एवढे वाक्य मी उच्चारणार नाही
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
नागपुरातील एका प्रथितयश विद्वानाचे दोघे चिरंजीव माध्यमिक शिक्षणाच्या दशेत असताना संघाच्या वातावरणात बरेच तन्मय झाले होते. आईवडील सुसंस्कृत असले तरी त्यांना मुलांची ही संघनिष्ठा मुळीच पसंत नव्हती. संघ स्वयंसेवकांच्या परिवारात बराच काळ खर्ची घातल्याने त्यांच्या अभ्यासात मोठे विघ्न आले होते किंवा ते अभ्यासात मागासले होते, असला काही भाग नव्हता. पण मुलांनी घरच्या परिवारापेक्षा स्ययंसेवकांच्या परिवारात दिवसभर रमावे ही गोष्ट आईवडिलांना अजिबात मान्य नसल्याने घरात तंग वातावरण निर्माण झाले होते. आईवडिलांच्या अत्यंत तीव्र विरोधामुळे मुलांना घरी राहणे अशक्य होऊन ते दोघेही एके दिवशी श्रीगुरूजींच्या घरी राहण्यासाठी आले. चार दिवस त्यांच्या घरच्या लोकांनी मुलांच्या त्या गृहत्यागाकडे दुर्लक्ष केले. शेवटी मुलांचे वडील एका मान्यवर स्नेह्याला मध्यस्थी म्हणून बरोबर घेऊन श्रीगुरूजींच्या घरी आले.
औपचारिक बोलणी झाल्यानंतर त्या सद्गृहस्थांनी आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले व त्यावर मुलांना घरी परत पाठवावे अशी विनंती त्यांनी केली. त्यावर श्रीगुरूजी त्यांना म्हणाले, ''तुमची मुले माझ्या घरी आली, पण घरी आलेल्याला परत घालविणे माझ्या स्वभावात नसल्याने मी त्यांना परत घालवून दिले नाही. आता तुमची आज्ञा त्यांना सांगून परत जाण्यास मी सांगतो.''
त्यावर त्या सद्गृहस्थांनी श्रीगुरूजींना विनंती केली की, ''घरी गेल्यानंतर परत संघात जाऊ नये असेही तुम्हीच मुलांना सांगा. आमचे काही ते ऐकत नाहीत!'' त्यावर श्रीगुरूजी हसून म्हणाले, ''अहो, मी तुमच्या मुलांना तुम्ही जे काही सांगाल ते सारे करायला सांगेन, फक्त ''संघात जायचे नाही'' हे वाक्य मी कदापि उच्चारणार नाही. तुम्ही संघ शाखेत जात नसाल तर तुम्हालासुध्दा संघ शाखेत जा असेच सांगेन. ईश्वराने माझ्याकडे जी भूमिका सोपविली आहे त्या भूमिकेवरून ''तू संघात जाऊ नकोस'' हे वाक्य मी काय वाटेल ते झाले तरी कधीही उच्चारणार नाही. मी जे म्हणतो त्याच्याशी तुम्हीही सहमत व्हाल असे मी समजतो !''
शेवटी श्रीगुरूजी म्हणाले, ''मुलांनी आपल्या घरची कामे वेळच्या वेळी केली पाहिजेत. आईवडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. शाखा सुटल्यावर ठराविक वेळी घरी परतले पाहिजे. स्वत: मी शाखा संपल्यानंतर निश्चित वेळी आपल्या घरी जातो. मात्र आपण संघ शाखेत जातो यालाच आईवडिलांचा विरोध असेल तर त्या विरोधाची पर्वा करू नये असेच मी म्हणेन !''
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याविषयी त्या काळातल्या सर्वसाधारण सरकारी नोकराचे किंवा काँग्रेसनिष्ठांचे जसे मत असावे तसे त्या सद्गृहस्थाचे मत दिसले. त्यामुळेच ते श्रीगुरूजींना यापूर्वी कधी भेटले नव्हते. आजच्या या भेटीत श्रीगुरूजींच्या वागण्याचा आणि एकूण बोलण्याचा फारच अनुकूल परिणाम त्यांच्यावर झाला. संघाविषयी आत्मीयता नसणाऱ्या (किंबहूना प्रतिकूल भूमिका असणाऱ्या) सुजाण व्यक्तीला श्रीगुरूजी आपल्या भाषणकौशल्याने आणि मनमिळाऊ वागणुकीने कसे जवळ ओढतात ते मला या बैठकीत उत्तम प्रकारे पहावयास मिळाले. हे विद्वान सद्गृहस्थ पुढे संघाला इतके अनुकूल झाले की, गांधीहत्येचे धडधडीत खोटे निमित्त करून नेहरू सरकारने संघावर बंदीचा अत्यंत अन्याय्य निर्बंध लादून संघ स्वयंसेवकांचा सर्वत्र उच्छाद मांडला. त्या काळात या सद्गृहस्थांनी आपल्या मराठी साप्ताहिकात संघाची न्याय्य बाजू रोखठोकपणे मांडून नेहरू सरकारच्या घोर अन्यायाचा नि:संदिग्धपणे निषेध केला. नागपुरातच नव्हे, संपूर्ण विदर्भात त्या काळात संघाचा पक्ष घेणारे तेच एकमात्र साप्ताहिक होते. त्याचे संपादक असलेले प्रस्तुत सद्गृहस्थ आपल्या विद्वत्तेमुळे अखिल महाराष्ट्रात, विशेषत: तत्कालीन काँग्रेसच्या सत्प्रवृत्त कार्यकर्त्यांत मान्य असल्यामुळे त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेचा सुजाण मराठी वाचकवर्गात मोठा प्रभाव पडला होता.
प्रस्तुत आठवणीतले सद्गृहस्थ म्हणजे प्रख्यात मराठी साहित्यिक प्रा. श्री. ना. बनहट्टी हे होत. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. माधवराव बनहट्टी यांनी उच्च शिक्षण संपल्यानंतर बंगाल प्रांतात संघाचे यशस्वी प्रचारक म्हणून कार्य केले. आपल्या या मुलाच्या त्यागमय आणि ध्येयनिष्ठ जीवनाबद्दल वडिलांना मोठा अभिमान असे.