समाजातील श्रेष्ठ व्यक्ती
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
श्रीगुरुजी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य व्हावेत म्हणून...
पुण्यात संघाचा एक जुना कार्यकर्ता श्री. ह. वि. दात्ये यांना भेटण्यासाठी गेला असताना त्याने त्यांच्या टेबलावर एक कार्ड पडलेले पाहिले. त्या पत्रावरून लक्षात आले की, गोवर्धन पीठ, जगन्नाथपुरीचे शंकराचार्य - श्री भारती कृष्ण तीर्थ, आपल्यानंतर श्रीगुरुजी या पीठाचे शंकराचार्य व्हावेत असा विचार करत होते. त्यांनी म्हटले होते, ''माझ्यानंतर पुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य गुरुजी (मा. स. गोळवलकर)च होतील.'' पण गुरुजींनी त्यांना सांगितले, ''मी संघ-संस्थापक डॉ. हेडगेवारांना वचन दिले होते की, मी संघ कार्याची जबाबदारी निभावून नेईन. ते वचन मला आजन्म पाळले पाहिजे.'' यावर शंकराचार्य काय बोलणार?
(संकलित)
 
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे आश्वासन
संघ निर्माते पूजनीय डॉक्टरांच्या काळापासूनच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचा श्रीगुरुजींशी निकटचा संबंध होता. श्रीगुरुजी १९३९ मध्ये प्रचारक या नात्याने कलकत्त्यास गेले होते, त्यावेळी त्यांची डॉ. श्यामाप्रसादांशी भेट होत असे. डॉ. श्यामाप्रसाद खासदार होते, मंत्री होते, त्यामुळे अनेकदा श्रीगुरुजींच्या त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी होत असत.
 
डॉ. श्यामाप्रसादांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर निरंतर विचार विनिमय चालू होता. भारत हिंदू राष्ट्र आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात सर्वदूर प्रस्तुत करून तो प्रभावी कसा होईल यावर श्रीगुरुजींशी सविस्तर विचार विनिमय होऊन त्यांच्या सहमतीने डॉ. श्यामाप्रसादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली होती. पं. दीनदयाळ उपाध्याय आणि श्री. अटलजी इ. कार्यकर्ते सहका¬यांच्या नात्याने त्यांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
 
भारतीय जनसंघाच्या पार्श्वभूमीत, हिंदुत्वाची संघप्रणीत विचारधारा नि:संदिग्ध शब्दातून प्रकट केली जावी असा श्रीगुरुजींचा स्वाभाविक आग्रह रहात असे. जर कुठे संदिग्धता दृष्टीस पडली, तर ते डॉ. श्यामाप्रसादजींना तसे नि:संकोचपणे सांगत असत.
डॉ. मुखर्जी काही काळ हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. पुढे ते पं. नेहरूंच्या राष्ट्रीय सरकारात मंत्रीही होते. भारताची फाळणी झाली त्यावेळी पूर्व बंगालमधून आलेल्या निर्वासित हिंदूंवर झालेले अत्याचार, त्यांची कत्तल आणि यासंबंधी सरकारचे असलेले चुकीचे धोरण यामुळे नाराज होऊन त्यांनी मंत्रीपदाचा त्याग केला होता आणि त्यानंतरच भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात आली होती.
 
एकदा डॉ. मुखर्जींनी आपल्या भाषणात म्हटले की, जनसंघात मुसलमानांना प्रवेश दिला जातो, म्हणून जनसंघ हिंदू महासभेसारखा जातीयवादी (communal) नाही आहे. त्या काळी हिंदू महासभेत मुसलमानांना प्रवेश नव्हता. डॉ. मुखर्जींच्या बोलण्यातून हिंदूंचे कार्य जातीय आहे असे स्पष्टपणे सूचित होत होते. म्हणून श्रीगुरुजींनी जेव्हा त्यांची डॉ. मुखर्जींशी भेट झाली तेव्हा त्यांना असे म्हटले की, हिंदूंचे कार्य जातीय आहे अशी जर जनसंघाची वैचारिक पार्श्वभूमी म्हणून आपण मांडणी करत असाल, तर संघाच्या कार्यकर्त्यांना जनसंघात काम करणे शक्य होणार नाही. भारतात हिंदूंचे कार्य जातीय आहे, असे आपण का मानता? हिंदूंचे प्रत्येक कार्य राष्ट्रीय आहे असे आम्ही मानतो. स्वत:ला राष्ट्राचे अंग मानणा¬या प्रत्येक व्यक्तीस, मग ती कोणत्याही संप्रदायाची असो, संघात प्रवेश आहे. परंतु ज्या संस्थेत किंवा संघटनेत मुसलमान नाहीत, ती जातीय (communal) आहे, हा तर्क आम्ही स्वीकारू शकत नाही.
 
डॉ. मुखर्जींनी अनवधानाने झालेली आपली चूक मान्य केली आणि पुन्हा असे होणार नाही असे आश्वासन दिले.
- डॉ. आबाजी थत्ते
 
पंडित नेहरूंचे मार्मिक उत्तर
निर्वासितांना भारतात सुरक्षितपणे पोहोचवताना काही मुसलमान अतिरेक्यांशी संघर्ष करावा लागला. त्या संघर्षात काही मुसलमान मारले गेल्यामुळे पं. नेहरू व्यथित झाले होते. १९४७ च्या ऑक्टोबर महिन्यात श्रीगुरुजी काश्मीरचा प्रवास करून जेव्हा दिल्लीत परतले तेव्हा त्यांची पं. नेहरूंशी भेट झाली. काश्मीरचे दिवाण माजी उच्च न्यायाधीश श्री. मेहेरचंद महाजन यांनी काश्मीरच्या प्रवासाच्या संदर्भात पं. नेहरूंना सविस्तर माहिती दिली. काश्मीरच्या बाबतीत पं. नेहरूंनी फारसे काही म्हटले नाही पण संघासंबंधी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, बाकी सगळे तर ठीक आहे परंतु संघ एक 'ब्रूट फोर्स' आहे. श्रीगुरुजींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करताना म्हटले की, संघ तर राष्ट्रभक्तांची सेवाभावी संघटना आहे. त्याला 'ब्रूट फोर्स' नाही म्हणता येणार. पंडितजी म्हणाले, ''पंजाबात हजारो मुसलमान मारले गेले एवढेच नव्हे, तर या हत्याकांडातून लहान मुलेही वाचली नाहीत. याला 'ब्रूट फोर्स' नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?'' श्रीगुरुजी म्हणाले की, निर्वासित हिंदूंच्या केवळ संरक्षणाच्या हेतूने संघर्ष केला गेला होता. त्यात काही हत्या होणे हे अपरिहार्य होते. केवळ मुसलमानांनाच मारण्याच्या हेतूने स्वयंसेवकांनी हिंसक आक्रमण केले, असे एकही उदाहरण सापडणार नाही. जे मारले गेले ते मुसलमान होते म्हणून मारले गेले नसून, ते शत्रू होते म्हणून मारले गेले. जे निर्वासित रेल्वेने पाकिस्तानला जात होते त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तर संघ स्वयंसेवकांनीच स्वत:चे प्राण धोक्यात घालून केली होती.
 
