शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
परिश्रमपूर्वक संघकार्य करायचे म्हटले की, कष्ट तर सहन करावे लागतीलच. परिश्रम करण्यात आपल्या शरीराची क्षमता कमी पडली, थोडयाशा धावपळीने ते डळमळू लागले, तर ज्या महान कार्याची कल्पना घेऊन आपण चाललो आहोत, ते पूर्ण होणार नाही. म्हणून शरीर स्वस्थ आणि शक्तीसंपन्न बनवले पाहिजे.
 
मी कित्येक वर्षांपासून आपल्या बांधवांना सांगत आलेलो आहे की, फार नाही पण कमीत कमी पंचवीस सूर्यनमस्कार रोज घाला. एखाद्या जाणकाराच्या विचाराने, आपल्या शरीराला मानवणारी दोन, चार आसने करा. पाच मिनिटे दीर्घ श्वसन करा. यामुळे आपल्या शरीरास आवश्यक अशी शक्ती, चेतनास्फूर्ती, कधी न थकण्याची क्षमता आपल्यात येईल.
 
आजकालचा तरुण आपले शरीर शृंगारण्यासाठी जेवढा वेळ देतो त्याच्या शतांश जरी त्याने शरीर स्वस्थ राहण्यासाठी दिला, तरी शरीर बलवान बनू शकते. तरी असे म्हटले जाते की, आम्हाला वेळ नाही.
 
मला आपल्या स्वत:च्या जीवनाचा अनुभव आहे. आज सांगण्याची आवश्यकता यामुळे निर्माण झाली की, माझ्या शरीराचा एक हिस्सा काही दिवसांपूर्वी आपल्या डॉक्टरांनी मिळून कापून काढला. या कारणाने दोन वर्षांपासून मी सूर्यनमस्कार घालू शकत नाही. त्याच्या आधी मी नियमितपणे सूर्यनमस्कार घालत असे. म्हणजे माझ्या वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत माझे सूर्यनमस्कार चालू होते. आपल्याला ठाऊक आहे, मी किती वर्षांपासून फिरतोय. आजकाल माझे सहकारी कार्यकर्ते माझी खूप काळजी घेतात. परंतु पूर्वी मी गावेच्या गावे पायी फिरलो आहे. कधी मोटार, कधी बैलगाडी, कधी सायकल. मिळेल त्या वाहनाने मी फिरलो. वाहन नसेलच तर पायी, धावत पळतही मी प्रवास केला. कधी जेवण मिळे कधी मिळतही नसे. असा काळही मी अनुभवला. तरीही मी आपल्यासमोर जिवंत उभा आहे आणि सर्व प्रवास पुन्हा करतोय. ज्या वयात लोक थकतात आणि म्हणतात की, आमचे तारुण्य संपले, त्या वयात मी मोठया उत्साहाने कार्यरत आहे. याचे कारण एवढेच आहे की, मी लहानपणापासून व्यायाम केला. तारुण्यापूर्वी, तारुण्यात आणि नंतरही आतापर्यंत व्यायाम चालत आलेला आहे. व्यायामाचा एवढा मोठा लाभ मला झाला.
म्हणून असा विचार केला पाहिजे की, सर्व प्रकारच्या परिस्थितीशी टक्कर देणारे शरीर आम्ही प्राप्त केले पाहिजे.