आध्यात्मिकता व ऋषिजीवन
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
धर्माचार्यांच्या भांडणांमुळे अतीव दु:ख
1968 मधील सप्टेंबर महिन्यातील गोष्ट! श्रीगुरुजींच्या बद्री केदारच्या यात्रेचा कार्यक्रम योजलेला होता. हरिद्वारमध्ये निरनिराळया आश्रमांच्या धर्माचार्यांकडून श्रीगुरुजींच्या अभिनंदनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर हरिद्वारहून ऋषिकेशला जाताना त्यांच्यासोबत प्रवास करण्याचे सद़्भाग्य मला लाभले. विश्व हिंदू परिषदेचे माधवराव देशमुखही बरोबर होते. त्यांनी चर्चा सुरू केली की, ज्योतिर्मठा (जोशीमठ)च्या शंकराचार्य पदासाठी भांडण चालू आहे. त्या पदावर पूर्वी जे शंकराचार्य होते त्यांच्या देहावसानानंतर शांतानंदांनीच जोशी मठाची गादी सांभाळली; परंतु काही विद्वान धर्माचार्यांनी शांतानंदांना शंकराचार्यांच्या प्रतिष्ठित पदासाठी अयोग्य मानून श्री स्वरूपानंदांची निवड केली होती. भांडण इतके वाढले की, दोन्ही पक्ष न्यायालयात गेले. हे ऐकून श्रीगुरुजी व्यथित झाले. त्यांनी आपले स्वत:चे उदाहरण देऊन म्हटले ''संघाच्या संस्थापकांनी निर्देश केल्याप्रमाणे त्यांच्या निधनानंतर माझ्यावर सरसंघचालकपदाचे दायित्व सोपवण्यात आले. माझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ, योग्य आणि अनुभवी कार्यकर्ते त्यावेळी होते. त्यांनी संघाच्या सुरुवातीच्या काळातच संघकार्यासाठी मोठा त्याग, परिश्रम केले होते. परंतु तरीदेखील सर्वांनी डॉक्टरांच्या निर्देशाचे पालन केले. कोणीही थोडासादेखील विरोध केला नाही. याच कारणामुळे माझ्यासारख्या अननुभवी व अयोग्य व्यक्तीद्वारेही हे महान कार्य व्यवस्थित चालू आहे.'' धर्माचार्यांच्या भांडणामुळे त्यांना जे अतीव दु:ख झाले, ते या उदाहरणावरून ध्यानात येतेच पण त्याबरोबरच त्यांचा निरहंकारीपणाही या घटनेवरून दिसतो.
- डॉ. नित्यानंद
 
आत्मनिवेदन भक्तीचा श्रेष्ठ आदर्श - बळी राजा
श्रध्देय श्री गुलाबराव महाराजांनी भक्तीचे सोळा भेद प्रतिपादित केले आहेत. त्यांनी आपल्या शोध प्रबंधात (पीएच. डी.साठी) चर्चा करताना म्हटले आहे की, आत्मनिवेदनरूपी मध्यमा भक्ती, तसेच त्या भक्तीच्या आदर्श उदाहरणाच्या बाबतीत माझे विचार सुस्पष्ट नव्हते. आत्मनिवेदनात ममता आणि अहंकाराचे समर्पण करावे लागते तसेच बळी राजाने तसे समर्पण करून आदर्श भक्ताचे उदाहरण समोर ठेवले होते.
 