पंडितजींनी सर्व ऐकून घेतले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही परंतु असे म्हटले की, तुम्ही काहीही म्हणा, आपला संघ एक 'ब्रूट फोर्स'च आहे. संघाविषयी ब्रूट फोर्सशिवाय अधिक काही विचार करण्यास तयार नसलेल्या पंडितजींचा बोलण्या-चालण्यातील व्यवहार अत्यंत आदबशीर असे. भेटीची वेळ ते कसोशीने पाळत असत आणि भेटीनंतर स्वत: मोटारीपर्यंत पोहोचवण्यासाठी जात असत. एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीस थोडा उशीर झाल्याने आपल्याला बंगल्यावर वेळेवर पोहोचणे शक्य नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी स्वत:च्या निजी सहायकास वेळेपूर्वी बंगल्यावर पाठवून निरोप दिला होता की, काही अपरिहार्य कामामुळे थोडासा उशीर होत आहे, जर आपल्याला थोडा वेळ थांबणे शक्य असल्यास, कृपया अवश्य थांबावे. उशीर झाल्याबद्दल पंडितजींनी क्षमाही मागितली होती.
 
बंगाल प्रांतात एका संघविरोधी सद्गृहस्थाने एक संघविरोधी तसेच श्रीगुरुजींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी पुस्तिका १९४९ मध्ये प्रसिध्द केली. लेखकाने ती पुस्तिका लोकसभेच्या सर्व सदस्यांना भेट म्हणून दिली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पं. नेहरू यांनाही ती पुस्तिका मिळाली होती. डॉ. श्यामाप्रसाद त्यावेळी केंद्रीय मंत्री होते. ते एकदा पं. नेहरूंना भेटण्यास गेले असता, पंडितजींच्या टेबलावर ती पुस्तिका पाहून त्यांनी पंडितजींना विचारले, ''आपण ही पुस्तिका वाचली का?'' पंडितजींचे उत्तर मोठे मार्मिक होते. त्यांनी म्हटले की, (It is trash) ती एक निरर्थक, त्याज्य पुस्तिका आहे. मी गोळवलकरांच्या विचारांचा अवश्य विरोधी आहे. परंतु त्यांचे चारित्र्य, त्यांचा आचार-विचार या विषयी मला नितांत आदर आहे.
- डॉ. आबाजी थत्ते
 
सरदार पटेलांचा आग्रह
तत्कालीन गृहमंत्री आणि स्वातंत्र्य लढयाचे प्रमुख सेनापती लोहपुरुष वल्लभभाई पटेलांसंबंधी श्रीगुरुजींना अधिक आत्मीयता वाटत असे. सरदार पटेलांच्या मनातही श्रीगुरुजींविषयी पूर्ण विश्वास होता. सरदारांचा श्रीगुरुजींना आग्रह होता की, संघाच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात यावे. ते म्हणत, ''आपण मिळून फार मोठे कार्य यशस्वीपणे पार पाडू. आपण आपले काम करत रहाल आणि आमचे हातही बळकट होतील.'' श्रीगुरुजींनी त्यांना म्हटले की, राजकारणात प्रवेश न करता जे जे राष्ट्रहिताचे असेल त्याला संघशक्ती सक्रीय पाठिंबा देईल. दुर्दैवाने सरदार पटेलांची जीवनयात्रा फार लवकर समाप्त झाली.
 
ऑगस्ट १९४७ नंतर सरदार पटेलांच्या श्रीगुरुजींशी अनेक भेटी झाल्या होत्या. उत्तर प्रदेशात त्या काळात मुसलमानांचे हिंसक दंगे सुरू झाले होते आणि त्यामुळे संघाच्या अनेक अधिका¬यांना तसेच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या संबंधी श्रीगुरुजींनी सरदार पटेलांना भेटून सांगितले की, असे दंगे घडवून आणण्यात आमचा काय लाभ होणार आहे? त्यामुळे आम्ही या हिंसक दंग्यांना सुरुवात केली हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. सरदार म्हणाले की, सरकारी रिपोर्ट तर असाच आरोप करत आहेत. श्रीगुरुजी त्यांना म्हणाले की, हे दंगे कोणत्या क्षेत्रात होत आहेत, कोणत्या ठिकाणी होत आहेत, याचे आपण निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की, पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानला जोडणा¬या कॉरिडॉरवर जी शहरे आहेत तेथेच हे दंगे होत आहेत. सरदार पटेलांना हे तथ्य पटले आणि संघाच्या पकडलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.
 
सरदार पटेलांच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर श्रीगुरुजींना फार मोठे दु:ख झाले. मुंबईत त्यांच्या अंत्ययात्रेत श्रीगुरुजी सामील झाले. त्यासाठी ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमवेतच विमानाने मुंबईस गेले होते.
- डॉ. आबाजी थत्ते
 
पं. नेहरूंची भेट
१९४७ मध्ये श्रीगुरुजींची पंतप्रधान पं. नेहरूंशी भेट झाली. सुमारे तासभर विचार-विनिमय झाला. संघाचे ध्येय स्पष्ट करताना श्रीगुरुजींनी म्हटले की, पाठीमागे प्रभावी संघटन नसल्यामुळे जगात आपले राष्ट्र निष्प्रभ ठरत आहे. यावर पं. नेहरू म्हणाले की, परंतु ती शक्ती पाशवी असू नये. पं. नेहरूंच्या म्हणण्याचा अर्थ, श्रीगुरुजींच्या लगेच लक्षात आला. ''संघाच्या शक्तीला पाशवी समजण्याची आपली धारणा भ्रांत आहे,'' असे सांगत असतानाच त्यांनी पंजाब आणि अन्यत्र झालेल्या दंग्यांचे विश्लेषण पं. नेहरूंसमोर ठेवले. त्यांनी म्हटले की, आज देशात उत्पन्न झालेल्या कटुतेचे कारण संघ कदापी नाही. या कटुतेचे मूळ फाळणीमुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीत आहे. अनेक गोष्टींवर गप्पोगोष्टी झाल्यानंतर निरोप घेतेवेळी श्रीगुरुजींनी पं. नेहरूंना विनंती केली की, सरकारकडून असे वातावरण निर्माण केले जावे की, ज्या योगे सरकारला सहकार्य करण्याच्या भावनेला निरंतर प्रोत्साहनच मिळेल.
(संकलित)
 
खरा नागरिक
बहुधा १९५० ची गोष्ट असावी. रायपूरमध्ये एका सार्वजनिक सभेत श्रीगुरुजींनी आपल्या भाषणात, तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंच्या ब्रिटन मधील प्रवासाप्रसंगी कोणी एका भारतीयाने त्यांना काळे झेंडे दाखवल्याच्या घटनेचा उल्लेख केला. श्रीगुरुजींनी त्या भारतीयाची निर्भत्सना केली आणि ब्रिटिश नेते स्व. श्री. चर्चिलच्या अमेरिका दौ¬याचा एक प्रसंग ऐकवला.
 
