चारित्र्य तसेच साधेपणा
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
आपुलकीच्या व्यवहाराने मतभेद दूर
सन १९६८ मध्ये लखनऊमध्ये संघाचा सार्वजनिक कार्यक्रम होता. श्रीगुरुजींची व्यवस्था श्री. झामनदासांच्या घरी केलेली होती. मी व्यवस्थेसाठी तेथे होतो. सायंकाळच्या चहापूर्वी एक सद़्गृहस्थ श्रीगुरुजींना भेटावयास आले. ते थोडे नाराज दिसत होते. खूप जुने कार्यकर्ते होते, परंतु नंतर काही मतभेद प्रकट करू लागले होते. मा. संघचालकांची बैठक चाललेली होती, म्हणून त्यांना बाहेर बसविण्यात आले होते. मी त्यांना म्हणालो की, बैठकीनंतर आपली श्रीगुरुजींशी भेट होऊ शकेल. मी त्यांना विचारले की, कसे येणे झाले? ते म्हणाले की, श्रीगुरुजींना भेटण्यासाठी आलो. कित्येक वर्षे झाली, त्यांची भेट नाही. नंतर ते आपण श्रीगुरुजींना काय विचारणार आहोत. याविषयी सांगू लागले. बैठकीनंतर मी त्यांना आत घेऊन गेलो. श्रीगुरुजींनी त्यांचे स्वास्थ्य, परिवार, कार्य इ. संबंधी विचारपूस केली. त्यांचा सर्वांशी परिचय करून दिला. श्रीगुरुजींनी सांगितले की, हे संघाचे खूप जुने कार्यकर्ते, यांना संघाबद्दल खूपच आस्था आहे. ते सद़्गृहस्थ जे काही विचारण्याची तयारी करून आले होते, ते सर्व काही विसरून गेले. जाताना त्यांच्या चेह¬यावर समाधान होते. बहुधा त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर या काही क्षणांच्या सान्निध्यातच त्यांना मिळाले. नंतर समजले की, ते आपले मतभेद विसरून पुन्हा कामास लागले आहेत.
- तेजपाल सेठी
 
भारतीय संस्कृतीची मनोरचना
श्रीगुरुजींचे आपल्या घरी स्वागत करण्याचे भाग्य मला मिळाल्याने मी धन्य झालो.
सकाळी न्याहारीचा कार्यक्रम होता. मी श्रीगुरुजींसमवेत न्याहारी करण्यासाठी आठ-दहा जणांना बोलावले होते. माझे एक शिक्षक मित्रही सहकुटुंब आले होते. श्रीगुरुजींना पाहताच माझ्या मित्राची पत्त्नी त्यांच्या पाया पडू लागली. पाया पडण्यासाठी ती खाली वाकताच श्रीगुरुजी एकदम मागे आले आणि म्हणाले, ''अरेरे! आपण हे काय पाप करता आहात? आपण पतिदेवांच्याच पाया पडले पाहिजे, अन्य कोणाच्या नाही. अन्यथा अनर्थ होईल, पाप होईल.'' मित्राची पत्त्नी म्हणाली, ''मी तर धर्मगुरुच्या पाया पडते आहे.'' श्री गुरुजी म्हणाले, ''मी तसा गुरु नाही. हे 'गुरू' जीचे संबोधनच सगळी गडबड करते. आबा काही तरी उपाय शोधा यावर.''
 
सगळे व्यवस्थित बसल्यावर चहा आणि खाद्यपदार्थ आणले गेले. मी आणि आणखी दोन स्वयंसेवक कपांमध्ये चहा ओतू लागलो. सर्वजण चहा पिऊ लागले; परंतु माझ्या मित्राची पत्त्नी गुपचुप बसून राहिली. तिने चहा घेतला नाही. श्रीगुरुजी उठले आणि आत गेले, माझ्या पत्त्नीला त्यांनी बोलावले आणि तिला सांगितले की, त्या ताईजवळ बसा. मला म्हणाले की, इन्द्रेश्वर! हा कप घे आणि आपल्या पत्त्नीला दे. मी तसे केल्यावर श्रीगुरुजी त्या दोघींना म्हणाले की, आपण आता चहा घ्या. दोघींनी चहा घेतला. यावर श्रीगुरुजी म्हणाले, ''ही आपली भारतीय संस्कृतीची मनोरचना आहे. एकटी महिला अनेक पुरुषांच्यामध्ये बसून खाण्यापिण्याचे काम करणार नाही. अन्य महिला जोडीदार आल्यावर मगच ती सर्वसामान्य व्यवहार करू लागेल. हे आपल्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे शाश्वत मनोविज्ञान आहे.''
सर्व उपस्थित चकित झाले आणि प्रभावितही.
- प्रा. इंद्रेश्वर प्रसाद सक्सेना
 
