पराकोटीचे दारिद्रय
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
हिंदुत्वाचा अभाव हे समाज छिन्नविच्छिन्न होण्याचे प्रमुख कारण आहे. आपण सर्व हिंदू आहोत ही भावना मनात क्षीण झाल्यामुळे आज अशी स्थिती आहे की, कोटयवधी लोक भीषण दारिद्रयात, दैन्यावस्थेत जीवन जगत असूनही त्यांच्याकडे आपले लक्ष नाही. बिलकुल नाही. कोणी त्याकडे ढुंकूनही पहात नाही. एखाद्या वेळेस उडत उडत बातमी कानावर आलीच, तर आपण विचार करतो की, असेच होत असते. जे दैन्य भोगताहेत त्यांना तसेच भोगू द्या, आम्ही मात्र आरामात राहू. लोकांना वाटते त्यांच्याशी आपल्याला काय करायचे? समाजात इतके दैन्य आणि दारिद्रय आहे की, त्याची कल्पना करणेही कठीण!
 
मी एक उदाहरण सांगतो. माझ्या परिचयाचे एक सद़्गृहस्थ आहेत. ते मला जंगलात वसलेल्या एका गावी घेऊन गेले. त्यांनी विचार केला की, दूर जंगलात राहणा¬या आपल्या बांधवांमध्ये धर्माविषयी प्रेम उत्पन्न करू. त्यांच्या अडचणी समजावून घेऊ. अडचणी दूर करण्यासाठी काही योजना तयार करू. अशा प्रकारे त्यांच्यात काही सामर्थ्य उत्पन्न होईल. या विचाराने ते त्या गावात गेले. यथावकाश त्यांनी गावक¬यांना एकत्र केले. एक मंदिर होते. त्या मंदिरात सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले. मोठया श्रध्देने कीर्तनही केले. महापुरुषांच्या जीवनासंबंधी काही गप्पागोष्टी झाल्या. याचबरोबर त्यांनी त्या गावकरी बंधूंच्या जीवनासंबंधी काही समजून घ्यायचाही प्रयत्न केला. दुस¬या दिवशी परत जाताना त्या गृहस्थांसमोर एक प्रश्न उभा राहिला. त्यांच्या लक्षात आले की, काल रात्रीच्या कार्यक्रमास एकही महिला आलेली नव्हती. केवळ पुरुषच आलेले होते. म्हणून त्यांनी तेथील लोकांना विचारले, ''काय हो! काल रात्री आपण सर्वांनी भगवंताचे स्मरण केले, कीर्तन केले; पण त्या कीर्तनास गावातली एकही माऊली आलेली नव्हती, त्यांना येण्यास मनाई आहे का?'' लोकांनी म्हटले, ''गावात तशी मनाई वगैरे काही नाही.'' खोदून विचारल्यावरही गावक¬यांनी नेमके उत्तर देण्याची टाळाटाळ केली. आमच्या मित्रांना असे वाटले की, घरातील काही कामधाम असेल म्हणून नसतील आल्या. पण तरीही त्यांचे समाधान झाले नाही. काही दिवसांनी जेव्हा मला ते भेटले आणि त्यांनी मला या घटनेसंबंधी सगळे सांगितले तेव्हा मी त्यांना म्हणालो की, तुम्हाला त्या भागात असलेल्या भीषण दारिद्रयाची कल्पनाच नाही. तेथे इतके दारिद्रय आहे की, तेथील कोणत्याही स्त्रीजवळ दोनदेखील वस्त्रे नाहीत. जे एक वस्त्र आहे ते देखील चिंध्या जोडून तयार केलेले. बस तेवढयाच एका वस्त्राने कशीबशी लाज राखली जाते. दिवसभर ती कामधाम करते, रात्री सर्वजण झोपल्यावर ती अंगावरचे वस्त्र धुऊन वाळण्यासाठी ठेवून देते. थंडी असो, उकाडा असो, पाऊस असो, सगळया काळात याच पध्दतीने रहावे लागते. आपण रात्री तेथे गेला होता. असेही असू शकते की, सर्व महिलांनी आपल्या अंगावरचे वस्त्र धुऊन घरात वाळत घातले असेल; अशा स्थितीत कोणतीही महिला कपडयाविना कार्यक्रमास कशी येऊ शकेल? माझी ही गोष्ट ऐकून उपस्थित सर्वांनी असे म्हटले की, अशा दारिद्रयाची आम्ही कल्पनाही करू शकत नाही.
 
आणि हे खरेच आहे की, आपण शहरात राहणा¬यांना इतक्या पराकोटीच्या गरीबीची कल्पना येत नाही. अनेक लोक खायला अन्न नाही, अंगावर घालायला कपडा नाही, आजारपणात औषध नाही, अशा अवस्थेत रहात असतात. एवढेच नाही, तर लोकांच्या मनात असे हे भीषण दारिद्रय जाणून घेण्याची इच्छाही उरलेली नाही इतकी सहानुभूतीशून्य स्थिती समाजाची झालेली आहे. हिंदुत्वाचे विस्मरण यामुळे झाले. भेदाची भावनाच अशा प्रकारच्या सहानुभूतिशून्यतेचे प्रमुख कारण आहे.