हे जरी मी विस्ताराने लिहिले, तरी त्याने माझे समाधान झाले नाही. म्हणून मी एक दिवस श्रीगुरुजींना माझी अडचण सांगितली. त्यांनी तो विषय स्पष्ट करताना असे म्हटले की, आत्मनिवेदनाचे ममता-समर्पण व अहंता-समर्पण असे दोन पैलू आहेत. भक्त बळी राजा त्याचे आदर्श उदाहरण आहे. 'बलिर्भूत सर्वस्व संपूजने' (सर्वस्व संपूजनात बळी राजा सर्वश्रेष्ठ आदर्श आहे.) वामनावताराने बळीराजाकडे तीन पावले भूमी मागितली. आपल्या दोन पावलांनी भगवंताने त्रैलोक्य व्यापून टाकले. तिस¬या पावलासाठी बळीने आपले मस्तक भगवंतापुढे झुकवले. भगवंताने आपला पाय बळीच्या डोक्यावर ठेवून बळीराजाचे आत्मनिवेदन पूर्णपणे स्वीकारले.
 
या कथेत आत्मनिवेदनाच्या ममता-समर्पण व अहंता-समर्पण या दोहोंचाही समावेश आहे. भगवंताच्या पहिल्या दोन पावलात बळी राजाने आपले त्रैलोक्याचे राज्य म्हणजेच 'ममतास्पद यच्चयावत् पदार्थ' भगवंताला समर्पित केले. हे ममता समर्पण समजले पाहिजे.
 
यानंतर बळीजवळ स्वत:चे असे म्हणण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही. केवळ 'मी बळी राजा आहे' ही अहंताच शिल्लक राहिली. हा अहंकारही नष्ट करण्यासाठी तो भगवंताच्या समोर नतमस्तक झाला आणि त्याने भगवंतापाशी प्रार्थना केली की, त्याने आपला पाय माझ्या डोक्यावर ठेवावा. भगवंताला तेच हवे होते. भगवंताने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याच्या आत्मसमर्पणाचा संपूर्णपणे स्वीकार केला. अशा प्रकारे पहिल्या दोन पावलात ममता-समर्पण आणि तिस¬या पावलात अहंता-समर्पण झाल्याने बळी राजाची आत्मनिवेदनरूपी भक्ती पूर्ण झाली. 'बलिर्भूत सर्वस्व संपूजने' श्लोकात जो 'सर्वस्व' शब्द आहे त्यात 'सर्व' आणि 'स्व' अशी दोन पदे आहेत. 'सर्व' शब्दात षष्ठी प्रत्ययात्मक म्हणजे आपले आपले म्हणून ज्या पदार्थांच्या विषयी स्वामित्वाचा भाव आपण व्यक्त करतो त्यांचा समावेश होतो. त्यांचे समर्पण हे ममता-समर्पण.
 
'स्व' पदाचा अर्थ 'अहं' म्हणजे 'मी' आहे. देहालाच मी समजले जाते. हा अहंकार नष्ट झाल्याशिवाय पूर्ण आत्मनिवेदन कसे शक्य आहे? हा अहंकार देहावर असतो. म्हणून बळी राजाने देहाचे उत्तमांग जे डोके तेच भगवंतापुढे झुकवून आपला सारा अहंकार ज्यात देहाबद्दल असलेला अहंकारही समाविष्ट आहे, भगवंतास अर्पण केला.
'सर्वस्व' शब्दात आत्मनिवेदनाचा पूर्ण अर्थ व्यक्त झालेला आहे.
- कृ. मा. घटाटे
 
कुंडलिनी - योग आणि शक्तिपात
१९७३ च्या मे महिन्यातील घटना आहे. पुण्याचे श्री. जोशी यांनी श्रीगुरुजींना गुळवणी महाराजांनी लिहिलेले कुंडलिनी - योग आणि शक्तिपात या संबंधी एक पुस्तक भेट दिले होते. श्रीगुरुजींनी ते पुस्तक वाचले. मला त्या विषयात रस असल्याने श्रीगुरुजींनी मलाही ते वाचण्याचा आग्रह केला. आणि ते म्हणाले, ''पहा, यात श्री गुलाबराव महाराजांचा 'कुंडलिनी जगदंबा' नावाचा एक अध्याय जसाच्या तसा उध्दृत केलेला आहे.''
 
