेलो. ते लोकसभेत जाण्याच्या तयारीत होते. त्यांनी विचारले, ''यावेळी इथे कसे?'' मी म्हणालो, ''काही बोलायचे आहे.'' मी भूमिका मांडण्यास सुरुवात केली, तेव्हा ते म्हणाले, ''पाल्हाळ नको, मुद्याचे तेवढे सांगा. तुम्हाला काय हवे आहे?'' मी म्हणालो, ''या समितीचे अध्यक्ष श्रीगुरुजी आहेत. समितीच्या सभासदांमध्ये आपले नाव हवे आहे. निधी गोळा करण्यासाठी आवाहन पत्रक तयार होणार आहे. त्या पत्रावरही आपले नाव हवे आहे.'' त्यांनी मला विचारले, ''श्री गोळवलकर गुरुजींनी असे म्हटले आहे का?'' मी म्हणालो, ''होय.'' तेव्हा ते म्हणाले, ''मग त्यावर माझी स्वाक्षरी आहेच असे निश्चित समजा. श्री. घटाटे यांना कळवा की, ते जेव्हा संबंधित कागदपत्रे पाठवतील तेव्हा मी त्यावर स्वाक्षरी करीन.'' दोन्ही पत्रकांवर त्यांची स्वाक्षरी आली आणि ते आवाहन पत्र वृत्तपत्रात प्रसिध्दही झाले. जगजीवन रामांची त्या पत्रकावरील स्वाक्षरी अनेकांना अनपेक्षित वाटली होती.
- दत्तोपंत ठेंगडी
 
सर्वांचे स्वाभाविक आदरणीय श्रीगुरुजी
माननीय माणिकराव पाटलांच्या घरी लग्न समारंभ होता. त्यांचे सासरे काँग्रेसचे मोठे कट्टर कार्यकर्ते होते, नेते होते. एक विचित्र संयोग निर्माण झाला होता. माणिकराव पाटील कट्टर संघवाले, तर त्यांचे सासरे कट्टर काँग्रेसवाले. त्या लग्न समारंभात महाराष्ट्रातील संघाचे प्रमुख लोक यायचे होते, तसेच काँग्रेसचे व सोशालिस्ट नेतेपण यायचे होते. श्रीगुरुजी थोडे उशीरा येणार होते. बिगर संघाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की, हे आपल्याला जरा अडचणीचेच ठरणार असे दिसते. श्रीगुरुजी उशीरा येतील. श्रीगुरुजी आले की, संघवाले उभे राहतील. त्यावेळी आपण का म्हणून उभे रहायचे! अशा गोष्टी चाललेल्या असतानाच श्रीगुरुजी आले. संघाचे सर्व कार्यकर्ते उठून उभे राहिले. श्रीगुरुजी पुढे आले तर काँग्रेसवाले, सोशालिस्ट हेही सारे उठून उभे राहिले. कॉम्रेड डांगे वगैरेही उठून उभे राहिले. हे सर्व सहजपणे घडत होते. श्रीगुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव बाहेरच्या लोकांवरही कसा पडलेला होता, हे यावरून कळून आले.
- दत्तोपंत ठेंगडी
 
मतांची आम्हाला भीती नाही
सन् १९६६ मध्ये पूज्य श्री प्रभुदत्त ब्रह्मचारी यांनी वृंदावनमध्ये तसेच पुरीचे शंकराचार्य पूज्य श्री. निरंजनदेव तीर्थ यांनी जगन्नाथपुरीत, 'गोरक्षणाचा' प्रश्न घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते. एक महिन्यातच पू. ब्रह्मचारींची प्रकृती बिघडली. त्यावेळी दिल्लीत गोरक्षणासाठी सत्याग्रहही चालला होता. सत्याग्रहात हजारोंच्या संख्येत, सत्याग्रही तुरुंगात चालले होते. श्रीगुरुजी तर पहिल्यापासूनच आमरण उपोषणाच्या विरुध्द होते. पण ब्रह्मचारींची प्रकृती बिघडलेली पाहून त्यांनी आपला प्रवास स्थगित केला. (पूजनीय श्रीगुरुजी कितीही आजारी असले, तरी आपला प्रवास स्थगित करत नसत. परंतु हा एक राष्ट्रीय प्रश्न होता.) आणि ते सर्वपक्षीय गोरक्षा समितीच्या बैठकीत भाग घेण्यासाठी वृंदावनला गेले. बैठक ब्रह्मचारींच्या आश्रमात होती. समितीचे बहुतेक सर्व सभासद बैठकीस आले होते. ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती.
 
