वेष व भाषेची निष्ठा
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
भारतीय वेषभूषेचा अभिमान
एक पारशी सद्गृहस्थ श्रीगुरुजींचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यांच्याकडे राज्यपालांच्या स्वागतासाठी जेवण्याचा समारंभ योजलेला होता. त्यांनी श्रीगुरुजींना आग्रहाने त्या कार्यक्रमास बोलावले. श्रीगुरुजी आपल्या एका मित्राबरोबर कार्यक्रमासाठी गेले. या कार्यक्रमासाठी जाताना श्रीगुरुजींचा पेहेराव धोतर, सदरा असा अस्सल भारतीय होता. श्रीगुरुजींचे मित्र मात्र 'डिनर सूट' घालून गेले कारण इंग्रज राज्यपालाबरोबर जेवण होते. श्रीगुरुजी म्हणाले की, मी धोतर - सदरा या वेषातच जाईन, आपल्या देशात आपल्याच वेषभूषेचा उपयोग आवश्यक आहे.
समारंभाच्या ठिकाणी गेल्यानंतर पारशी महोदयाने त्यांचे मनापासून स्वागत केले. श्रीगुरुजी शाकाहारी आहेत आणि जेवणात मांसाहारी पदार्थ असल्याने ते केवळ चहाच घेणार आहेत हे समजल्यावर पारशी गृहिणीने स्वतः चहा बनवून श्रीगुरुजींना दिला. चहा घेऊन श्रीगुरुजी परतले.
गृहिणीने स्वतः चहा देऊन श्रीगुरुजींबद्दल आदर व्यक्त केला हे पाहून श्रीगुरुजींच्या मित्राला आश्चर्य वाटले; ते म्हणाले की, आपली विशेष आस्थापूर्वक विचारपूस कशामुळे झाली? श्रीगुरुजींनी सांगितले की, हा माझ्या भारतीय वेषभूषेचा सन्मान आहे.
- डॉ. आबाजी थत्ते
 
स्वतःच्या भाषेचा आग्रहाने उपयोग
तामिळनाडू प्रांतात मदुराई येथे प्रतिष्ठित सद्गृहस्थांची बैठक झाली. त्या बैठकीत एका वकील महोदयाने म्हटले की, हिंदीचा उपयोग केल्याने तमिळ भाषेचे नुकसान होईल, तिचा विकास होणार नाही, तिचे महत्त्वही कमी होईल. श्रीगुरुजी म्हणाले की, असे होण्याचे काही कारण नाही. परंतु जर हिंदीच्या उपयोगाचा आग्रह राहिला नाही तर इंग्रजी आपल्यावर स्वार होईल. वकील महोदय श्रीगुरुजींच्या मताशी सहमत झाले नाहीत. थोडया वेळाने श्रीगुरुजींनी वकील महोदयांना सहजपणे विचारले की, आपल्या कोर्टकचेरीत तामिळ भाषेतून काम चालवणे शक्य आहे का? वकील महाशयांनी 'हो' म्हटल्यावर श्रीगुरुजींनी विचारले की, किती वकील तमिळ भाषेत कामकाज करतात? ''एक सुध्दा नाही'' हे उत्तर ऐकून श्रीगुरुजी म्हणाले की, तमिळचे तर आपण स्वतः शत्रू आहात. हिंदी भाषा तमिळची शत्रू नाही.
- डॉ. आबाजी थत्ते.
 
वाढदिवसाचा समारंभ आपल्या परंपरेला धरून हवा
एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी मुलाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास श्रीगुरुजींना बोलावणे होते. श्रीगुरुजी कार्यक्रमात सहभागी झाले. ज्याचा वाढदिवस होता त्या लहान मुलाला त्याच्या आईवडिलांनी पाश्चात्य वेषभूषेने नटवले होते. वाढदिवसानिमित्त 'केक' कापण्याचा आणि मेणबत्त्या विझवण्याचा कार्यक्रमही होता.
श्रीगुरुजींनी त्या लहान मुलाच्या आईवडिलांना असे म्हटले की, आपल्या मुलाला आपल्या परंपरेप्रमाणे बाळकृष्ण किंवा रामलला प्रमाणे नटवता येणार नाही का? परकीय रीती रिवाजांचे दास बनण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे? आपण त्याला इंग्रज थोडेच बनविणार आहोत? आपल्या मुलाला सुंदर रेशमी धोतर नेसवा, गळयात फुलांची, रत्नांची माळ घाला, डोक्यावर मोरपीस ठेवा, कपाळावर गंधाचा टिळा लावा आणि मग बघा त्याची मनोहर प्रतिमा! वाढदिवसाच्या दिवशी इंग्रजी प्रथेप्रमाणे केक कापतात, मेणबत्ती विझवतात म्हणून तशीच कार्यक्रमाची योजना आपण केली आहे. खरे म्हणजे आपल्या परंपरेत दिवा विझवणे अशुभ मानले गेले आहे. या सर्वाधिक आनंद देणा¬या क्षणी अशुभ गोष्टीचा विचार कशाला? आपण तर दिव्याने औक्षण करतो. कपाळावर कुंकू लावतो. शुभ कार्यक्रमांच्या ऐवजी पाश्चात्यांची नक्कल करून, त्यांच्या रीती रिवाजांप्रमाणे वागून आपण कोणत्या संस्कारांचा परिणाम आपल्या मुलावर आणि त्याच्या मित्रांवर करणार आहोत?
माझ्या लहानपणी माझी आई माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला बालकृष्णासारखी सजवत असे. केरळ प्रांतात आपण 'बाल गोकुलम्' चे कार्यक्रम प्रचलित केले आहेत. या कार्यक्रमामध्ये अनेक लहान मुलांना श्रीकृष्णासारखे नटवून शोभा यात्रा काढतात. या शोभायात्रेचा विलक्षण प्रभाव मुलांवर व शोभायात्रा पहाणा¬यांवर पडत असतो.
- डॉ. आबाजी थत्ते
 