मी ते पुस्तक ब¬याच वेळा पाहिले आणि मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी श्रीगुरुजींना विचारले, ''गुरुच्या आशीर्वादानेच कुंडलिनीची जागृती संभवनीय आहे. परंतु आजकाल कोणतीही व्यक्ती स्वत:ची कुंडलिनी जागृत झाल्याचा दावा करते. कोणताही साधू कोणत्याही व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून शक्तिपाताने कुंडलिनी जागृत करताना दिसतो. 'कुंडलिनी जागृती'ची ही सामूहिक गोष्ट काय आहे? याच्यामध्ये काही कुठे ताळमेळ आहे का? या गोष्टी मला समजत नाहीत. कारण दुर्मिळ वस्तू जेव्हा विपुल प्रमाणात मिळू लागतात तेव्हा यात काही गडबड आहे अशी शंका मनात येणे हे स्वाभाविक आहे. या संबंधी आपले काय मत आहे?''
 
श्रीगुरुजी क्षणभर थांबले आणि मग म्हणाले, ''साधकाला समाधी प्राप्त करण्यासाठी हृदयाच्या अज्ञान-ग्रंथींचा नाश होऊन जीव-शिवाची एकरूपता प्राप्त झाली पाहिजे. त्यासाठी गुरुच्याद्वारे शक्तिपात करणे जरुरीचे ठरते. 'विवेक सिंधु'मध्ये तुम्ही वाचलेही असेल की, श्री मुकुंद राजाने एका राजाला त्याच्या घोडयासहित समाधीच्या अवस्थेत ठेवले. चाबकाच्या एका फटका¬यासरशी तो राजा आणि त्याचा घोडा समाधी स्थितीत तटस्थ राहिले. हाच शक्तिपात आहे. यामुळेच राजाच्या अज्ञान ग्रंथींचा नाश झाला व त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले. प्रत्येक साधू पुरुषाच्या जीवनात त्याच्या साधना - काळाची समाप्ती ह्याच शक्तिपाताने होते. श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची उदाहरणे तर तुम्हाला ठाऊकच आहेत.
 
यावर मी म्हणालो की, एका दृष्टीने आपले बोलणे बरोबर आहे. ह्या सर्व महात्म्यांचे अज्ञान, गुरुकृपेनेच दूर झाले. परंतु आज तशा धर्तीचा परमार्थ कुठे दिसत नाही. आज सधन कुटुंबातील व्यक्ती तसेच 'मॉडर्न सोसायटी'च्या देखाव्याखाली वासनापूर्ती करण्यात मग्न असलेले लोकही 'फॅशन' म्हणून गुरुकडे जातात. त्यांचे गुरुदेखील त्यांना मनाची वासना कमी कशी करावी किंवा तामसी वृत्ती वाढविणारा आहार विहार कमी कसा करावा हे सांगत नाहीत. उलट ते कुंडलिनी जागृत करून देतात. यात कितपत तथ्य आहे? कुंडलिनी जागृत झाल्यावरही त्यांच्या वासना अनिर्बंधच राहतात, त्यांच्या ऐश्वर्यालाही मर्यादा उरत नाही. अशा स्थितीत अशा लोकांची कुंडलिनी जागृत झाली आहे असे कसे मानता येईल?
 
यावर श्रीगुरुजी म्हणाले, ''हे खरे आहे की, काही ठिकाणी असे फसवणुकीचे प्रकार होतात. परंतु पूजनीय गुळवणी महाराजांसारख्या महात्म्यांच्या विषयात अशा प्रकारचा संशय मनात येता कामा नये. श्री रामकृष्ण परमहंसदेखील भजन करताना कुणाच्या छातीला हात लावून त्याला भावावस्थेत घेऊन जात असत आणि शक्तिपात करत असत. शक्तिपाताचे दोन प्रकार आहेत. एक आहे पूर्वजन्मात साधक राहिलेल्या व्यक्तीला या जन्मात साधना-मार्गावर घेऊन जाणे आणि दुसरा आहे जीव-शिव एकरूप करणे. यात दुसरा प्रकारच श्रेष्ठ आहे. हजारो साधकांमधून एखाद्यालाच तो प्राप्त होतो. कुंडलिनी जागृत झाल्यावर जेव्हा अंतिम समाधीची वेळ येते तेव्हा गुरु त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला कृतार्थ करतात.''
 
