उत्कट परोपकार बुध्दी
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
1936-37 सालची गोष्ट असेल. मी माझ्या मित्राबरोबर बासरीवाले सावळाराम मास्तर यांच्या वर्धा मार्गावरील गायनशाळेत गेलो. अनेक तरूण लोक तेथे बसले होते. त्यात ते माझ्या 50 टक्के परिचयाचे गोळवलकर वकील बसलेले दिसले. त्यांच्या संबंधीची माझी जिज्ञासा नित्य जागृत होतीच. मी त्यांना चालताना-फिरताना अनेकदा पाहिले होते, पण बोलताना कधीच पाहिले नव्हते. या मित्रमंडळींच्या मैफलीत त्यांचे मनमोकळे बोलणे ऐकावयाचा अगदी प्रथम योग आला. गप्पांचा विषय वकिलीचा धंदा हा होता. गोळवलकर वकिलांची विनोदी व मनमोकळेपणे बोलण्याची शैली प्रथमच माझ्या ध्यानात आली. त्याचबरोबर हेही ध्यानात आले की, या धंद्याकडे त्यांचे विशेष लक्ष नाही. गप्पागोष्टी संपल्यावर गोळवलकर आपल्या एका मित्राबरोबर सावळाराम संगीत विद्यालयासमोरील लहानशा पुलाजवळ येऊन बोलू लागले. माझ्या अकारण जिज्ञासेने मला त्यांच्या या खासगी संवादाकडे ओढले. त्या दोघांच्या संवादाशी माझा अर्थाअर्थी संबंध नसतानाही मी थोडा जवळ जाऊन त्यांचे संभाषण ऐकू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की, या महाशयांनी होमिओपॅथीचा चांगलाच अभ्यास केलेला असून होमिओपॅथीचा चांगलाच अभ्यास केलेला असून होमिओपॅथीचा एखादा धर्मार्थ दवाखाना काढण्याचा किवां खासगीरीत्या लोकांना फुकट औषधोपचार करण्याचा यांचा विचार आहे. पण हा संकल्पित धर्मार्थ दवाखाना काढण्यासाठी आवश्यक तेवढे आर्थिक बळ नसल्याने त्यांना आपला उदात्त हेतू सिध्दीस नेता येत नाही. ज्या व्यक्तीविषयी प्रथमदर्शनीच मला अकारण जिज्ञासा किंबहुना आत्मीयता वाटू लागली त्याच्या व्यक्तित्वाचा एक उज्ज्वल पैलू त्या दिवशी प्रथम माझ्या लक्षात आला, तो हा की या माणसाच्या ठिकाणी उत्कट परोपकारबुध्दी आहे व ज्यांच्याविषयी नुसती अकारण आत्मीयता इतके दिवस वाटत होती, त्यांच्याविषयी काहीसा सकारण आदर या प्रसंगापासून वाटू लागला.