गाडगीळ वाडा
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
श्रीगुरूजींच्या सूक्ष्म निरीक्षणातील सर्वंकषपणाची जाणीव देणारा आणखी एक प्रसंगी मला या वेळी आठवतो. 1942-43 च्या सुमारास सीताबर्डीवरील नागपूर महाविद्यालयाच्या (त्या वेळचे मॉरिस कॉलेज) जुन्या इमारतीसमोरचा प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळांचा प्रशस्त वाडा भाडयाने देण्यासाठी रिकामा झाला होता. त्या भागातले एक कार्यवाह संघ कार्यालयाच्या दृष्टीने त्या वाडयाची पाहणी करून आले. मी त्या काळात सदर भागाचा कार्यवाह होतो. मलाही त्यांनी तो वाडा आपल्या कामाच्या सोयीच्या दृष्टीने दाखविला. त्या वेळी सध्याचे भव्य संघ कार्यालय (डॉ. हेडगेवार भवन) अस्तित्वात नव्हते. श्रीगुरूजींचे नागोबाच्या गल्लीतले घर हेच संघाचे कार्यालय होते.
धनंजराव गाडगीळांच्या वाडयाबद्दलचा आपला अभिप्राय कळविण्यासाठी त्याच रात्री आम्ही दोघे कार्यवाह श्रीगुरूजींच्या घरी गेलो. त्या वाडयाची माहिती श्रीगुरूजींना होतीच. दुसऱ्या दिवशी सकाळी तो वाडा पाहण्यासाठी जाण्याचे त्यांनी ठरविले. श्रीगुरूजींच्या समवेत आम्ही पुन्हा एकदा सर्व वाडयांतून हिंडून आलो. बरोबर बाबासाहेब आपटेही होते. सकाळी दहाच्या सुमारास हा कार्यक्रम आटोपल्यावर सायंकाळी मोहिते संघस्थानावर श्रीगुरूजींचा अभिप्राय विचारण्यासाठी आम्ही गेलो. या कामी फार उशीर झाला तर वाडा दुसऱ्या कुणाला दिला जाण्याची शक्यता दिसत होती. प्रार्थनेनंतर श्रीगुरूजींच्या घरी चहाच्या वेळी इतर कोणीतरी मंडळी येऊन बसल्याने वाडयाबद्दलची चर्चा आम्हाला करता आली नाही.
त्यानंतर सायंकाळी संध्या आटोपून श्रीगरुूजी बैठकीत आल्यावर आम्ही दोघांनी धनंजयरावांच्या वाडयाबद्दल श्रीगुरूजींचा अभिप्राय विचारला. त्याबरोबर त्या वाडयातील खोल्या किती, त्यांची प्रत्येकी लांबी-रूंदी किती, कोणती खोली कोणत्या कामासाठी उपयोगी होईल इत्यादी चर्चा सुरू झाली तेव्हा हे लक्षात आले की, त्या विशाल वाडयातील सर्व खोल्ल्यांची व एकूण रचनेची संपूर्ण कल्ल्पना फक्त श्रीगुरूजींनाच होती. इतरांनी दोन-तीनदा तो वाडा पाहिला तरी त्यांच्या संपूर्ण रचनेची कल्पना त्यांच्या डोक्यात शिरली नव्हती. (श्रीगुरूजींना तो वाडा सर्व दृष्टींनी फार आवडला होता. पण इतर अनेक कार्यकर्त्यांचे मत संघाचे केंद्र कार्यालय शहर विभागातच असावे असे आढळून आल्याने तो वाडा कार्यालयासाठी भाडयाने घेण्याची कल्पना बारगळली.)