श्रीगुरुजींनी सांगितले की, श्री. चर्चिल त्यावेळी सरकारात नव्हते. पण विरोधी पक्षनेते होते. म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारवर टीका करण्यासाठी काही विशेष विषय, वार्ता आपल्याला मिळू शकतील या आशेने अमेरिकेच्या काही पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. यावर श्री. चर्चिल म्हणाले, ''आय ऍम द लीडर ऑफ अपोझिशन ऑफ द गव्हर्नमेंट इन माय कंट्री, बट द मोस्ट ओबिडिंयट ऍंड फेथफूल टू माय गव्हर्नमेंट ऍब्रोड.'' ('मी आपल्या देशात सरकारच्या विरोधी पक्षाचा नेता आहे, पण देशाबाहेर मी आपल्या देशाच्या सरकारचा आज्ञाधारक आणि निष्ठावंत प्रतिनिधी आहे.') पं. नेहरूंच्या राजकीय धोरणाला श्रीगुरुजींचा तात्त्विक विरोध होता पण परकीय भूमीवर त्यांना कोण्या भारतीयाने काळे झेंडे दाखवावे हे त्यांना पूर्ण नापसंत असल्याने त्यांनी त्या घटनेची नालस्ती केली आणि ख¬या राष्ट्रभक्ताची लक्षणे सांगितली. यामुळे त्यांच्या चतुरस्रव्यक्तित्त्वाच्या दुर्मिळ पैलूवर प्रकाश पडला. तो पैलू म्हणजे ते प्राधान्यत: खरे प्रामाणिक आणि अनुशासन मानणारे नागरिक होते.
- बी. बी. शाह
 
संघाचे रहस्य
श्रीगुरुजी, श्री. जगन्नाथराव भोसले यांच्याशी झालेल्या भेटीचा वृत्तान्त श्री. अप्पासाहेब चितळे यांना देत होते. श्री. भोसले, छात्र सेना (एन. सी. सी.) विभागाचे प्रभारी होते. श्री. भोसले यांनी श्रीगुरुजींना छात्रसेनेची सध्या काय स्थिती आहे याची माहिती दिली, खर्चाचा तपशील सांगितला आणि ते पुढे म्हणाले, ''एवढा खर्च करूनही, एवढया सवलती देऊनही विद्यार्थ्यांत अपेक्षित अनुशासनाचा अभावच दिसतो. काही विद्यार्थी निश्चित चांगले आहेत पण त्यांचा चांगुलपणा अन्य विद्यार्थ्यांच्या अनुशासनहीनतेमुळे झाकला जातो.'' ''असे का'', असे श्री. भोसले यांनी विचारल्यावर श्रीगुरुजी म्हणाले, ''भोसलेजी, मी आपल्याला आमचे ट्रेड सीक्रेट सांगतो. आणि ते पूर्णपणे उघडे आहे. जर आपणही तसा प्रयोग केला आणि त्यात आपल्याला यश मिळाले, तर आम्हास त्यात आनंद आहे. आम्ही फार काही करतो असे नाही. आमच्या संपर्कात येणा¬या प्रत्येक तरुणाच्या अंत:करणास मातृभूमीच्या भक्तीचा स्पर्श कसा होईल, असा आम्ही प्रयत्न करतो. आपल्या राष्ट्रजीवनाची सत्य आणि यथार्थ कल्पना त्याच्यासमोर स्पष्टपणे ठेवतो. जर त्या तरुणाला मातृभूमीच्या भक्तीचा स्पर्श झाला, राष्ट्रचिंतनाचे सत्य स्वरूप त्याच्या मनात जागृत झाले, समाजासंबंधी आत्मबोध जागा झाला, तर त्याचे जीवन आमूलाग्र बदलून जाईल. मातृभूमीची भक्ती तसेच सत्य राष्ट्रजीवनाचा शोधच आपल्याला यश देईल.''
श्रीगुरुजी क्षणभर थांबून मग म्हणाले, ''श्री. जगन्नाथराव हा प्रयोग कसा करतात ते आता बघू.''
- नाना ढोबळे
 
''सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता केवळ गोळवलकरांमध्येच''
जनसंघ आणि सोशालिस्ट जर एकत्र आले, तर त्यांची मिळून जी पार्टी होईल ती देशातील दुस¬या क्रमांकाची मोठी पार्टी (सेकंड लार्जेस्ट पार्टी ऑफ दि कंट्री) असेल अशा विचाराने चर्चा सुरू झाली. पण सर्वांपुढे प्रश्न पडला की, ही संयुक्त पार्टी चालवेल कोण? सर्वांना बरोबर घेऊन जायचे असेल, तर जिला पोलिटिकल अक्युमेन (राजकीय परिपक्वता) आहे आणि जिच्याजवळ सर्वांना सांभाळण्याचे संघटन कौशल्यही आहे, अशी व्यक्ती हवी. आपल्यामध्ये असे काम करू शकणारा कोणीही नाही, ही गोष्ट सर्वांना ठाऊक होती. नवीन संयुक्त दल बनवले पाहिजे, दोघांचे कार्यक्रम ऐक्याच्या आधारावर योजले पाहिजेत, सर्वांना एकत्र आणले पाहिजे असे सर्वांनाच वाटत होते. पण अशा प्रकारे विळया भोपळयाची जी मोट तयार होईल, ती बरोबर घेऊन चालणार कोण? हा प्रश्न होता. सर्वांच्या विचाराने असा निष्कर्ष निघाला की, हे काम आपल्यापैकी कोणी करू शकत नाही, केवळ गोळवलकरच हे काम करू शकतात. गोळवलकरांनी मानले तर ठीकच होईल पण ते मानतील का? अशी शंका सर्वांनाच आली. पं. द्वारकाप्रसाद मिश्रांनी नुकतीच काँग्रेस सोडली होती. ते म्हणाले, ''श्रीगुरुजींना पटविण्याचे काम माझे. माझे संघवाल्यांशी चांगले संबंध आहेत.''
 
