डॉक्टर आणि श्रीगुरूजी
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
श्रीगुरूजी फारच तन्मयतेने त्या आठवणी ऐकत असल्याचे पाहून डॉक्टरांच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग मी सांगितला. ''डॉक्टर हेडगेवार फार आजारी आहेत. तूर्त ते नव्या शुक्रवारीतल्या स्वत:च्या घरीच असतात. तुम्हाला कोणाला सहज जमले तर त्यांच्या घरी जाऊन या.'' ही माहिती 1940 साली आमच्या धंतोली शाखेचे कार्यवाह गुणाकर पिंगळे (मोरोपंत पिंगळे यांचे ज्येष्ठ बंधू) यांनी काही विशिष्ट स्वयंसेवकांना सांगितली. माझा मुक्काम धंतोलीत असला, तरी माझ्या जेवणाखाण्याची धंतोलीत काहीच सोय नसल्यामुळे मुक्कामापासून तीन-चार मैलांवर असलेल्या माझ्या मावशीच्या घरी सायकलवर नित्यच जाणे-येणे करावे लागे. गुणाकर पिंगळे यांनी ही माहिती सांगितली.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊच्या सुमारास मी डॉक्टरांच्या घरी गेलो. घर अगदी जुने वाटले. ओसरीतून अंधाऱ्या माजघरात शिरलो तेव्हा डॉक्टर एका खाटेवर निजले असून त्यांच्या उशाशी एका स्टूलावर लांब सदरा आणि पायजमा घातलेले श्रीगुरूजी मला दिसले. इतर कोणीही त्या माजघरात नव्हते. मी गुपचूप जाऊन सतरंजीवर बसलो, त्या वेळी श्रीगुरूजी मला नावाने ओळखीत होते की नाही याबद्दल मला शंका होती. मी आत जाऊन बसताच श्रीगुरूजींनी नाकासमोर तर्जनी उगारून काहीही न बोलण्याची सुचना केली. अत्यवस्थ आद्य सरसंघचालकांच्या उशाशी किडकिडीत अंगकाठीचे, अस्ताव्यस्त केसांचे आणि जागरणामुळे तारवटलेल्या डोळयांचे तत्कालीन सरकार्यवाह पाहून धंतोली शाखेचा हा 'गटनायक' जागच्या जागी थिजून गेला होता. श्रीगुरूजींच्या तर्जनीचा संकेत ओळखून मी तेथे दगडी पुतळयासारखा बसून राहिलो. पाच-सात मिनिटांनी डॉक्टरांच्या कण्हण्याचा आणि अस्पष्ट शब्दोच्चाराचा आवाज आला. श्रीगुरूजींनी मनगटावरच्या घडयाळात वेळ पाहून बाटलीतले औषध काचेच्या पेल्यात ओतून डॉक्टरांना हळुवारपणे पाजले. त्याच वेळी बापूराव दिवाकर त्या खोलीत आले. श्रीगुरूजींनी मला उद्देशून जशी तर्जनी उगारली तशी मी त्यांच्यापुढे उगारली. आम्ही दोघेही चिडीचूप होऊन तेथे बसून होतो. औषधाचा डोस देऊन झाल्यावर डॉक्टरांच्या अंगावरचे पांघरूण नीट करून श्रीगुरूजींनी आमच्याकडे पाहून बाहेर जाण्याची खूण केली.
त्याबरोबर आम्ही दोघेही अंगणात आलो. पाठोपाठ श्रीगुरूजीही आले. ''प्रकृती बरीच गंभीर आहे'' हे वाक्य सांगण्यासाठी ते आमच्याबरोबर फाटकापर्यंत आले. बाहेर निघण्यापूर्वी त्यांना नमस्कार करण्यासाठी मी मागे वळून पाहतो तोच डॉक्टर अंथरूणावरून उठून ओसरीच्या दाराला टेकून उभे असलेले दिसले. त्या अत्यवस्थ स्थितीत त्यांच्या तोंडून काहीतरी इंग्रजी वाक्य निघाले. त्यातला 'प्रोटेक्टर' हा एक शब्द मला समजला. तत्काळ श्रीगुरूजी फाटकापासून धावत डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना हात धरून माजघरात घेऊन गेले. डॉक्टर आणि श्रीगुरुजी या दोघांना एकत्र असे मी पाहिले, तो हाच प्रसंग.
श्रीगुरूजी आणि डॉक्टर यांना एकत्रित सर्वात शेवटी पाहिल्याचा पुढचाही प्रसंग आठवला. त्यानंतर लवकरच 20 जून 1940 रोजी डॉक्टरांचे देहावसान झाले. ही दु:खद बातमी धंतोलीवरून नित्याप्रमाणे शहर भागात जात असताना सकाळी नऊच्या सुमारास कॉटन मार्केटच्या फाटकासमोर भेटलेल्या कृषी महाविद्यालयाच्या एका स्वयंसेवक मित्राने मला सांगितली. तत्काळ मी सायकलचे पूर्वेकडेच तोंड पश्चिमेकडे वळविले आणि घटाटयांच्या बंगल्यावर पोहोचलो. गर्दी बरीच होती. बंगल्याच्या प्रदीर्घ व्हरांडयातल्या बेंचवर त्या गर्दीत श्रीगुरूजी दिसले. दोन्ही पायांचा पेचा घालून बेंचाच्या हातावर कोपर ठेवून तळहातावर कपाळ टेकवून त्या वेळी ते बसले होते. डोळे मिटले होते. त्यांच्याकडे पाहताच मला त्या दिवशीचा डॉक्टरांच्या घरचा प्रसंग आठवला. त्या गर्दीत खोलीमध्ये जाऊन डॉक्टरांच्या देहाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. श्रीगुरूजी तसेच बसलेले दिसले!