सदैव सावधान
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
लहानशा गोष्टींकडेही लक्ष
कोणी एक स्वयंसेवक हरदोई जिल्ह्याच्या जिल्हा प्रचारकावर नाराज झाला होता. त्याने त्या प्रचारकाविरुध्द अनेक खोटयानाटया गोष्टी लिहून एक तक्रार वजा पत्र श्री. शारदाभक्त सिंहांच्या नावाने सरळ श्रीगुरुजींच्या नावाने पाठवून दिले. श्रीगुरुजींनी ते पत्र मला पाठवले आणि स्वत: मला पत्र पाठवून कळविले की, श्री. शारदाभक्त सिंहांना ते पत्र दाखवून विचारा की, त्यानेच ते पत्र लिहिले होते का अन्य कोणी? या व्यतिरिक्त त्यांनी श्री. शारदाभक्त सिंह यांनाही पत्र लिहिले कारण त्यांनीच ते लिहिले होते का हे गुरुजींना जाणून घ्यायचे होते. पत्र लेखनाच्या शैलीवरून त्यांना संशय होता की, ते पत्र त्यांनी लिहिलेले नव्हते, तर कोणी लबाड माणसाने लिहिले होते. त्यानंतर ब¬याच दिवसांनी एका शिबिरात श्रीगुरुजी मला व श्री. शारदाभक्त सिंह यांना भेटले. त्यांनी आम्हा दोघांना वेगळे वेगळे भेटून विचारले की, ज्याने पत्र लिहिले होते त्याचा पत्ता लागला का? लहानशा गोष्टींवरही श्री गुरुजींचे बारीक लक्ष असे.
 
लखनौस संघ शिक्षा वर्गाचा मी कार्यवाह होतो. श्रीगुरुजी सायंकाळी जरा निजले होते. संधी साधून मी त्यांना भेटण्यास गेलो आणि त्यांच्या पायाला शिवू लागलो. श्रीगुरुजींना संघचालकांविषयी विलक्षण आदर असे. तसे ते कोणालाही आपल्या पायांना शिवू देत नसत. पण मी पायांना शिवल्यावर ते एवढेच म्हणले की, निजलेल्या व्यक्तीच्या पायांना अंतकाळीच शिवतात. मी लज्जित झालो. श्रीगुरुजींच्या निधनानंतर मला त्या वाक्याची पुन्हा पुन्हा आठवण येते आणि मनात विचार येतो की काय हे वाक्य त्यांनी आपल्यासाठीच म्हटले होते!
- सिध्द गोपाल अग्निहोत्री
 
पाय लटपटायचे नाहीत
पश्चिम उत्तर प्रदेशच्या तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांचे शिबीर बरेली येथे मनोहर भूषण इण्टर कॉलेजमध्ये जानेवारी १९७३ मध्ये भरले होते. श्रीगुरुजी त्या शिबिरात पूर्णवेळ उपस्थित होते. पश्चिम उत्तर प्रदेशचा हा त्यांच्या जीवनातील शेवटचा कार्यक्रम ठरला. श्रीगुरुजी बरेच अस्वस्थ होते.
 
दुपारच्या जेवणानंतर श्रीगुरुजी हात धुण्यासाठी आले. हात धुताना शिंतोडे उडू नयेत या दृष्टीने व्हरांडयाच्या पाय¬यांवर हात धुण्याची व्यवस्था केली होती. श्रीगुरुजी हात धुतल्यावर मागे आले तेव्हा असे वाटले की, त्यांचे पाय लटपटताहेत. ते पडू नयेत असा विचार करून जेव्हा आम्ही दोन कार्यकर्ते त्यांना आधार देण्यासाठी पुढे आलो तेव्हा त्यांनी म्हटले की, काळजी करू नका. तुमच्या सरसंघचालकांचे पाय लटपटायचे नाहीत.
- कमलेश कुमार
 
केवळ एक चमचा तूप
सन् १९६८ ची गोष्ट. मी कानपूरला गेलो होतो. त्या दिवशी श्रीगुरुजी आमच्यामध्ये होते. जेवणाच्या वेळी मी मुद्दामहून त्यांच्या समोरच्या ओळीत बसलो होतो. सर्व स्वयंसेवक जेवायला बसले होते. अधिका¬यांची जागा मोकळी होती. तूप वाढले जात होते. जो स्वयंसेवक तूप वाढत होता, त्याने श्रीगुरुजींच्या वाटीत दोन चमचे तूप वाढले. त्याचवेळी श्रीगुरुजी आणि अन्य अधिकारी तेथे पोहोचले. तूप वाढणा¬या स्वयंसेवकाने आपल्या वाटीत दोन चमचे तूप वाढले आहे ही गोष्ट श्रीगुरुजींच्या बारीक नजरेतून निसटली नाही. तूप वाढणारा जो स्वयंसेवक वाढता वाढता पुढे गेला होता, त्याला बोलावले गेले.
 
तो स्वयंसेवक जवळ आल्यावर श्रीगुरुजींनी त्याला विचारले की, तुम्ही या वाटीत किती चमचे तूप वाढले होते? तो म्हणाला की, दोन. श्रीगुरुजींनी विचारले की, बाकीच्या स्वयंसेवकांना किती चमचे तूप वाढले? तो म्हणाला की, एक. श्रीगुरुजींनी त्याला प्रेमाने दटावून सांगितले की, असा पक्षपात का केला? मी काय तुम्हाला या सर्व लोकांपासून वेगळा दिसतो? माझ्याही वाटीत एक चमचाच तूप घालायला हवे होते. ज्यात एक चमचा तूप घातले आहे, अशी दुसरी वाटी जेव्हा आणली तेव्हा कोठे श्रीगुरुजींनी ते स्वीकारले. तो स्वयंसेवक खूपच संकोचला. संघाचे वैशिष्टय यातच आहे की, साधारण स्वयंसेवकापासून सरसंघचालकापर्यंत सर्वांशी एकाच प्रकारचा व्यवहार होतो. म्हणूनच प्रत्येक स्वयंसेवक आपल्या सरसंघचालकांशी निःसंकोचपणे बोलू शकतो. दुसरीकडे कोठे असे दिसत नाही.
- महेशचंद्र पाण्डेय
 
वेळेवर कार्यक्रम व्हावा यासाठी कटाक्ष
बिहार मधील मोतीहार गावी स्वयंसेवकांच्या कार्यक्रमास श्रीगुरुजींना जायचे होते. ज्या कारने जायचे होते ती कार काही अपरिहार्य कारणांमुळे संघस्थानावर गेलेली होती. कार्यक्रमाची वेळ जवळ येत चालली होती. श्रीगुरुजींनी विचारले की, अजून किती वेळ वाट पहायची? संघस्थान किती दूर आहे? एकाने सांगितले की, दोन किलोमीटर असेल. श्रीगुरुजींनी घडयाळ पाहिले आणि म्हणाले की, मग पायी देखील जाता येईल. लगेच त्यांनी खांद्यावर पंचा टाकला, पायात चप्पल घातली आणि कुणाच्या उत्तराची वाट न पहाता ते संघस्थानाकडे चालू लागले. मग अधिकारीही त्यांच्याबरोबर निघाले. पायी जायचे ठरवल्यामुळे श्रीगुरुजी वेळेवर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहू शकले. श्रीगुरुजींना पायी येताना पाहून सर्वजण अचंबित झाले. दुस¬याच क्षणी मुख्य शिक्षकाची शिटी वाजली, दक्ष दिले गेले, सरसंघचालकप्रणाम 'एक, दोन, तीन' होऊन कार्यक्रम सुरू झाला.
- खेमनदास कथुरिया
 
अखंड सावधान
रेल्वेने रात्री प्रवास करताना गाडी किती वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहे याची माहिती श्रीगुरुजी निघतानाच घेत असत. जेव्हा केव्हा गाडी मुक्कामास पोहोचेल त्याच्या आधीच श्रीगुरुजी उतरण्याच्या तयारीत असत. त्यांना उठवण्याची आवश्यकता पडत नसे. सन १९७३ मध्ये श्रीगुरुजी चेन्नई (मद्रास) हून मदुराईला चालले होते. प्रवास सुरू होण्यापूर्वी मी त्यांना सांगून ठेवले होते की, पहाटे सव्वा पाच वाजता डिंडिगल स्टेशनवर त्यांच्यासाठी चहा येणार आहे. डिंडिगल येताच आम्ही सर्वजण श्रीगुरुजींना उठवण्यासाठी त्यांच्या डब्यापाशी गेलो. वास्तविक कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर श्रीगुरुजींची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती. परंतु आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला, कारण आम्ही पाहिले की, श्रीगुरुजी आपल्या डब्यात चहा पिण्याच्या तयारीने बसलेले आहेत.
- ए. दक्षिणामूर्ती
 
मोठयांविषयी आदराची भावना
तामिळनाडूच्या कार्यकर्त्यांची बैठक, दि. २२ ते २४ जानेवारी १९७३ या कालावधीत चेन्नई (मद्रास) ला होती. श्रीगुरुजींचा निवास माझ्याकडे होता. बैठक संपल्यावर मी घरी परतलो. दरवाजा उघडण्यासाठी आई उठली. परंतु श्रीगुरुजींनी त्यांना उठू दिले नाही आणि स्वतः पुढे होऊन दरवाजा उघडला. श्रीगुरुजींच्या मनात वडिलधारी व्यक्तींविषयी केवढा आदर होता हे यावरून दिसून येते
- सुब्रह्मण्यम्