'बालंबाल' खात्री
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
1936 साली श्रीगुरूजी सारगाछीच्या श्रीरामकृष्णआश्रमातून लवकरच नागपुरात आले. त्यापूर्वी त्यांनी आपली वकिलीची पाटी वाकर रोड (रूईकर मार्ग) वरील एका जुनाट घरावर लावली होती. श्रीगुरूजींच्या ओळखीचे खानदेशातले (बहुधा धुळे येथील) एक अंध कवी केशवराव शिरवळकर, हे त्या सुमारास काही महिन्यांसाठी नागपुरास अंधविद्यालयात मुक्कामास आले होते. त्या वर्षी मी अंधविद्यालयाचा शिक्षक होतो. एके दिवशी केशवराव शिरवळकरांना घेऊन मी सावळाराम मास्तरांच्या संगीत विद्यालयात गेलो होतो. त्या काळात श्रीगुरूजींचा मुक्काम बहुधा दिवसभर त्या गायनशाळेतनच असे. आमचे अंध कवी मोठे कोटीबाज होते. श्रीगुरूजींची बरेच दिवसानंतर भेट झाल्यामुळे त्यांना फार आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात ते भराभर मनोरंजक शाब्दिक कोटया करीत बोलू लागले. दोघेही एकमेकांच्या शब्दावर भराभरा कोटया करून सारखे हास्याची कारंजी उडवीत होते. शेवटी आमच्या केशवरावांनी गंभीरपणे प्रश्न केला, ''काय माधवराव! आजकाल तुम्ही वकिलाची पाटी लावली आहे म्हणून आमचे श्रीधरराव गुरूजी (अंधविद्यालयातले सारे अंध विद्यार्थी आणि शिक्षण माझ्या नावाचा त्या वेळी या शब्दाने उल्ल्लेख करीत) सांगत होते. ते खरे आहे काय ?'' त्यावर एक क्षणही न थांबता श्रीगुरूजी म्हणाले, ''तुमचे श्रीधरराव गुरूजी म्हणतात त्याप्रमाणे मी वकिलीची पाटी लावली आहे हे खरं आहे. पण तूर्त एकही 'केस' न मिळाल्यामुळे स्वत:चेच केस वाढवणं चालू आहे.'' 'केस' शब्दावरची ती कोटी ऐकून मला एकदम हसू आले. केशवराव शिरवळकर अंध असल्याने त्यांना माझ्या हसण्याचा अर्थ कळला नाही. प्रश्नार्थक मुद्रा करून ते उभे राहिले. त्यावर मी त्यांना 'गोळवलकरांनी जटा-दाढी वाढविण्यास सुरूवात केली असून त्यात बरीच प्रगती झाली' असल्याचे संगताच त्या अंधकवीची प्रतिभा एकदम पल्लवित होऊन ते म्हणाले, ''अहो माधवराव ! आतापर्यंत वाढविलेत तेवढे केस पुरेत. हे केस लवकर न काढले तर तर मी तुमच्यावर 'केस' करीन.'' श्री केशवरावांच्या कोटीचे कौतुक करीत श्रीगुरूजी आपल्या दाढीवरून भराभरा हात फिरवित तत्काळ म्हणाले, ''तुमची ही हजरजबाबी कोटी ऐकून तुम्ही उत्तम कवी आहात अशी आता माझी 'बालंबाल' खात्री झाली आहे.''
पुन्हा हास्याची कारंजी उडाली. शेवटी केशवराव शिरवळकरांच्या कवितांचे गायन होऊन ही अनौपचारिक विनोदसभा संपली.