धृतराष्ट्राच्या घरी गांधारीचे गाणे
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
श्रीगुरूजींचे परम मित्र श्री. सावळाराम यांची स्वत:ची गायनशाळा होती. बनारसहून नागपुरास आल्यावर व त्यानंतर सारगाछी आश्रमातून परतल्यावर श्रीगुरूजींचा बहुतेक वेळ या अंध मित्राच्या घरीच जात असे. गप्पा, हास्यविनोद, चहा, सिगारेट यात सारा दिवस आनंदात निघून जात असे. सावळाराम मास्तर हे अंध असले तरी आपल्या संगीत कलेत, विशेषत: बासरीवादनात अत्यंत निपुण होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरही चांगलेच प्रभुत्व होते. विनोदबुध्दीही मोठी सूक्ष्म होती. अंधांच्या ब्रेल लिपीतले इंग्लंडमधून मिळू शकणारे बहुतेक सारे उत्तम ग्रंथ त्यांनी 'स्वहस्ते' वाचले होते. त्या लिपित उपलब्ध न होणारे उत्तमोत्तम मराठी साहित्या श्रीुरूजी आपल्या या मित्राला वाचून दाखचीत किंवा त्याबद्दलची माहिती सांगत असत.
सावळाराम गायनशाळेचे उत्सव समारंभ आयोजित करण्यात श्रीगुरूजी पुढाकार घेत. उत्सवानिमित्त बोलवावयाच्या गवयाशी पत्रव्यवहार करणे इत्यादी सर्व कामे श्रीगुरूजी आपल्या घरची म्हणून त्या काळात करीत असत.
एका समारंभासाठी श्रीमती गंगूबाई हनगल यांचे गायन आयोजित करावे अशी इच्छा सावळाराम मास्तरांनी मित्रमंडळींच्या बैठकीत व्यक्त केली. त्याबरोबर एकदम सावळाराम मास्तराच्या हातावर टाळी देऊन श्रीगुरूजी ओरडले, ''खाशी कल्पना ! ग्रँड आयडिया ! धृतराष्ट्राच्या घरी गांधारीचे गाणे झालेच पाहिजे ! '' श्रीमती गंगूबाईचे मूळ नाव 'गांधारी' आहे हे ज्यांना माहीत होते त्यांना या वाक्यातील विनोद लक्षात येताच तत्काळ हास्याचे कारंजे उडाले.