हिंदू जीवनाचे लक्ष्य
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
अशा प्रकारे हिंदू शब्दाची व्याख्या करता येत नसली तरी हिंदू म्हणून आपण येथे उभे आहोत. हिंदू समाज हे एक जिवंत सत्य आहे. रक्ताच्या बिंदूबिंदूतून हे सत्य आपल्याला जाणवते, अनुभवास येते. आपल्याला त्याची व्याख्या करता येत नसली तरी एक वेगळया स्वरूपाचा समाज म्हणून हिंदू समाजाची जी वैशिष्टये आहेत ती आपणास समजून घेता येतील. आपण ती समजून घेतली पाहिजेत. आपल्याला असे म्हणता येणार नाही की अमुक एक व्यक्ती केवळ ख्रिश्चन वा मुसलमान नाही म्हणून ती हिंदूच असली पाहिजे. आपल्या देशातील राजकीय पुढारी अनेकदा हिंदूंचा उल्लेख 'बिगरमुस्लीम' असा करीत असतात. आपले वास्तविक स्वरूप कोणते आहे हे समजून घेण्याची ही निर्दोष व विधायक दृष्टी नव्हे. हिंदू हा काही अकरणात्मक प्राणी नाही, तर मग त्या शब्दामागील भावात्मक आशय कोणता आहे ?
 
हिंदूंच्या दृष्टीने जीवनाचे काही विशिष्ट लक्ष्य आहे. सत्ता, अधिकारपद वा नावलौकिक आदी गोष्टींत मोठेपणा प्राप्त करणे हे ते लक्ष्य नाही. मानवाला सर्वश्रेष्ठ आणि शाश्वत सुखाची प्राप्ती करून देणारे त्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच त्याच्या अंत:करणातील तेजस्वी ईश्वरी अंशाचे ज्ञान प्राप्त करून घेणे हाच त्याचा एकमेव जीवनहेतू असतो. परंतु माणसाची आयुर्मर्यादा फार थोडी असते. एवढया अल्प कालमर्यादेत तो त्या सर्वश्रेष्ठ अवस्थेप्रत कसा पोचू शकणार ? संपूर्ण आयुष्यभर ज्या आपल्या शरीराचा तो उपयोग करीत असतो त्याचेही परिपूर्ण ज्ञान त्याला असत नाही. मग शरीरस्थित त्या अविनाशी तत्त्वाचे ज्ञान त्याला कसे होणार ? कार्यकारणभावाच्या नियमानुसार आपल्या प्रत्येक कृतीचा (हेच कारण) काही ना काही निश्चित परिणाम (कार्य) होतच असतो. कार्यकरणाचे हे चक्र वाढले पाहिजे, विकसित झाले पाहिजे आणि शेवटी कोठे ना कोठे त्याची परिणती झाली पाहिजे. म्हणजेच माणसाच्या वास्तविक जीवनाची कथा केवळ या जन्मातील त्याच्या अस्तित्वाबरोबर संपत नाही. माणसाची स्पष्ट व स्वाभाविक ओढ विस्तार पावण्याची व आपली दैवी प्रकृती प्रकट करण्याची असते. म्हणून स्वत:च्या दैवी आत्मस्वरूपासंबंधी अल्पसे अज्ञान शिल्लक असेपर्यंत तो पुन्हा:पुन्हा जन्म घेईल आणि त्याने प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर प्रत्येक जन्मात त्याला अधिकाधिक प्रगती करता येईल.
 