पं. मिश्र आणि संघवाल्यांमध्ये मध्यस्थाचे काम करू शकणारे आपले एक-दोन प्रचारक होते. पं. मिश्रांनी त्यांना बोलावून सर्व काही सांगितले आणि म्हटले की, अवघड वाटणारे काम मी करून टाकले आहे. दोघांचे कार्यक्रम एकत्र करून दोघांनाही मान्य होईल असा आराखडा (फॉर्म्युला) मी तयार केला आहे. जी संयुक्त पार्टी बनेल ती देशातील क्रमांक दोनची सर्वात मोठी पार्टी बनेल. प्रश्न नेतृत्वाचा आहे. सोशालिस्टांनी म्हटले आहे की, आम्ही तर सांभाळू शकत नाही, गोळवलकरांनी सांभाळण्याचे ठरवले तरच काम होऊ शकेल. त्यांचा अन्य कोणावर विश्वास नाही. तेव्हा आपण या सा¬या गोष्टी गोळवलकरांना सांगा. त्यांना म्हणावं की, सोशालिस्ट पार्टीचे मवाळ प्रवृत्ती (सोबर एलिमेंट)चे कार्यकर्ते आपले नेतृत्व मानतील. काही सोशालिस्ट नेते येणार नाहीत. परंतु ते जरी आले नाहीत, तरीही हे नवे दल दोन नंबरची मोठी पार्टी बनेल.
 
प्रचारकांनी मिश्राजींना सांगितले की, असे होऊ शकणार नाही. कारण श्रीगुरुजी हे मानणार नाहीत. मिश्राजींना राग आला. ते म्हणाले की, तुम्ही अजून लहान आहात. तुम्हाला जनसंघासारखी नवी पार्टी कशी उभी करायची, कशी वाढवायची याची काही कल्पना नाही. जनसंघ एक छोटीशीच पार्टी राहील. अशा छोटया पार्टीचे प्रेसिडेंट बनणे ही काही विशेष महत्त्वाची गोष्ट नाही. जी पार्टी सुरुवातीलाच दोन नंबरची मोठी पार्टी असेल त्या पार्टीचा अध्यक्ष बनणे ही केवढी प्रतिष्ठेची गोष्ट आहे! कोणताही चांगला माणूस यास नकार देऊ शकत नाही. आता इथे मला काही सांगू नका. गोळवलकरांकडे जा आणि त्यांना हे सारे सांगा.
मध्यस्थी करणारे प्रचारक श्रीगुरुजींना भेटले. श्रीगुरुजींनी त्यांचे सारे बोलणे ऐकून घेतले आणि नंतर ते हसले आणि म्हणाले की, माझे उत्तर काय असेल हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांना सांगून टाका. पं. मिश्रांना सारे सांगण्यात आले. मिश्र नाराज झाले. श्रीगुरुजींविषयी त्यांनी म्हटले की, ते कर्तृत्ववान तर आहेत, पण हट्टी आहेत.
बाहेरही लोकांची श्रीगुरुजींविषयी केवढी उच्च धारणा होती हे या प्रसंगावरून दिसून येते.
- दत्तोपंत ठेंगडी
 
श्रीगुरूजींचे माझ्यावर फार प्रेम होते
- जॉर्ज फर्नांडिस
बाहेरील क्षेत्रातील लोकांनाही श्रीगुरुजींच्या बाबतीत असाच अनुभव येत असे. आपण श्री. जॉर्ज फर्नांडिसांचे नाव ऐकले असेल. जॉर्ज राजकारणात काय काय करत असतात, हे राजकारण खेळणा¬यांनाच ठाऊक. परंतु त्यांचा श्रीगुरुजींशी अतूट संबंध होता. श्रीगुरुजींच्या अखेरच्या आजारात, त्यांच्या तब्येतीसंबंधी चिंता करणारी जॉर्ज फर्नांडिसांची अनेक पत्रे आली होती. श्रीगुरुजींना इहलोक सोडूनही बरीच वर्षे झाली, पण जॉर्ज अजूनही म्हणतात की, मला सांगावेसे वाटते की, श्रीगुरुजींचे माझ्यावर फार प्रेम होते. जॉर्ज फर्नांडिसांनाही श्रीगुरुजी इतके जवळचे वाटत होते.
- दत्तोपंत ठेंगडी
 
राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णनांशी गप्पागोष्टी
श्रीगुरुजींचा डॉ. राधाकृष्णनांशी प्रथम संपर्क, डॉ. राधाकृष्णन बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर झाला होता. १९४६ मध्ये तेथील संघ शाखेच्या उत्सवास डॉ. राधाकृष्णन अध्यक्ष म्हणून आले होते, त्यावेळी श्रीगुरुजींचेही भाषण योजलेले होते. तेव्हापासून श्रीगुरुजींच्या डॉ. राधाकृष्णनांशी अनौपचारिक भेटी होत असत, गप्पागोष्टी चालत असत. पुढे डॉ. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले, राष्ट्रपती झाले. त्यांच्याशी श्रीगुरुजींचा विचार विनिमय होत असे. पण राजकारणासंबंधी मात्र विषय निघत नसे. जणु दोघांनीही राजकारणाविषयी न बोलण्याचे पथ्य पाळले होते.
 
एकदा श्रीगुरुजी डॉ. राधाकृष्णन यांना भेटण्यासाठी गेले. बोलता बोलता लक्षात आले की, डॉ. राधाकृष्णन एका डोळयाचे ऑपरेशन करण्यासाठी अमेरिकेला चालले आहेत. श्रीगुरुजी म्हणाले की, आमचे राष्ट्रपती जर ऑपरेशनसाठी परदेश पसंत करत असतील, तर भारतीय डॉक्टरांविषयी येथील सर्वसामान्य माणसाची धारणा विपरीत नाही का होणार? डॉ. राधाकृष्णन म्हणाले की, आपले म्हणणे खरे आहे. पण काय करणार? येथील विख्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या उपचाराने तसेच ऑपरेशनमुळे माझा एक डोळा गेला, आता दुस¬या डोळयाच्या बाबतीत धोका पत्करण्याची माझी इच्छा नाही. (I don't want to risk the other eye) यावर दोघेही मोकळेपणाने हसले.
- डॉ. आबाजी थत्ते
 
डॉ. राजेंद्र प्रसादजींशी संपर्क
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसादांना श्रीगुरुजींचा परिचय होता. परस्परात गप्पागोष्टीही होत असत. उत्तम भारतीय संस्कार, देशभक्ती तसेच त्यांची विद्वतापूर्ण बोलण्याची शैली यामुळे श्रीगुरुजींना डॉ. राजेंद्र प्रसादांविषयी खूप मोठा आदर वाटत असे.
 