''पूर्वी जेव्हा कोण्या सत्पुरुषाच्या हाताने एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीची कुंडलिनी जागृत केली जात असे तेव्हा साधकाने सांसारिक गोष्टीकडे लक्ष न देता आपली प्रगती केली पाहिजे, या प्रयत्नात कुठे खंड पडता कामा नये, यात खंड पडला, तर हानी होईल, असे सांगितले जात होते. परंतु आता आपण अनेक वेळा पाहतो की, काही लोक एकाग्रतेचा अभ्यास करतात, त्यांना चांगले अनुभवही मिळतात परंतु मोहाच्या क्षणी विचलित होऊन ते पतनाकडे झपाटयाने जातात. म्हणून असा आग्रह धरला जातो की, गुरुकडून कुंडलिनी जागृत झाल्यावरही 'वैराग्य आणि मनोनाशा'चा अभ्यास साधकाने निरंतर केला पाहिजे. आपल्या शास्त्रांनी अशी व्यवस्था करून ठेवली आहे की, शिष्याला मार्ग दाखविणे हे गुरुचे कर्तव्य आहे, परंतु आत्मज्ञान तर त्या शिष्याला स्वत:च्या प्रज्ञेने प्राप्त होत असते. गुरु केवळ मार्ग दाखवतो. त्या मार्गावर तर शेवटी त्या शिष्यालाच चालावे लागेल. म्हणून स्वत: प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य सफल होत नसते.''
 
''मी अशा लोकांचा आदर एवढयासाठी करतो कारण हे लोक सन्मार्गावरून चालत असल्याने साधकाची भूमिका निभावत असतात. प्रदीर्घ प्रवासात अनेक बाधा उपस्थित होतात. साधकाच्या हातून चुका होतात. ते पडतात, पुन्हा उठून उभे राहतात आणि पुन्हा एकदा ठरलेल्या मार्गाने चालू लागतात. अशा सन्मार्गावरील लोकांच्या जीवनात परमार्थाचा प्रारंभ होतो.''
 
'अनेक जन्म संसिध्दा: ततो याति परां गतिम्,' असे गीतेतही म्हटले आहे. अनेकानेक जन्मानंतर का होईना त्यांना सिध्दी प्राप्त होईलच. म्हणूनच मी 'कुंडलिनी जागृती'ला परमार्थाची पहिली पायरी मानतो. व्यक्तीत दोष असणे, दुर्बलता असणे स्वाभाविक आहे. तथापि, तो परमार्थाकडे प्रवृत्त होतो, हाच महत्त्वाचा गुण आहे. हळूहळू त्याचे दोष, दुर्बलता कमी होईल, परमार्थाकडे असलेली त्याची प्रवृत्ती वाढेल, त्याचा विकास होऊन पुढे केव्हा न केव्हा तो महात्मा बनेल. जसे मुंबईकडे जाणारी व्यक्ती जेव्हा गाडीतून रवाना होते तेव्हा आपण म्हणतो, तो मुंबईस गेला आहे. हेच तत्त्व येथेही लागू होते.''
मी विचारले, ''परंतु कधी कधी परमार्थाच्या दृष्टीने श्रेष्ठ वाटणारी व्यक्तीही पुढे खोटी शाबित होते. असे का?''
 