गणवेष नीट केला
सन १९७१ ची घटना. प्रोद़्दत्तूरमध्ये श्रीगुरुजींचा कार्यक्रम होता, गणवेषात कार्यक्रम होता. संघाचा गणवेष माझ्यासाठी नवाच होता. म्हणून मी तो व्यवस्थित घालण्याचा प्रयत्त्न करत होतो. पण काही तरी चूक रहातच होती. मी गोंधळल्यासारखा झालो. माझी अडचण श्रीगुरुजींच्या ध्यानात आली. ते लगेच माझ्यापाशी आले आणि स्वत: त्यांनी माझी चूक निस्तरली. मला कल्पनाही नव्हती की, स्वत: सरसंघचालक माझ्या गणवेषाबाबत इतक्या आस्थेने लक्ष देतील.
- एन. पी. एम. रेड्डी
 
देशाची नाडी ओळखणारे श्रीगुरुजी
दिल्लीचे प्रसिध्द इंग्रजी दैनिक 'हिंदुस्थान टाइम्स'चे अनेक वर्षे यशस्वी संपादक राहिलेले विख्यात पत्रकार श्री. दुर्गादास काही कारणासाठी नागपूरला आले होते. 'नागपूर टाइम्स'चे प्रबंध संपादक श्री. अनंत गोपाळ शेवडे यांच्याकडे ते पाहुणे म्हणून आठ दिवस राहिले. या अवधीत श्री. दुर्गादास यांनी श्री. शेवडे यांच्याकडे श्रीगुरुजींना भेटण्यासंबंधी विषय काढला. पण श्री. शेवडे यांनी त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की, काही करून माझी श्रीगुरुजींशी गाठ घालून द्या. त्यानुसार मी श्री. गुरुजींशी बोलून भेटीचा दिवस व वेळ निश्चित केली. आम्ही दोघे ठरलेल्या वेळी श्रीगुरुजींच्या भेटीसाठी निघालो.
 
मी श्री. दुर्गादास यांना कुतूहलापोटी विचारले की, तुम्ही श्रीगुरुजींच्या भेटीसाठी एवढे उत्सुक का?
श्री. दुर्गादासांनी लगेच उत्तर दिले की, या काळात सगळया देशात केवळ दोनच व्यक्ती अशा आहेत ज्या देशाच्या नाडीची योग्य परीक्षा करू शकतात. त्या आहेत एक श्री. जवाहरलाल नेहरू आणि दुसरे श्रीगुरुजी. देशाची सध्याची वास्तविक स्थिती, देशापुढे उभ्या असलेल्या निरनिराळया बिकट समस्या तसेच संकटे, त्यांचे यशस्वीपणे निवारण करण्यासाठी काय करणे योग्य ठरेल, कोणते प्रभावी पाऊल उचलल्यास देशहिताचे रक्षण होईल या सर्व गोष्टींविषयी त्यांच्याकडून योग्य ते भाष्य आणि योग्य ते मार्गदर्शन देशातील जनतेला मिळत असते.
 
आम्ही श्रीगुरुजींना भेटलो. श्रीगुरुजी आमची वाटच पहात होते. श्री. दुर्गादासांनी श्रीगुरुजींना विनम्रपणे अभिवादन केल्यावर दोघांची चर्चा सुरू झाली.
सुरुवातीलाच श्री. दुर्गादासांनी श्रीगुरुजींना विचारले, ''श्री. राजगोपालाचारी यांनी नुकतीच 'स्वतंत्र पार्टी'ची स्थापना केली आहे. आपला त्यांच्याशी जो संवाद झाला, त्यात कोणत्या विषयांवर विशेष चर्चा झाली?''
 