राजेंद्रबाबू काँग्रेसचे अध्यक्ष असताना एकदा रेल्वेने प्रवास करत होते. त्याचवेळी श्रीगुरुजींचाही त्याच गाडीतून प्रवास होता. श्रीगुरुजींच्या डब्याला लागूनच राजेंद्रबाबूंचा डबा होता. आपल्या प्रवास व्यवस्थेला आणि पध्दतीला धरून प्रत्येक स्टेशनवर स्वयंसेवक आणि प्रतिष्ठित सद़्गृहस्थ श्रीगुरुजींना भेटण्यासाठी येत होते. हास्यविनोद, खाणेपिणे, चहापाणी इ. सर्व चालले होते. दिवसभराचा प्रवास होता. पण केवळ एका ठिकाणी दोन तीन व्यक्ती राजेंद्रबाबूंना भेटण्यासाठी आल्या होत्या. जेवणाचा डबा देऊन त्या निघून गेल्या होत्या. श्रीगुरुजींनी भेटण्यासाठी आलेल्या स्वयंसेवकांना विशेष सूचना देऊन राजेंद्रबाबूंना फळे, मिठाई इ. देण्याची व्यवस्था केली होती. नंतर श्रीगुरुजींनी स्वयंसेवकांशी बोलताना ह्यासंबंधी असे म्हटले की, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात हा फरक जाणवतो. राजकीय क्षेत्रात स्नेहपूर्ण आत्मीयता नाही. केवळ आपल्या कामाच्या दृष्टीने कोरडे संबंध राहतात. जर राजकीय क्षेत्रात स्नेहपूर्ण व्यवहार राहिला, तर त्याही क्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे काम होऊ शकेल.
- डॉ. आबाजी थत्ते
 
पं. रविशंकर शुक्ल यांच्याशी झालेला संवाद
पं. रविशंकर शुक्ल हे श्रीगुरुजींच्या काकांचे सहाध्यायी बंधू. श्री गुरुजींनी काका-पुतण्याचे नाते सौहार्दतेने कायम ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या पं. रविशंकर यांच्या समवेत अनौपचारिक गप्पागोष्टी होत असत.
 
अशाच एका भेटीत पंडितजींनी श्रीगुरुजींना वर्तमानपत्रात आलेली एक बातमी दाखविली. बातमी अशी होती की, जनसंघाचे अध्यक्ष पं. मौलीचंद्र शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना आपल्या राजीनाम्याच्या पत्रात असे लिहिले होते की, संघ डॉमिनेट (dominate) करतो म्हणून मी राजीनामा देत आहे. त्यावर पंडीतजींनी विचारले , खरचं संघ डॉमिनेट करतो? त्यावर गुरुजी म्हणाले, '' होय, संघ डॉमिनेट करतो. आम्हाला तर संपूर्ण जनजीवन डॉमिनेट करायचे आहे. आज जनसंघ, तर उद्या काँग्रेसची पाळी येईल. शेवटी एवढे मोठे संघटन काय केवळ टाळया वाजवायला चालवायचे आहे काय?''
- डॉ. आबाजी थत्ते
 
महात्मा गांधीजींची विनंती
महात्माजींशी फारसे भेटणे झाले नाही. १९४७ च्या सप्टेंबरमध्ये त्यांचा मुक्काम दिल्लीतील भंगी कॉलनीत होता. दिल्लीत त्यावेळी दंगली उसळल्या होत्या, हिंसाचाराचा आगडोंब उठला होता. स्वत: महात्माजींनी श्रीगुरुजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे श्रीगुरुजी त्यांना भेटण्यासाठी गेले. महात्माजींनी श्रीगुरुजींकडे आग्रह धरला की, दिल्लीतील दंगली थांबविण्याचे आवाहन करणारे एक वक्तव्य त्यांच्या कडून प्रकाशित केले जावे. महात्माजींची बोलण्याची जी शैली होती, त्या नुसार ह्या सांगण्याचा वास्तविक अर्थ असा होता की, लोकांची अशी समजूत व्हावी की, ज्या अर्थी ह्यांच्या वक्तव्यामुळे हिंसक दंगली बंद झाल्या त्या अर्थी ह्यांच्याच प्रेरणेने दंगलींना सुरुवात झाली. श्रीगुरुजींच्या हे लक्षात आले. त्यांनी महात्माजींना विनम्र शब्दात सांगितले की, आपण श्रेष्ठ नेते आहात, सगळे आपल्याला मानतात, त्यामुळे आपणच कृपया अशा प्रकारचे वक्तव्य प्रसिध्द करावे. त्या वक्तव्याला माझी मान्यता असल्याचे मी घोषित करीन. जर आपली इच्छा असेल, तर आपल्या वक्तव्यावर मी सही देखील करू शकेन. महात्माजींनी वक्तव्य प्रसिध्द केले नाही. वसंतराव ओकांच्या नेतृत्वाखाली संघाचे स्वयंसेवकच, भंगी कॉलनीतील महात्माजींच्या निवासस्थानाचे रक्षण करत होते.
- डॉ. आबाजी थत्ते
 
पंडित नेहरुंचे वक्तव्य
पंडित नेहरूंचे एक वैशिष्टय होते. ते कोणत्याही विषयासंबंधी आपल्या मताशी पक्के असत. ते अत्यंत आग्रहाने, कधी कधी दुराग्रहानेही आपल्या मताचे प्रतिपादन करत असत. दुस¬याने मांडलेला विचार तर्कसंगत असूनही तो मान्य न करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. त्यामुळेच ते श्रीगुरुजींच्या भेटीत तोच तो आरोप पुन्हा पुन्हा उगाळत असत. म्हणून श्रीगुरुजी त्यांना फारसे भेटले नाहीत.
 
एकदा पंडितजींनी आपल्या लखनौच्या भाषणात 'संघ फॅसिस्ट आहे' असे म्हटले होते आणि हे वृत्त वृत्तपत्रांनी प्रसिध्दही केले होते. दुस¬या दिवशी श्रीगुरुजींनी पंडितजींच्या भेटीत त्यांना विचारले की, आपण संघाला फॅसिस्ट म्हटल्याचे प्रसिध्द झाले आहे. संघामध्ये आपल्याला कोणत्या फॅसिस्ट प्रवृत्तीचा अनुभव मिळाला, ज्यामुळे आपण संघाला फॅसिस्ट म्हटले? पंडितजींनी म्हटले की, मी जे काही म्हटले त्याचा एवढा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता नाही. मी आपले असेच म्हटले होते.
 