भाषेसंबंधी विचार
सन १९७० मध्ये भूतपूर्व प्रांतसंघचालक श्री. व्ही. राजगोपालचारी यांच्या समवेत श्रीगुरुजींची भाषेच्या प्रश्नावर चर्चा झाली. श्रीगुरुजी म्हणाले, ''भाषेची समस्या विनाकारण गुंतागुंतीची झाली आहे. अन्य भाषांच्या शब्दांना सामावून घेण्याची क्षमता हिंदी भाषेत अधिक आहे. भाषेची समस्या इतकी चिघळली नसती, तर स्वाभाविकरीत्या हिंदी भाषा संस्कृतसारखी विकसित होऊ शकली असती. हिंदी भाषेला सांस्कृतिक क्षेत्रातील स्वाभाविक होणारी प्रक्रिया मानून राजकीय नेत्यांनी त्यात हस्तक्षेप न करणे लाभदायक ठरेल''.
- एस. जी. सुब्रह्मण्यम्
 
हिंदी राष्ट्रभाषा झाल्यामुळे अहिंदी प्रदेश मागे पडणार नाहीत
जून १९५३ ची घटना आहे. मी वडिलांबरोबर रामेश्वराहून घरी येत होतो. वाटेत एक दिवस नागपूरला उतरून श्रीगुरुजींना भेटावयास गेलो. श्रीगुरुजी १०-१२ स्वयंसेवकांबरोबर बोलत होते. मी खोलीत प्रवेश करताच ते म्हणाले 'थांबा' आणि सर्व गप्प बसले. त्यांनी मला विचारले की, कोठे गेला होता? मी म्हणालो की, रामेश्वरम्. ''कुठे शाखेवर गेला होता?'' माझे उत्तर होते, ''होय! केवळ मदुराईत.'' श्रीगुरुजी म्हणाले की, नवीन ठिकाणी जाऊन, लोकांना हुडकून भेटले पाहिजे.
''हिंदीचे वाचन कुठवर?'' श्रीगुरुजींचा दुसरा प्रश्न. मी म्हणालो की, इंटरपर्यंत, ऍडव्हान्सड हिंदी, हिंदी साहित्य संमेलनाचे साहित्य विशारद. ''येथून कोठे जाणार?'' ''कानहीपूर'' माझे संक्षिप्त उत्तर. स्वाभाविक हास्यानंतर श्रीगुरुजी गंभीर मुद्रेने म्हणाले की, पाहिलंत हा हिंदी क्षेत्राचा निवासी आहे. याने हिंदी भाषेचे उच्च शिक्षण घेतले आहे, कानपूरचा कार्यकर्ता आहे. परंतु हा कधी कानपूर म्हणणार नाही. 'ही'ला कानपूरच्या मध्ये ठेवेल. हिंदी भाषी लोक अशा अनेक चुका बोलताना, लिहिताना करतात. अहिंदी लोक व्याकरण व साहित्याच्या दृष्टीने शुध्द आणि स्वच्छ हिंदीचा प्रयोग करतात. हिंदी भाषी अनेक भाषांचे शब्द बोलेल, व्याकरण अशुध्द करेल. म्हणून असे मानायचे कारण नाही की हिंदी राष्ट्रभाषा झाल्यावर अहिंदी भाषी मागे पडतील.
या प्रत्यक्ष उदाहरणाने सर्वांचे समाधान झाले.
- डॉ. वीरेंद्र बहादुर सिंह