केशव आणि माधव
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
'मी जीवनातील सर्वात मोठा अपराध केला आहे'
१९४० च्या जूनमध्ये नागपूर शिक्षा वर्गाचा समारोप होता. त्या वर्षीचा वर्ग म्हणजे पू. डॉक्टरांच्या हृदयातील साकार झालेले स्वप्न होते. उत्तरेत पंजाबपासून दक्षिणेत चेन्नई (मद्रास)पर्यंत विविध प्रांतातून संघाचे स्वयंसेवक पहिल्यांदाच शिक्षा वर्गात एकत्र झाले होते.
 
त्या दिवशी समारोपाचा समारंभ होता. पू. डॉक्टरांची प्रकृती पुण्याच्या वर्गाहून परतल्यावर खूपच बिघडली होती. वर्गात जाऊन स्वयंसेवकांशी गप्पागोष्टी करणेही त्यांना शक्य नव्हते. आपल्याला वर्गातील स्वयंसेवकांना भेटताही येत नाही ही अवस्था डॉक्टरांसाठी असह्य होती. श्रीगुरुजी त्या काळात रात्रंदिवस त्यांच्या सेवेत होते. वैद्यकीय डॉक्टरांच्या सूचना नीट पाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्या दिवशी समारोपास उपस्थित राहण्याची पू. डॉक्टरांची तीव्र इच्छा होती. परंतु त्यांना तिथपर्यंत घेऊन जाण्याची परवानगी देण्यास डॉक्टर तयार झाले नाहीत. श्रीगुरुजींशी केलेल्या बोलण्यावरून पू. डॉक्टरांनी जाणले की, समारोपास त्यांना नेले जाणार नाही.
 
जवळ कोणी नाही हे पाहून, पू. डॉक्टरांनी कार चालकाला जवळ बोलावले. त्याला सांगितले, ''समारोपाच्या थोडे आधी कार घेऊन ये. हेही स्पष्टपणे सांगितले की, ही गोष्ट दुस¬या कोणाच्या कानावर घालू नकोस.''
 
श्रीगुरुजी समारोपास जाण्याच्या तयारीत असताना चालकाने कार काढली. श्रीगुरुजींनी त्याला विचारल्यावर त्याने खरेपणाने सर्व काही सांगून टाकले. त्याचबरोबर पू. डॉक्टरांच्या सूचनाही सांगितल्या. चालकाने विचार केला की श्रीगुरुजींपासून कोणतीही गोष्ट कशी दडवून ठेवता येईल? श्रीगुरुजींनी हे ऐकल्यावर सांगितले, ''कार घेऊन जाण्याची काही आवश्यकता नाही.''
पू. डॉक्टरांची समारोपास जाण्याची तयारी झाली होती. ते कार येण्याची वाट पहात होते. पण कार आली नाही. ते विचार करू लागले की, आपण सूचना देऊनही कार का आली नाही? तेथे समारोप सुरू झाला असेल आणि आपण मात्र येथे अंथरुणावर पडून रहायचे, ही गोष्ट पू. डॉक्टरांना सहन करण्याच्या पलिकडची होती. पण ते काहीच करू शकत नव्हते. म्हणून डोळे मिटून ते स्वस्थ पडून राहिले. त्यांच्या मन:पटलासमोर सारा कार्यक्रम, ध्वजारोहण, प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन, श्रीगुरुजींचे भाषण इ., चित्रपटाप्रमाणे साकार होत होता.
 
समारोप झाल्यावर श्रीगुरुजी व अन्य लोक परतले. ते सगळेजण कार्यक्रमाचे सविस्तर निवेदन करण्यासाठी पू. डॉक्टरांपाशी गेले. पण पू. डॉक्टरांची उग्र मुद्रा पाहून कोणीही त्यांच्या जवळ बसण्याचे धाडस केले नाही. त्यांचा भावनांचा आवेग पाहून श्रीगुरुजींचाही थरकाप उडाला.
 
थोडया वेळाने श्रीगुरुजी मन खंबीर करून पू. डॉक्टरांच्या जवळ गेले. त्यांनी विनम्रपणे पू. डॉक्टरांना म्हटले की, उद्या सकाळी वर्गाचा खाजगी समारोप आहे. आपणही तेथे काही वेळ उपस्थित राहून स्वयंसेवकांशी चर्चा करू शकाल.
दुस¬या दिवशी कार्यक्रम झाला. त्याची आठवण करून एकदा श्रीगुरुजी म्हणाले, ''मलाही कल्पना नव्हती की, पू. डॉक्टरांचा भावावेग एवढा तीव्र असेल. त्यांना पाहिल्यावर मला वाटले की, मी जीवनातला सर्वात मोठा अपराध केला आहे. त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याचाच आम्ही विचार केला. त्यांच्या भावनांची खोली माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला कशी समजणार? त्याचबरोबर 'असे अनेक समारोप पू. डॉक्टरांनी पाहिले आहेत, एखादा नाही पाहिला तर काय बिघडले!' असा केलेला विचार पू. डॉ. च्या संबंधात चुकीचा ठरला. त्यांची प्रत्येक कार्यक्रमांत जी श्रध्दा, आत्मीयता असे, त्याचे प्रत्ययकारी दर्शन त्या दिवशी मला झाले.
 
- यादवराव जोशी