या घटनेचा उल्लेख करून श्रीगुरुजींनी म्हटले होते की, नेतेमंडळी संघाविषयी काही शब्दप्रयोग शिवीसारखे वापरतात त्यातलाच हा फॅसिस्ट शब्द आहे.
- डॉ. आबाजी थत्ते
 
सरदार पटेलांचे विचार व कृती
सरदार पटेल दिसायला उग्र होते पण ते अत्यंत मनमोकळेपणाने गप्पागोष्टी करत. ते सर्व गोष्टी शांतपणे ऐकून, त्याचा नीट विचार करून आपला अभिप्राय देत असत. त्यांच्या हृदयात हिंदूंविषयी अतीव आत्मीयता होती, त्यांना हिंदू समाजाची चिंताही होती परंतु त्यांच्या जीवनात काँग्रेस निष्ठेलाही महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे पं. जवाहरलाल नेहरूंची असलेली मुस्लिम अनुनयाची प्रवृत्ती आणि त्यानुसार होणारे त्यांचे व्यवहार, यामुळे सरदार प्रक्षुब्ध होत असत. परंतु या दृष्टीने काँग्रेसमध्ये योग्य तो बदल घडवून आणण्याच्या हेतूने हिंदुत्वनिष्ठ लोकांना काँग्रेसशी कशा प्रकारे जोडता येईल, याचाही ते विचार करत असत. याच मानसिकतेमुळे मेरठच्या काँग्रेस अधिवेशनात, संघाच्या स्वयंसेवकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास झाला होता. पं. नेहरू त्या काळात परदेशात प्रवास करत असल्याने मेरठच्या अधिवेशनास उपस्थित नव्हते. पंडितजींनी परत आल्यावर घटनात्मक कारणांचा आधार घेऊन तो ठराव रद्द करवून घेतला होता.
- डॉ. आबाजी थत्ते
 
श्रीगुरुजींचे गुरु-बंधू श्री अमिताभ महाराजांच्या आठवणी
(श्रध्देय श्री अमिताभ महाराज, श्रीगुरुजींचे अभिन्नहृदय ज्येष्ठ गुरुबंधू होते. परमश्रध्देय श्री अखंडानंदांच्या अनुग्रहाने श्रीगुरुजींनी आध्यात्मिक जीवनाची दीक्षा प्राप्त केली. त्या दीक्षा-प्राप्तीचे तसेच श्रीगुरुजींचे जीवनकार्य हे, पू. डॉक्टरांनी निर्माण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य होईल या परमश्रध्देय श्री अखंडानंदांनी दिलेल्या संकेताचे हे वृत्त आहे. श्रध्देय श्री अमिताभ महाराजांकडून मिळालेल्या आठवणींच्या आधारे हे प्रस्तुत केले आहे. - संकलनकर्ता)
 
१९३६ मधील ही गोष्ट आहे. नागपूरमध्ये रामकृष्ण आश्रमात श्री श्री ठाकूर (भगवान रामकृष्ण) यांचा जन्मोत्सव झाला. श्री. माधवराव नियमितपणे येत असत. आध्यात्मिक जीवनाचे अंतिम लक्ष्य, आत्मोन्नतीच्या अंतिम अवस्थेच्या विषयात, श्री. माधवरावांची उत्कंठा वाढत होती. नागपूरमधील रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रध्देय श्री भास्करेश्वरानंदांसमवेत श्रीगुरुजींचा अनेकदा संवादही झाला. त्यांनी श्री माधवरावांना या संबंधी अमिताभ महाराजांना भेटण्यास सांगितले. फेब्रुवारी महिन्यात एक दिवस दुपारी श्रीगुरुजी श्री अमिताभ महाराजांच्या झोपडीत आले. श्री अमिताभ महाराज हिशोबाचे काम करत होते. श्री गुरुजी त्यांना म्हणू लागले, ''महाराज, (नागपूरच्या रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष) स्वामी भास्करेश्वरानंदांनी मला आपल्याकडे पाठवले आहे. मी त्यांना विचारले होते की, आपण मला जो महापुरुष समाधी अवस्थेत नित्य रममाण असतो, तसेच जो आध्यात्मिक स्तरावर जीवन्मुक्त झाला आहे, अशा महापुरुषाकडे पाठवू शकाल का? तेव्हा त्यांनी मला आपल्याला भेटण्यास सांगितले.'' श्री अमिताभ महाराज म्हणाले, ''अरे मधु (श्रीगुरुजींना त्यांचे जवळचे आप्त मधु या नावाने हाक मारत असत.) यासाठी तुम्हाला सर्व काही सोडावे लागेल. कीर्ती, प्रतिष्ठा, घर-दार सर्व काही. याची तयारी आहे का?'' श्रीगुरुजींनी तत्काळ स्पष्टपणे उत्तर दिले, ''होय, मी सारे काही सोडण्यास तयार आहे.''
 
विचार-विनिमय झाला. परमश्रध्देय श्री अखंडानंद महाराजांकडून मार्गदर्शन तसेच त्यांच्याकडून दीक्षा-प्राप्तीच्या विषयासंबंधी बोलणे झाले. श्री अमिताभ महाराज म्हणाले की, मी सारगाछीला पत्र पाठवतो. बाबां (परमश्रध्देय श्री अखंडानंद)चे उत्तर आल्यानंतर तुम्हाला कळवीन. पण ही गोष्ट कोणाशी बोलायची नाही. श्री अमिताभ महाराजांनी श्री बाबांना सारगाछीला पत्र लिहून त्यांची अनुमती मागितली. आठ दिवसांनी बाबांची अनुमती मिळाली. आणि श्रीगुरुजींचे सारगाछीला जाणे निश्चित झाले.
 
१९३६ मध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला परमश्रध्देय श्री बाबांनी अमिताभ महाराजांना सारगाछीस बोलावून घेतले. सारगाछीस श्रीगुरुजींची भेट झाली. नागपूरहून निघतानाची श्रीगुरुजींची स्थिती आणि सारगाछी आश्रमातील श्रीगुरुजींची स्थिती यात खूपच फरक असल्याचे श्री अमिताभ महाराजांना जाणवले. सारगाछी आश्रमात श्री अमिताभ महाराजांना श्रीगुरुजी कसे दिसले? महासागराप्रमाणे शांत तसेच अतिशय नम्र, विनयशील व मधुर व्यवहार! त्याचवेळी श्री अमिताभ महाराजांना वाटले की, 'मधु'ची तपश्चर्या सफल होत आहे. मधुशी बोलताना श्री अमिताभ महाराजांच्या लक्षात आले की, सारगाछी आश्रमाच्या कठोर जीवनामुळे मधुच्या शरीरावर आणि मनावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही आणि मधु अत्यंत प्रसन्न आहे. श्रीगुरुजी श्री अमिताभ महाराजांना म्हणू लागले की, जर असाच जीवनक्रम असेल, तर संपूर्ण जीवनभर मी येथे राहू शकतो. अमिताभ महाराजांनी उत्तर दिले की, इतक्यात नाही.
 