श्रीगुरुजींनी उत्तर दिले, ''मी तर केवळ हिंदू समाजाचे संघटन अर्थात संघ-कार्य करण्याच्या कामातच गर्क आहे. मला सध्याच्या राजकारणाशी काही देणे - घेणे नाही.''
यावर श्री. दुर्गादासांनी देशाच्या सद्य:स्थितीसंबंधी विस्ताराने आपले विचार प्रकट केले. सुमारे अडीच तास बैठक चालली. श्रीगुरुजी ध्यान देऊन ऐकत होते. मधून मधून केवळ दोन - चार शब्दात त्यांनी आपली अनुकूल - प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
भेट संपली, श्री. दुर्गादासांनी समाधान व्यक्त केले. आम्ही दोघे आपल्या निवासस्थानी परतलो. रस्त्यात मी श्री. दुर्गादासांना म्हटले, ''भेटीत आपणच अधिक वेळ बोलत होता. श्रीगुरुजी तर फारच थोडे बोलले.'' यावर श्री. दुर्गादासांनी स्मित हास्य करून उत्तर दिले, ''माझ्या ज्या बोलण्यावर श्रीगुरुजी संमती दर्शवत होते, त्यांच्यात त्यांचे विचार व्यक्त होत होतेच आणि माझ्या ज्या विचारांशी ते सहमत नव्हते त्यासंबंधीही त्यांनी थोडया शब्दात सूचित केले. माझ्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली. माझी ही भेट यशस्वी झाली. मला समाधान वाटते. श्रीगुरुजींशी संभाषण करण्याची संधी मला मिळाली हे माझे सद़्भाग्य आहे. हा माझ्या जीवनाचा अविस्मरणीय क्षण आहे, असे मी मानतो.''
- श्री. कासखेडीकर
 
श्रीगुरुजींचा आपुलकीचा व्यवहार
स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये एक विराट सभा झाली. सभेचे अध्यक्ष, तत्कालीन मध्यप्रदेशचे सेवा निवृत्त मुख्य सचिव श्री. के. बी. एल. सेठ होते.
 
सभेत भाषण करताना श्रीगुरुजींनी स्वामी विवेकानंदांच्या दिव्य चरित्रावर, त्यांच्या अतुलनीय कर्तृत्वावर प्रकाश टाकला. श्री स्वामीजींनी हिंदू समाजाच्या उत्थानासाठी तसेच उत्कर्षासाठी जी लोकोत्तर कार्ये केली ती त्यांनी विशद केली. ती विशद करताना त्यांनी समाजाला ओजस्वी व प्रभावी शब्दात आवाहन केले की, समाजाने विवेकानंदांच्या कार्याचे अनुसरण करून हिंदू समाज बलवान, वैभवसंपन्न करावा, त्याला जगद्गुरुचे स्थान प्राप्त करून द्यावे.
 
सभा संपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरताना श्री. सेठ यांनी व्यासपीठाजवळ बसलेल्या आपल्या अपंग पत्नीच्या अवस्थेकडे श्रीगुरुजींचे लक्ष वेधले आणि त्यांनी श्रीगुरुजींना विनंती केली की, त्यांनी आपल्याला घेऊन जाण्यासाठी जी गाडी आहे ती व्यासपीठाजवळ आणण्याची व्यवस्था करावी. श्रीगुरुजींनी लगेच आपल्या चालकाला पाठवून श्री. सेठ यांची गाडी व्यासपीठाजवळ आणण्याची व्यवस्था केली. श्री. सेठ आणि त्यांच्या पत्त्नीने श्रीगुरुजींना मनापासून धन्यवाद दिले आणि ते गाडीने आपल्या निवासस्थानी गेले.
 
ही बाब तशी विशेष महत्त्वाची नव्हती. पण श्री. सेठ दांपत्याच्या हृदय पटलावर त्यांचा अमिट ठसा उमटला.
काही दिवसांनंतर एका सभेत भाषण देताना श्री. सेठ यांनी वरील घटना भावपूर्ण शब्दात वर्णन केली आणि मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी म्हटले, ''श्रीगुरुजींनी स्वत: कष्ट घेऊन माझ्या सोयीकडे लक्ष पुरविले. यातच माझा सन्मान आहे. श्रीगुरुजींच्या या आपुलकीच्या व्यवहाराने आम्ही दोघे पती-पत्त्नी भारावून गेलो. आमच्यासाठी हा एक अविस्मरणीय प्रसंग बनलेला आहे. श्रीगुरुजींसारखी महान व्यक्ती आपल्या वागण्याने व्यक्तीचे मन कसे जिंकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.''
- श्री. कासखेडीकर