''कामाला उगीच उशीर होईल''
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
एके दिवशी दुपारी श्रीगुरूजी एक स्वयंसेवकाच्या (आबाजी सेनाड) घरी चहापानासाठी गेले होते. त्यांच्या घरी सर्व निमंत्रितांना बसण्यासाठी खालच्या पडवीत बैठक टाकली होती. श्रीगुरूजी पूर्वेकडील अंगणाकडे तोंड करून बसले होत. ते येऊन बसल्यानंतरही काही मंडळी येतच होती. त्या प्रत्येकाकडे त्यांचे नेहमीप्रमाणे लक्ष होतेच. त्यातल्या एकाला जाण्याची विशेष घाई असल्याने चहापान आटोपताच तो बैठकीतून उठून चपला घालून चालू लागला. तो बाहेरच्या फाटकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच श्रीगुरूजींनी त्याला परत बोलावून प्रश्न विचारला, ''कशासाठी तुला परत बोलाविले असेल सांग बरं !'' तो गृहस्थ म्हणाला, ''काही तरी सांगायचं असेल!''
श्रीगुरूजी - अ हं! त्यानंतर त्यांच्याजवळ बसलेल्या दोघाचौघांना त्यांनी प्रश्न विचारला, ''सांगा बरं मी याला कशाला बोलावलं असेल?'' हा चमत्कारिक प्रश्न ऐकून सगळे एकमेकांच्या तोंडाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले. या निमित्ताने बैठकीत थोडी खाखस पिकली. शेवटी त्याची जाण्याची घाई पाहून श्रीगुरूजी एकदम म्हणाले, ''त्या... च्या चपला आपल्ल्या पायातून काढून त्या ज्या तुझ्या चपला तिथे दिसताहेत त्या घालून ताबडतोब जा. नाहीतर तुझ्या कामाला उगीच उशीर होईल!'' हे वाक्य ऐकताच त्या बैठकीत हास्याचा जणू स्फोट झाला.