शरीरावर नियंत्रण
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
वेळेचा काटेकोरपणा
अलीगडमधील धर्म समाज महाविद्यालयात संघ शिक्षा वर्ग सुरू होता. त्या वर्गात जेव्हा श्रीगुरुजी आले तेव्हा त्यांना कॅन्सर झालेला होता, परंतु मला मात्र याचा बिलकुल पत्ता नव्हता. ते तीन दिवस वर्गात राहिले. त्या दिवसात त्यांनी वर्गातील प्रत्येक कार्यात इतक्या तत्परतेने भाग घेतला की, मला थोडीही शंका आली नाही की, त्यांना कॅन्सर झाला आहे. कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना उशीर होण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटच्या दिवशी त्यांचा बौध्दिकवर्ग होता. त्यावेळी त्या व्यवस्थेत २-३ मिनिटांचा उशीर झाला. त्यामुळे ते नाराज होऊन म्हणाले की, दोन मिनिटांचा तरी उशीर का? संघाचे प्रत्येक कार्य ठरलेल्या वेळीच सुरू झाले पाहिजे. श्रीगुरुजींचे केवढे आत्मबल होते तसेच प्रत्येक कार्यक्रम वेळेवर सुरू करण्याचा त्यांचा केवढा आग्रह होता, हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.
- कृष्ण सहाय
 
श्रमाची उपासना
१९५६ ची गोष्ट आहे. प्रयागच्या संघ शिक्षा वर्गात श्रीगुरुजी आलेले होते. सततच्या प्रवासामुळे आलेला थकवा घालवण्यासाठी मोठया कष्टाने त्यांना पायाला मालिश करण्यासाठी रात्री साडेअकरा वाजता राजी केले. दोघेजण मालीश करण्यासाठी आले. पाहता पाहता अर्धा छटाक तेल एकाच पायाच्या तळव्यासाठी लागले. आम्ही तर हैराण झालो. दुसर्‍याच्या मनातील भाव सहजपणे ओळखणार्‍या श्रीगुरुजींनी म्हटले की, शरीरात शिल्लकच काय राहिले आहे. लाकडाप्रमाणे हाडे सुकून गेली आहेत. दिवसभर अथक परिश्रम आणि रात्री जागरण. माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले. शेवटी रक्ताचा थेंब न थेंब आटवून आणि अनेक संकटे पार करत बंदीनंतर संघकार्य पुन्हा प्रभावीपणे सुरू झाले आणि केवळ आत्मबळाच्या आधारे पुढील १७ वर्षे अविरत कार्य करत असलेले श्रीगुरुजी संघाला विश्वव्यापी स्वरूप देण्याच्या कामाला लागलेले आहेत.
- विश्वनाथ लिमये
 
आपल्या दुःखाची चर्चा नाही
६ फेब्रुवारी १९७२ रोजी श्रीगुरुजी विमानाने चेन्नई (मद्रास) ला पोहोचले. विमानाने येणा¬या सामानाची वाट पहात ते एका खुर्चीवर बसले. श्रीगुरुजींकडे एका कार्यकर्त्याचे लक्ष गेले आणि त्याने पाहिले की, त्यांच्या धोतराच्या खालच्या भागाला रक्त लागले आहे. तो काही विचारणार एवढयातच श्रीगुरुजींनी त्याला गप्प राहण्याची खूण केली. सर्व लोकांसमोर आपली चर्चा व्हावी असे श्रीगुरुजींना वाटत नव्हते.
कार्यकर्त्याला नंतर समजले की, दरवाजाची ठोकर लागून श्रीगुरुजींच्या पायाला जखम झाली आणि त्या जखमेतील रक्त धोतराला लागले होते.
- श्री. सूर्यनारायणराव