जोडयाने नमस्कार
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
स्वयंसेवकांच्या किंवा आप्तेष्टमंडळींच्या विवाहप्रसंगी श्रीगुरूजी अत्यंत तत्परतेने उपस्थित राहात. त्यातही ज्यांच्याशी विशेष आत्मीयतेचे संबंध असत, अशांच्या घरच्या लग्नप्रसंगी घरच्या आमंत्रकाप्रमाणे ते अभ्यागताचा सत्कार करण्यासाठी द्वाराशी उभे राहात. आलेल्या प्रत्येकाला पानसुपारी, अत्तर-गुलाब देण्यासाठी ते धावपळसुध्दा करीत. श्रीगुरूजींना उपस्थित राहण्यास सोयीचा होईल तो मुहूर्त काढण्याची दक्षता अनेक घरी घेतली जाई, तर काहींच्या विवाहप्रसंगी श्रीगुरूजी स्वत:च्या दौऱ्यात वेळ काढून कधी मद्रासहून मुंबईला तर कधी दिल्लीहून नागपूरला अशी धावाधावही करीत. प्रत्यक्ष विवाहप्रसंगी उपस्थित न राहत आले तर त्यानंतर लगेच त्या गावी गेल्यावर लग्नघरी नवीन वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांची भेट ठरलेली असे. अशाच एका ठिकाणी लग्नाच्या वरातीच्या सुमारास श्रीगुरूजी जाऊन पोहोचले. नवरदेव नवा करकरीत विवाहाचा संपूर्ण पोषाख घालून वरातीच्या तयारीत होता. श्रीगुरूजी आल्याबरोबर त्याला नमस्काराची घाई झाली खरी, पण पायातला बूट काढून नंतर नमस्कार करण्यात वेळ जात होता. शेवटी पायातला बूट न काढताच त्याने नतमस्तक होऊन श्रीगुरूजींना नमस्कार केला. त्यानंतर तीन-चार मिनिटांनी नववधू नमस्काराला पुढे आली. त्याबरोबर श्रीगुरूजी म्हणतात, ''आता तुझ्या नमस्काराची आवश्यकता नाही, आधीच 'जोडयाने' नमस्कार झाला आहे.'' त्या शब्दातला श्लेष वधूच्या लक्षात न आल्याने पुन्हा:पुन्हा श्रीगुरूजी तेच वाक्य उच्चारून नमस्कार करू नये हे वधूला सुचवीत होते. शेवटी तिने नमस्कार करताच ''आज दोनदा जोडयाने नमस्कार केला'' हे वाक्य त्यांनी उच्चारताच हास्याचे कारंजे उडाले.