माझ्या या प्रश्नाला उत्तर देताना श्रीगुरुजी म्हणाले की, याचेही उत्तर तेच आहे. परमार्थाच्या दिशेने वाटचाल करणारी व्यक्ती सामान्यच असते. कोणत्याही शिपायाची राजाच्या रूपाने स्तुती केली जाऊ शकते. परंतु राजाला शिपाई म्हटले जात नाही. तसेच हे लोक आज ना उद्या परमार्थ प्राप्त करतीलच म्हणून त्यांना नमस्कार केला पाहिजे. त्यातच आपले कल्याण आहे. चांगल्या गोष्टींसाठी वंदन करायचे आणि वाईट गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही. आपल्या व्यवहारात नम्रता आणण्याचा हाच चांगला मार्ग आहे. जीवनात अहंकाराचा प्रवेश होऊ नये म्हणून तुकाराम महाराजांनी जे सांगितले आहे त्यानुसार व्यवहार केला पाहिजे. त्यांनी म्हटले आहे की,
जग देव तरी पायांचि पडावे।

त्यांचिया स्वभावे काज नाही।
श्रीगुरुजी परमार्थासंबंधीच्या चर्चेत मोठया उत्साहाने भाग घेत असत आणि निरनिराळया प्रकारच्या उदाहरणांनी विषयाचे प्रतिपादन करत असत, हे मी कधीच विसरु शकणार नाही.
- कृ. मा. घटाटे
 
गोहत्येचे समर्थन करणारांना मत देऊ नये
१९६६ मध्ये प्रयागचा कुंभमेळा होता. त्यावेळी भारत गोसेवक समाजाच्या वतीने सकीर्तन भवन झूसी येथे अ. भा. गोरक्षा संमेलन आयोजित केले होते. त्याचे उद्धाटन करताना श्रीगुरुजी म्हणाले की, विद्यमान सरकारचा अहिंदूंच्या मतांवर विश्वास आहे. कारण ते संघटितपणे त्यांच्या पक्षाला मतदान करतात आणि हिंदू असंघटित असल्यामुळे त्यांच्या मतदानाचा प्रभाव पडत नाही. म्हणून हिंदूंनी आगामी निवडणुकीत संघटित होऊन आपल्या मतदानाचा गोरक्षणाच्या दृष्टीने सदुपयोग केला पाहिजे. गोहत्येचा कलंक पुसून टाकण्यासाठी एकमात्र उपाय हाच आहे की, आगामी निवडणुकीत जो गोहत्या बंद करण्याची प्रतिज्ञा करेल, त्यालाच आणि त्याच पक्षाला मत दिले गेले पाहिजे.
- विश्वंभर प्रसाद शर्मा
 
थोरवीचा मापदंड (Criteria of Greatness)
श्रीगुरुजींनी आपल्या शेवटच्या पत्रात लिहिले होते की, माझे स्मारक करू नका. बाहेरच्या लोकांना ह्याचे मोठे आश्चर्य वाटले. केरळचे एक साम्यवादी खासदार श्री. बालचंद्र मेनन यांनी म्हटले की,
Your Golwalkar was great in life, greater in Death. Length of one's shadow on future is the criteria of Greatness. Dead Golwalkar is more dangerous than Golwalkar alive.
(तुमचे गोळवलकर जिवंतपणी थोर होतेच, मृत्युनंतर ते अधिकच थोर बनले. भविष्यावर पडलेली एखाद्याची छाया किती लांब आहे, ती लांबी थोरपणाचा मापदंड असते. जिवंत गोळवलकरांपेक्षा स्वर्गीय गोळवलकर अधिक धोकादायक आहेत.)
- दत्तोपंत ठेंगडी
 
श्रीगुरुजींचा 'तिरुक्कुरल'वर अभिप्राय
''मी अनेक वेळा सांगून चुकलो आहे की, सर्व भारतीयांनी लक्ष देऊन भक्तीभावाने तमिळ महाकाव्य 'तिरुक्कुरल' वाचले पाहिजे. जे वाचतील त्यांच्या सद्प्रवृत्ती पुष्ट होतील तसेच त्यांचे प्रापंचिक जीवन सफल होईल.''
- दै. त्यागभूमि