१९३६ मधील डिसेंबरच्या मध्यात श्री अमिताभ महाराज नित्यक्रमाप्रमाणे एक दिवस श्रीमत् बाबांची सेवा करण्यासाठी 'विनोद कुटी'त निघाले होते. जाताना त्यांनी पाहिले की, श्रीगुरुजी स्वामी सर्वानंदांनी लिहिलेले 'कठोपनिषद' वाचत आहेत. श्रीमहाराजांनी श्रीगुरुजींना विचारले की, येथे तुमची रात्र कशी जाते? झोप लागते का? श्रीगुरुजींनी उत्तर दिले, ''श्रीमत् बाबांचा आदेश आहे की झोप कमी घेऊन साधना करणे चांगले.'' श्री अमिताभ महाराज खूप प्रसन्न झाले आणि बाबांच्या खोलीत जाऊन त्यांची सेवा करू लागले. श्रीबाबांचे पाय चेपत असताना श्री महाराजांनी श्री बाबांना विचारले की, मधु आपली सेवा कशी करतो? श्री बाबा म्हणाले, ''मधुचा भक्तीभाव, त्याचे कर्म करण्याचे कौशल्य व श्रध्दा अपूर्व आहे.'' नंतर ते विचारू लागले की, गोळवलकर काय करतोय? ''आपल्या खोलीत कठोपनिषद वाचतोय.'' अमिताभ महाराज म्हणाले. श्रीबाबांनी आदेश दिला, ''आता तो काय करतोय हे पहा आणि त्याला येथे बोलावून आणा.'' श्री अमिताभ महाराज बाहेर आले आणि परत श्रीबाबांकडे जाऊन त्यांना सांगू लागले की, मधु ध्यान करतोय. श्री बाबांनी त्याला बोलावून आणण्यास सांगितले.
 
श्रीगुरुजींना बोलावले गेले. ते आले आणि प्रणाम करून बाबांच्या जवळ जाऊन उभे राहिले. श्रीबाबांनी विचारले, ''गोळवलकर, तुम्ही कसे आहात?'' ''बाबा, मी चांगला आहे'' श्रीगुरुजींनी उत्तर दिले. मग श्रीमत् स्वामींच्या वाणीतून शब्द बाहेर पडले - ''सेवा करणे मोठी अवघड गोष्ट आहे. सेवा करताना आपण कधी असा विचार करता कामा नये की, आपण कोणा विशेष व्यक्तीची सेवा करत आहोत. तुमचे सर्व कर्म ईश्वराला समर्पित झाले पाहिजे.''
 
मकर संक्रांतीच्या आधी चार दिवस अमिताभ महाराजांनी श्रीमत् बाबांना मधुच्या दीक्षेसंबंधी विचारले. श्री बाबांनी उत्तर दिले की, लवकर मुहूर्ताचा योग येईल आणि मी दीक्षा देईन. १२ जानेवारी १९३७ रोजी संध्याकाळी श्रीमत् स्वामीजी श्री अमिताभ महाराजांना म्हणू लागले की, उद्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गोळवलकरला दीक्षा दिली जावी अशी ठाकुरांची इच्छा आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे श्री अमिताभ महाराज ठाकुरांची पूजा करत होते. त्यावेळी मधु तेथे प्रसन्न मुद्रेने पोहोचला. मधुला अमिताभ महाराजांजवळ त्यांना प्रणाम करावयाचा होता. श्री अमिताभ महाराजांना समजले की, मधुची दीक्षा झालेली आहे. पण ठाकुरांच्या समोर आपण प्रणाम कसा स्वीकारायचा म्हणून त्यांनी मधुला प्रणाम करू दिला नाही. श्री महाराज जेव्हा श्रीमत् स्वामी अखंडानंदांकडे, ठाकुरांचा प्रसाद देण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितले की, ठाकुरजींच्या आदेशाने मधुची दीक्षा झाली. परंतु त्याला आश्रमात ठेवायचे नाही. त्याचे कार्य आश्रमाबाहेर आहे. त्यांच्या वृत्तीचा कल समाधीकडे आहे. तो आश्रमात राहील, तर समाधीकडेच जाईल. जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा त्याला योग्य सल्ला देत रहायचे.
 
दीक्षा झाल्यानंतर एकदा श्री अमिताभ महाराजांनी श्रीमत् बाबांना विचारले की, माधवरावांची हिमालयात जाण्याची प्रबळ इच्छा आहे. परंतु त्यांना नागपूरला जाऊन आईवडिलांकडे पोहोचवावे लागेल. पुढे काय करणे योग्य ठरेल? श्रीमत् बाबा म्हणाले की, हा डॉ. हेडगेवारांबरोबर काम करेल असे वाटते. विशुध्द भावनेने समाज सेवेत, जनता-जनार्दनाच्या सेवेत अखंड रत, असे ह्याचे कर्ममय जीवन होईल. जर कधी हिमालयात जाण्याची त्याची इच्छा प्रबळ झाली, तर त्या वेळेस त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. बद्रिकाश्रम इ. ठिकाणी जाऊन इच्छा असेल, तर हिमालयाचे दर्शन घेण्यास हरकत नाही. पण त्याला एकान्तवासात राहण्यापासून परावृत्त करावे लागेल. तुम्हालाच हे काम करावे लागेल.
 
श्रीमत् बाबा महासमाधिस्थ झाल्यानंतर तेरा दिवस बेलूर मठातच चर्चा तसेच भविष्यकालीन योजनांसंबंधी विचारविनिमय करण्यातच गेले. श्री अमिताभ महाराज श्री गुरुजींना घेऊन, श्रीरामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी अभेदानंद, स्वामी विवेकानंदांचे मधले भाऊ श्री. उपेंद्रनाथ दत्त तसेच श्रीरामकृष्ण देवांच्या काळातील परिचितांचे दर्शन घेण्यासाठी गेले. स्वामी अभेदानंद श्रीगुरुजींना पाहून खूपच प्रसन्न झाले आणि आपल्या एका चित्रावर स्वाक्षरी करून ते त्यांना देताना म्हणाले की, प्रकृती चांगली राहिली, तर एकदा अवश्य नागपूरला येऊन जाईन. त्यांनी श्रीगुरुजींसंबंधी आपले मत प्रकट करताना असे म्हटले की, त्यागी माणसासारखा तुमचा जीवन व्यवहार राहील. श्रीगुरुजींच्या बालपणीच्या एका सहाध्यायीने जे सारगाछी आश्रमात रहात होते, बेलूरच्या मठात राहण्याचा निश्चय केला. श्रीगुरुजींनीही असेच आपले मनोगत व्यक्त केले. तेव्हा श्री अमिताभ महाराजांनी त्यांना बाजूला घेऊन सांगितले की, तुम्हाला रामकृष्ण आश्रमात रहायचे नाही. श्रीगुरुजींनी आश्चर्यचकित होऊन म्हटले की, आपण सत्य बोलता आहात. आपल्याला कसे माहीत झाले? श्री अमिताभ महाराजांनी श्रीमत् स्वामी अखंडानंदांशी झालेला संवाद सांगून टाकला. श्री गुरुजी म्हणाले की, मलाही गुरुदेवांनी हाच आदेश दिला आणि हेही सांगितले की जेव्हा एखादी अडचण येईल तेव्हा तुमच्याशी सल्ला मसलत कर, आता माझ्या बाबतीत आपली काय योजना आहे? श्री अमिताभ महाराज म्हणाले की, मी तुम्हाला जेथून घेऊन आलो तेथे जाऊन त्यांच्याकडे सोपवणार. श्री अमिताभ महाराज श्रीगुरुजींना घेऊन नागपूरला परतले. श्री महाराजांनी श्रीगुरुजींना नागपूरच्या रामकृष्ण आश्रमात महिनाभर ठेवून घेतले. त्यांच्याकडून विवेकानंदांच्या शिकागो व्याख्यानाचा मराठी अनुवाद करवून घेतला. जणु काही परम श्रध्देय श्री बाबांकडून मिळालेल्या दीक्षेची ही गुरुदक्षिणा होती. त्यानंतर श्री अमिताभ महाराजांनी श्रीगुरुजींच्या मामांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की, ह्यांना डॉक्टर हेडगेवारांकडे पोहोचवून द्या. आणि अशा तर्‍हेने डॉक्टर हेडगेवारांना भावी सरसंघचालकाची उपलब्धी झाली.
 
