विचारांची विशालता
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
कार्ल मार्क्सची प्रेरणा - नीती शास्त्र
कम्युनिस्ट संघाला नेहमीच शिव्या देत असतात, परंतु श्रीगुरुजींनी आपल्या कित्येक भाषणात असे म्हटले की, मार्क्सशी माझा तात्त्वि मतभेद अवश्य आहे, परंतु मी हेही जाणतो की, भारतीय कम्युनिस्टांनी कार्ल मार्क्सवर अन्याय केला आहे. Karl Marx was not a crude materialist. ते केवळ भौतिकवादी नव्हते. त्यांची प्रेरणा (Ethics) नीतीशास्त्रात होती. परंतु युरोपमध्ये त्या काळी Ethics आणि Religion, Religion आणि Church, Church आणि Fuedalism, Fuedalism आणि Capitalism, Capitalsim आणि Monarchy या सर्वांचे एक 'दुष्ट चक्र' vicious circles बनले होते आणि त्याच्याबरोबर गैरसमज होऊ नये म्हणून कार्ल मार्क्सने, मूळ प्रेरणा Ethics असूनही त्याचा उल्लेख केला नाही. Materialism हे त्यांचे साधन (instrument) होते आणि Ethics त्यांची प्रेरणा होती. म्हणून कार्ल मार्क्सला 'क्रूड मटेरिऍलिस्ट' मानणे ही भारतीय कम्युनिस्टांची चूक आहे. मार्क्ससंबंधी इतका उदार (Charitable) दृष्टिकोन श्रीगुरुजींनी आपल्या भाषणांमधून प्रकट केला होता. श्रीगुरुजींच्या मनाची ठेवण काहीशी वेगळीच होती.
- दत्तोपंत ठेंगडी
 
आर्थिक समस्या
श्रीगुरुजी केवळ सामाजिक प्रश्नांचेच चिंतन करत नव्हते, आर्थिक समस्यांचे त्यांचे चिंतन तितकेच अभ्यासपूर्ण होते.
श्रीगुरुजींसंबंधी माझ्या मनात कधीही कोणताही गैरसमज नव्हता. माझी त्यांना भेटायची इच्छा होती. ही इच्छा एकदा पूर्णही झाली. 'नवयुग मॅन्शन'मध्ये श्री. फडक्यांच्या घरी आमच्या दोन तास गप्पागोष्टी झाल्या.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अनेक प्रकारचे आरोप केले जातात, पण त्याच्याशी माझे देणे-घेणे नाही. कारण संस्था कोणतीही असो, दल कोणतेही असो, त्यावर आरोप-प्रत्यारोप होतच असतात. श्रीगुरुजींशी माझा जो संवाद झाला तो आर्थिक समस्यांवर. धान्याची जिल्हाबंदी, प्रांतबंदी इ. संबंधी त्यांनी म्हटले, ''प्रत्येक प्रांताने आपण स्वयंपूर्ण होऊन देशाला स्वयंपूर्ण करावे. जर सगळे प्रांत विचार करू लागले की, पंजाबमधून धान्य येता कामा नये तर काम कसे चालेल?''
 
मी समाजवादी! काहीसा साम्यवादी! परंतु तरीही श्रीगुरुजींनी आर्थिक विषयांवर जे विचार व्यक्त केले, त्यांच्याशी माझा कुठे कधी मतभेद उत्पन्न झाला नाही.
 
श्रीगुरुजींचे जीवन राष्ट्र-समर्पित होते. त्यांनी केवळ हिंदुत्वाचाच विचार केला नाही. मुसलमान नकोत, अशी त्यांची भावना कधीच नव्हती. परंतु मुसलमान राष्ट्रीय प्रवाहाशी समरस व्हावेत असा मात्र त्यांचा अवश्य आग्रह होता.
- प्रा. अनंत काणेकर
 
नवबौध्द आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
स्व. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हरिजनांच्या उध्दारासाठी धर्मांतराच्या गोष्टीवर विचार करत होते तेव्हा म्यानमार (ब्रह्मदेश) च्या पंतप्रधानांनी त्यांना रंगूनला येण्याचे निमंत्रण दिले होते. तेथील प्रमुख नेते श्री. उं छां ठुन; जे तेथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, भारतात आले होते. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची ओळख आधीपासून होती. म्हणून भारतात आल्यावर ते श्रीगुरुजींना भेटले व त्यांच्याकडून त्यांनी संघाची माहिती घेतली. नवबौध्द आणि शेष हिंदू समाजाच्या समन्वयासंबंधी चर्चा करताना ते म्हणाले की, बौध्द धर्म भारताबाहेर भारताच्या सनातन धर्माचेच रूप आहे. मुंबईत संघाच्या एका विराट कार्यक्रमात ते श्रीगुरुजींसमवेत उपस्थित राहिले. त्यांच्या स्वागतासाठी देशातील मोठमोठया शहरात नवबौध्दांचे जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांना संघाच्या स्वयंसेवकांनी पूर्ण सहकार्य दिले. चेन्नई (मद्रास) चा शेवटचा कार्यक्रम पार पडल्यावर आपल्या देशाला परतताना श्री. उं छां ठुन यांनी नवबौध्दांच्या नेत्यांना आग्रहाने सांगितले की, आपला बौध्द धर्मात प्रवेश राजकीय हेतूसाठी नसेल तरच आपली उन्नती होईल. या कार्यक्रमात आपल्यासाठी सर्वात जवळचे सहकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक होऊ शकतात. त्यांच्याशी आपले संबंध वाढवले पाहिजेत.
- एक स्वयंसेवक