तीन पैशांचा हिशोब
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
संघकामाच्या सुरुवातीच्या काळात कार्यकर्त्यांजवळ पैसे शिल्लक रहात नसत. अंगावर घालण्याकरता कुणाकडून तरी जुनी बंडी ते मिळवत असत. प्रवासात प्रसंगी उपाशी रहावे लागत असे. आठवडयात दोन आण्याहून जास्त खर्च होत नसे.
 
मला जेव्हा संघकार्यासाठी कलकत्त्यास पाठवले गेले तेव्हा मला वीस रुपये दिले होते. येण्याजाण्याचे भाडे वजा जाता माझ्याकडे चार-पाच रु. शिल्लक रहात होते. त्या पैशातून एक महिन्याचा खर्च भागवायचा होता. कलकत्त्यासारख्या मोठया शहरात लोकांना भेटणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे, शाखा उघडण्याचा प्रयत्न करणे असे सर्व काम चार-पाच रुपयात चालले. तेथे राहण्याची व्यवस्था निराळी झालेली होती. मी सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडत असे. आणि रात्री दहा अकरा वाजेपर्यंत परतत असे. अशा प्रकारे महिनाभर आपल्या शाखेचे काम करून मी नागपूरला परतलो. सर्व हिशोब केल्यावर माझ्याजवळ तीन पैसे उरले होते. मी ते तीन पैसे परत केले. आपल्या पायांच्या भरवशावर मी कलकत्त्यात कित्येक मैल पायी हिंडलो. काम करणा¬याला हे सर्व करावेच लागते.