श्रीगुरुजींच्या व्यवस्थेत मी होतो. त्यामुळे त्या बैठकीचा वृत्तांत लिहिण्याची संधी मला मिळाली, तसेच पहिल्यांदाच देशाच्या महापुरुषांची इतकी जवळून भेट घेण्याचा योग आला. बैठकीचे वातावरण अत्यंत गंभीर होते. बहुतेक सर्वजण उपोषण संपवावे अशा मताचे होते. परंतु तसे व्यक्त करण्यास ते कचरतही होते. काही थोडेजण उपोषण चालू ठेवण्याच्या मताचे होते. त्यांचे म्हणणे होते की, आम्ही उपोषण सोडले तर लोकांना तोंड कसे दाखविणार? ही गोष्ट विशेष करून स्वामी करपात्री महाराज व प्रो. रामसिंह यांनी मांडली होती. यावर सर्व गप्प राहिले. परंतु श्रीगुरुजींनी तत्काळ सांगितले, ''याची चिंता आपण करू नका. आपण सारा दोष गोळवलकरवर टाकून द्या. आम्ही जनतेमध्ये काम करतो. आम्हाला जनतेची कसलीही भीती नाही. आम्हाला काही त्यांच्याकडे मते मागायला जायचे नाही.'' श्रीगुरुजींच्या या स्पष्ट उद़्गारांमुळे वातावरण आणखीनच गंभीर झाले. जरी या बैठकीत उपोषण सोडण्यासंबंधी निर्णय होऊ शकला नाही, तरी एक असे वातावरण तयार झाले की, सरकारशी बोलणी करण्यासाठी उपोषण मागे घेतले जावे, बैठक होताच श्रीगुरुजी ब्रह्मचारींचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासास निघून गेले.
- चंद्रभान
 
राष्ट्रभक्तीचा नंदादीप
श्रीगुरुजी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जीवनात त्यांना पुष्पहार घालण्याचे भाग्य मला कधी मिळाले नाही. जीवनभर त्यांनी मला आपल्या पायांना कधी स्पर्श करू दिला नाही. जेव्हा केव्हा मी त्यांचे पाय शिवण्यासाठी पुढे जात असे, ते आपले पाय मागे नेत असत.
 
जीवनाच्या शेवटच्या दिवशीही, जेव्हा सकाळी सहा वाजता त्यांना भेटण्याचे भाग्य मला मिळाले होते, मी त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी वाकलो असताना त्यांनी हळूहळू आपले पाय मागे खेचून घेतले होते. परंतु दुस¬या दिवशी त्यांच्या देहावसानानंतर जेव्हा मी नागपूरला पोहोचलो तेव्हा त्यांचे पार्थिव शरीर डॉ. हेडगेवार भवनात चिरनिद्रेत निमग्न पडले होते. त्या दिवशी मी जेव्हा त्यांच्या पायांना शिवलो तेव्हा त्या पायांना मागे खेचणारा प्राणपक्षी उडून गेला होता.
मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवले आहे की, माझे स्मारक उभारू नये. त्यांनी आपले स्वत:चे श्राध्दही स्वत:च उरकून घेतले होते. आपल्याला करण्यासाठी त्यांनी काहीही ठेवले नाही.
 
परंतु त्यांनी काहीच ठेवले नाही असे म्हणणेही बरोबर नाही. त्यांनी आपल्यासाठी राष्ट्रभक्तीची महान ठेव ठेवलेली आहे. ते जीवनभर नंदादीपाप्रमाणे जळत राहिले. स्वत: जळून प्रकाश पसरवत राहिले. अंधकाराच्या शक्तींशी लढत राहिले. स्वत: जळत असताना या संघर्षात त्यांनी कधी विश्रांती मागितली नाही. कर्तव्यपथावरून जात असताना ते कधी थांबले नाहीत, कधी झुकले नाहीत. चरैवेति चरैवेति, हा उपनिषदाचा मंत्र जणु त्यांच्या जीवनात साकार झाला होता. शरीराचा कण न् कण, जीवनाचा क्षण न् क्षण अहोरात्र राष्ट्राची चिंता!
 
परंतु ही निराशा न जागवणारी अशी चिंता होती. समाजात वैफल्य जागवणारी चिंता करणारे पुष्कळ लोक आहेत. ते म्हणतात की, आपला भारत रसातळास जाणार आहे. यातून वाचवण्यासाठी काही उपाय नाही. ते स्वत: इतके निराश आहेत की, जो कोणी त्यांच्या संपर्कात येईल त्याच्यातही ते निराशा उत्पन्न करतील. श्रीगुरुजी राष्ट्राच्या स्थितीमुळे चिंतित नव्हते असे नाही; पण त्यांना समाजात एक महान तळमळ निर्माण करायची होती. आज देशाची स्थिती चांगली नसेल पण आम्ही ती उद्या चांगली करू असा विश्वास त्यांच्या चिंतेत होता. त्यांच्या चिंतेत पुढे जाण्याचा संकल्प होता.
- अटल बिहारी वाजपेयी