महात्माजींचा नातू आणि हिंदी
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी हे 'हिम्मत' या हिंदुस्थानी नावाचे एक इंग्रजी नियतकालिक चालवीत असत. या पत्राचे संपादक या नात्याने श्रीगुरूजींना भेटण्यासाठी ते नागपूरला बलराज मधोकबरोबर केंद्र कार्यालयात आले होते. दुपारी चहाच्या वेळेला ते श्रीगुरूजींच्या बरोबर चहाला होते. त्याच दिवशी त्यांची भेट झाली. 'मॉरल रीआर्मासेंट' या नावाने कार्य करणाऱ्या ख्रिस्ती संस्थेच्या पाचगडी केंद्रातील आपल्या कार्याची माहिती ते श्रीगुरूजींना सांगत होते. महात्मा गांधींचा हा नातू प्रारंभापासून अस्सल इंग्रजी ठसक्यात इंग्रजी भाषेतच बोलत होता. त्याचे हे इंग्रजीत बोलणे श्रीगुरूजींना फारसे रूचत नव्हते असे त्यांच्याकडे पाहात असताना मला वाटत होते. पण राजमोहन गांधी हे नवखे असल्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे श्रीगुरूजींच्या मुद्रेवरील अरूचीचा भाव ओळखू शकत नव्हते. आपली एकंदर नापसंती त्यांच्या लक्षात यवी यासाठी त्यांच्याशी बोलताना एकही इंग्रजी शंब्द न वापरता शुध्द हिंदीत श्रीगुरूजी राजमोहन गांधींशी बोलत होते. बोलण्याचा आरंभ करताना पहिलेच वाक्य श्रीगुरूजींनी उच्चारले ते असे होते की, ''तुम्ही बोलता ती इंग्रजी भाषा मला काही विशेष येत नाही. मी बोलते ते हिंदी आपल्याला कळेल असे मी समजाते.'' इ.
श्रीगुरूजींचे इंग्रजी भाषेवरील अप्रतिम प्रभुत्व सर्वविदित असताना ते राजमोहन गांधींशी केवळ हिंदीतच बोलले. याचे कारण याप्रसंगी मी समजलो ते एवढेच की, इतर कोणी इंग्रजीत बोलला तर हरकत नाही. हिंदी भाषेच्या प्रचाराचे महान कार्य करणाऱ्या महात्मा गांधींच्या नातवाने तरी निदान त्या भाषेत बोलू नये!
नागपूरहून गेल्यानंतर राजमोहनने आपल्या या भेटीचा वृत्तांत निवेदन करणारा एक सविस्तर लेख 'हिम्मत' मध्ये प्रकाशित केलेली मी पाहिला !