परमात्म्याशी असलेल्या आपल्या एकत्वाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने पुनर्जन्माचा सिध्दांत हे मानवी आत्म्याचे फार मोठे आशास्थान आहे. केवळ या आयुष्याबरोबरच सारे काही संपले असे नाही. अनंत काळ आपल्यापुढे उभा आहे, एकामागून एक येणाऱ्या जीवनामध्ये पुन:पुन्हा परिश्रम करून आपण आपले लक्ष्य गाठू शकू या अमर आशेचा प्रकाश सर्वत्र पसरविणारा हा दीपस्तंभ केवळ हिंदुत्वामध्येच आहे. विश्वातील अफाट मानवसमुदायामध्ये आशेची आणि आत्मविश्वासाची ही ज्योत उंच हाती धरून केवळ हिंदू समाजच उभा आहे. आपल्या सर्व पवित्र धर्मग्रंथांमध्ये, प्राचीन आणि अर्वाचीन सर्व पंथांमध्ये हे मूलभूत तत्व समाविष्ट आहे, तर मग आपल्या आयुष्यातच आपल्या या सत्य स्वरूपाचे ज्ञान व्हावे, उत्क्रांतीच्या फेऱ्यात सापडून आपण अज्ञानाच्या खाईत फरफटत जाऊ नये यासाठी आपला व्यवहार कसा असावा ? शाास्त्र असे सांगते की, मनात कोणताही वाईट हेतू नसताना माणसाच्या हातून एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याचा तो दोष कमी स्वरूपाचा समजला जातो. कधी कधी तर तो आपल्या त्या पापातून पूर्ण मुक्त झाला असेही समजतात. म्हणून आपण आपली कर्मे मनात कोणत्याही प्रकारचा स्वार्थी हेतू न ठेवता केवळ कर्तव्यबुध्दीने केली म्हणजेच आपल्या कर्मातील आसक्ती आपण काढून घेतली, त्या मागील स्वत:च्या सुखोपभोगाचा हेतू काढून घेतला तर ती विविध कर्मे व त्यांची फळे आपणास चिकटत नाहीत. मग बाह्य जगाच्या परिणामापासून व धक्क्यांपासुन मुक्त राहून आपल्याला आपले मन आपल्या सत्य - स्वरूपावर केंद्रित करता येईल. म्हणूनच आपले तत्वज्ञान असे सांगते की, कर्म करीत राहा, नि:स्वार्थ बुध्दीने कर्तव्य करीत राहा.
 
आता आपल्याला जे कार्य करावयाचे आहे त्याचे स्वरूप कोणते ? आपल्या कर्तव्याचे स्वरूप कोणते ? आपण कोठून सुरूवात करावी ? आपले जीवन कसे व्यतीत करावे म्हणजे त्या परम सत्याप्रत आपल्याला पोचता येईल ? सत्य म्हणून काही आहे आणि काळाच्या ओघात त्याचा आपल्याला आपोआप साक्षात्कार होईल असा नुसता उद्षोष वा जप करीत स्वस्थ बसून भागेल काय ? नाही. या वस्तुमय जगात या सत्याचा वस्तुमय, मूर्त स्वरूपात, जिवंत स्वरूपाचा आविष्कार दिसला पाहिजे. आपल्या येथील तत्वज्ञ पुरूषांनी असे सांगितले आहे, की मनुष्य हा त्या सत्याचाच इंद्रियगम्य आविष्कार आहे, म्हणून त्याची पूजा करा. त्याची सेवा करा. त्यांनी म्हटले आहे, ''प्रत्येक मुनष्य हा आमच्याप्रमाणेच त्या सत्याचा तेजस्वी अंश आहे. अधिकाधिक व्यक्तींच्या सुखदु:खाशी समरस होण्याचा प्रयत्न करून आपण आपल्या व्यक्तित्वाचा विकास करूया आणि अंततोगत्वा सर्व विश्वाला व्यापाून टाकणाऱ्या या महान सत्याचा साक्षात्कार करूया.''
 
उत्क्रांतीपथावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपापल्या अवस्थेनुसार मानवाची सेवा करता येईल अशी व्यवस्था कोणती?
मनुष्य कधी एकाकी राहात नाही. त्याला एकांतवास नको असतो. त्याची प्रकृती समुदाय करून राहण्याचीच आहे. म्हणून माणसे एकत्र येतात आणि समाजरूपाने एकत्र नांदतात. या मार्गानेच माणसाला आपले जीवन नीटपणे व्यतीत करता येते. स्वत:चा विकास करता येतो आणि स्वत:मध्ये जे सर्वोत्तम असेल त्याचा आविष्कार करता येतो. अशा प्रकारे सामाजिक जीवनात एक एक पायरी चढत त्याला आपल्या जीवनाच्या अंतिम उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करता येते. तात्पर्य, या प्रत्येक व्यक्तीला समाजाशी अधिकाधिक एकरूप होण्याची पूर्ण संधी मिळेल आणि आपल्या सर्वशक्तीनिशी समाजाची सेवा करता येईल अशी समाजव्यवस्था उभी करून ती सुस्थिर करणे हाच प्रत्येक व्यक्तीला अंतिम सत्याच्या साक्षात्काराची संधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग आहे. म्हणूनच आपण म्हणतो की, कोणत्याही प्रकारची स्वार्थी महत्त्वाकांक्षा किंवा आसक्ती न बाळगता आपण समाजाची सेवा केली पाहिजे. मानवाची सेवा ही ईश्वराचीच सेवा आहे. आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा हा एक वैशिष्टयपूर्ण पैलू आहे.