१२ ऑगस्ट १९६२ रोजी गुरुजींची आई मातोश्री ताईंचे देहावसान झाले. श्रीगुरुजींचे हृदय प्रखर विरक्तीने ओतप्रोत भरून गेले आणि हिमालयाच्या पवित्र परिसरात जाऊन तेथे एकान्तवासात राहण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. श्री अमिताभ महाराजांना श्री बाबांनी सारगाछीत जे सांगितले होते त्याची आठवण झाली. त्यांनी श्रीगुरुजींना त्यांच्या इच्छेपासून परावृत्त करताना म्हटले की, अजून संघाचे काम पूर्ण झालेले नाही. आपले कार्य करण्यासाठी त्या कार्यालयात जी आपली छोटी खोली आहे तेथेच गेले पाहिजे. हिमालयात जाण्यापेक्षा साधनेसाठी उर्वरित जीवनापर्यंत तीच खोली चांगली आहे. मी देखील कार्यालयातच आहे. तेव्हा आपणही तेथेच जा. श्रीगुरुजींनी ते मानले.
 
कांचीचे श्रध्देय श्री शंकराचार्यांनी श्रीगुरुजींना लिहिलेल्या पत्राचाही श्रीगुरुजींवर प्रभाव पडला. श्रध्देय श्री शंकराचार्यांनी लिहिले होते की, आपल्या अस्थिचर्ममय मातेचा देहान्त तर झालेला आहे परंतु आपल्या सारख्या कोटयवधी पुत्रांची, आजच नाही, तर अनादि काळापासून आणि अनंत काळापर्यंत जन्मदायी परम मंगलमयी भारतमाता आहे. आपण सर्वस्व समर्पण करून निरपेक्ष भावनेने भारत मातेची सेवा करत आहात. म्हणून आपल्याला मातृवियोग होऊच शकत नाही. श्री गुरुजींनी हिमालयात जाण्याचा विचार स्थगित केला.
 
भ्रष्टाचार संपविण्याचा प्रश्न
१९६५ मध्ये भारत - पाक युध्दाची चिन्हे दिसत होती. एकदा मुंबईहून दिल्लीला विमानाने जाताना मी आणि श्रीगुरुजी बरोबर प्रवास करत होतो. तत्कालीन पंतप्रधान श्री. लाल बहाद्दुर शास्त्रींच्या निमंत्रणानुसार आम्ही दिल्लीस चाललो होतो.
संभाषणाच्या ओघात मी श्रीगुरुजींना म्हणालो की, श्री गुरुजी आपल्यात जो मतभेद आहे तो रहायला नको. आपले आणि आमचे असे दोन्ही प्रकारचे स्वयंसेवक सरकारी यंत्रणेत आहेत. आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपविण्याचा प्रयत्न का करू नये?
 
श्रीगुरुजींना माझे सांगणे पटले होते. परंतु त्यांनी म्हटले की ह्यासाठी ज्या सामर्थ्याची आवश्यकता आहे ते प्रथम निर्माण करावे लागेल अन्यथा यश मिळणे अवघड.
हा संवाद पुढे तसाच राहिला, कारण श्रीगुरुजींनी देह ठेवला होता.
- एस. एम. जोशी
 
टंडनजी आणि गुरुजी
१९४६ मध्ये श्री रज्जूभैय्या अलाहाबाद येथे २५ पन्नालाल मार्ग, या ठिकाणी राहत होते. श्रीगुरुजींचा तेथे मुक्काम होता. सकाळी न्याहारीनंतर श्रीगुरुजींनी विचारले, ''रज्जूभैया, आज श्री टंडनजी तर येथे आहेत. त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे का? ते येतील का याची विचारपूस करा.'' रज्जूभैय्या म्हणाले, ''निमंत्रण तर दिलेले नाही, पण मी जाईन. ते असतील, तर अवश्य येतील. आपल्यावर ते प्रसन्न आहेत.''
 
रज्जूभैया राजर्षींच्या घरी गेले. आमचे भोजन झाल्यावर ते परतले आणि सांगितले की, आज मंगळवार असल्याने टंडनजींचे मौन व्रत आहे. ते बोलू शकणार नाहीत, त्यामुळे येणार नाहीत. श्रीगुरुजी म्हणाले की, अरे बोलायचे तर मलाच आहे ना! ते येऊन नुसते बसले तरी चालेल. जर सगळी मोठी माणसे मौन पाळणार असतील, तर चला मी देखील मौन सुरू करतो. आणि माझ्याकडे पहात ते म्हणाले, ''जा स्वयंसेवकांना सांगा की आज माझे मौन आहे. कार्यक्रम कॅन्सल.'' सर्व जण हसले. श्रीगुरुजी पुढे म्हणाले ''रज्जूभैया, जाऊन त्यांना सांगा की, बाबूजी, भगवंताने आपल्याला हे सुंदर शरीर, विद्वत्ता, प्रतिष्ठा, सन्मान प्रदान केलेला आहे, तो उपयोग करण्यासाठी. त्यावर बंदी घालणारे आपण कोण? भगवंताच्या दरबारात आपण अपराधी ठरू.'' श्रीगुरुजींनी आपल्या जीवनात हेच केले. त्यांनी जीवनभर भगवंतांनी प्रदान केलेल्या सर्व गोष्टींचा योग्य उपयोग केला.
- लक्ष्मण श्रीकृष्ण भिडे