राष्ट्रीयतेचा मुख्य प्रवाह
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
एकदा राष्ट्रीय एकात्मता परिषदेत श्रीगुरुजींच्या विचारांवर जोरदार चर्चा झाली. प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी गांधी त्या परिषदेच्या अध्यक्षा होत्या. श्री. अटल बिहारी वाजपेयी त्या परिषदेचे एक सदस्य होते. श्री. फकरुद्दीन अली अहमद, व अलीगढ विश्वविद्यालयाचे चान्सलर श्री. अलीसाहेब हेही होते. श्रीगुरुजींचे विचार दर्शन हे पुस्तक तेथे मागविण्यात आले. त्यातील एक भाग काढून प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी गांधींनी विचारले, ''वाजपेयीजी, या भागाचा अर्थ जरा समजावून सांगा.'' श्री. अटल बिहारीजी उत्तरले, ''जर याचा खरा अर्थ समजायचा असेल तर, श्रीगुरुजींना निमंत्रण देऊन येथे बोलवा.'' प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजींनी विचारले, ''याचा अर्थ असा होतो की, हा जो भाग आहे त्याबाबत मतभेद आहेत.'' श्री. अटल बिहारी वाजपेयी उत्तरले, ''माझे काही मतभेद नाहीत. परंतु मी संपूर्ण विवरण करू शकणार नाही. थोडीशी कमतरता राहील. येथे एवढे मोठे नेते बसले आहेत. काही कमी राहणे बरे नाही. त्यांना बोलविले जावे.'' प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी उत्तरल्या, ''त्यांना बोलविणे तर शक्य नाही. याचा अर्थ आपणच समजवा. या उता¬याचा अर्थ हाच आहे ना की, भारतात मुसलमानांना काहीही स्थान असणार नाही?'' श्री. अटलजींनी विचारले, ''असे कोठे लिहिले आहे?'' श्रीमती इंदिराजींनी विचारले, ''यात असे लिहिले आहे की, मुसलमानांनी राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहात स्वत:ला विलीन केले पाहिजे.'' श्री. अटलजी उत्तरले, ''हे ठीक लिहिले आहे.'' श्रीमती इंदिराजींनी विचारले, ''राष्ट्रजीवनाचा मुख्य प्रवाह कोणता आहे?'' श्री. अटलजी उत्तरले, ''जर हाच मतभेद असेल तर, कुणीही भेटून उपयोग होणार नाही. या राष्ट्राचा जन्म 1947 साली झालेला नाही. हे पुरातन राष्ट्र आहे. प्राचीन राष्ट्र आहे. जेव्हा येथे मुसलमान आले नव्हते, तेव्हापासून हे राष्ट्र आहे. जेव्हा येथे ख्रिश्चन आले नव्हते, तेव्हा सुध्दा भारत एक राष्ट्र होते. अथर्ववेदात जेव्हा आम्ही घोषणा केली की, 'पृथ्वी आमची आई आहे आणि आम्ही सर्व तिचे पुत्र आहोत', त्याच वेळी जणू आम्ही आमच्या राष्ट्रीयतेचा उद्धोष केला होता. आणि तो राष्ट्रजीवनाचा मुख्य प्रवाह आहे. त्या प्रवाहाला अनेक छोटया मोठया नद्या मिळाल्या आहेत. गंगेला यमुना मिळाली आहे. पाटण्यात घाघरा मिळाली आहे. परंतु पाटण्यानंतरही गंगा ही गंगाच आहे. त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहात अनेक प्रवाह मिळाले आहेत. आमची संस्कृती अनेक प्रवाहांना घेईलही, परंतु त्यांना आपलेसे करून आत्मसात करेल.''
-----------------------------------------------
साभार - 'स्मृती पारिजात', भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन.