कॉपीची चीड
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
मी इंटरमीडिएट परीक्षेची तयारी करत होतो. माझा अभ्यास फार थोडा झाला होता. त्याला कारणेही अनेक होती. परीक्षेत जेव्हा मी प्रश्नपत्रिका हातात घेऊन ती सोडवू लागलो तेव्हा लिहिता लिहिता वर पाहून काही विचार करू लागलो. इतक्यात पर्यवेक्षक (सुपरवायझर) माझ्याजवळ आले आणि मला म्हणू लागले की, कॉपी करू नका.
 
मी म्हणालो, ''मी कॉपी करत नाही आहे.'' पर्यवेक्षक म्हणाले, ''तरीही कॉपीचा प्रयत्न करू नका.'' मी म्हणालो, ''महाशय, माझा विषय विज्ञान आहे आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्याचा विषय कला आहे. जरी मी कॉपी केली तरी त्यात माझा फायदा काय?''
 
तरीदेखील पर्यवेक्षक महोदय आपल्या मुद्यावर अडून राहिले आणि म्हणाले, ''तरीदेखील मला असे वाटते की, कॉपी करणे ही चांगली गोष्ट नाही.'' मी त्यांना म्हणालो, ''महाशय, मला कॉपी कशी करावी हे चांगले अवगत आहे. आपल्याला बघायचेच असेल तर मी आपल्याला माझे कॉपी करण्याचे कौशल्य दाखवू शकतो.'' मग मी त्यांच्याजवळचाच एक कागद घेतला आणि एक परिच्छेद लिहून त्यांच्या हातात देताना म्हणालो, ''मी ही कॉपी केली आहे. आता आपण सांगा की कोणत्या विद्यार्थ्याची ही कॉपी आहे?''
 
पर्यवेक्षक काही सांगू शकले नाहीत. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ''हे पहा, ज्या रांगेत मी बसलो आहे, त्यापासून जी चौथी रांग आहे त्या रांगेत जो विद्यार्थी सर्वात पुढे बसला आहे, त्याची ही कॉपी आहे. आपण जाऊन तपासू शकता.''
 
त्यांना आश्चर्य वाटले. ते गेले, त्यांनी पाहिले. त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही, कारण त्या विद्यार्थ्याचा शब्द न् शब्द मी कागदावर उतरवला होता. मी त्यांना म्हटले, ''मी कॉपी करण्यात इतका वाकबगार असलो, तरी कॉपी करणे मला पसंत नाही. एकवेळ मी नापास होईन पण कॉपीसारख्या सर्वथैव त्याज्य गोष्टीचे कधीही अनुकरण करणार नाही.''
 
माझा अभ्यास कमी झाला होता आणि कॉपीचे तर मला वावडे होते. तरीही मी परीक्षा दिली आणि चांगले गुण मिळवून पास झालो. याचे कारण काय होते? मी त्यावेळी अहोरात्र अभ्यास केला. दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ दोन तास दैनंदिन विधीसाठी देऊन उरलेले बावीस तास मी अभ्यास करत असे. सतत महिनाभर असा कार्यक्रम चालला होता. परंतु मला ना थकवा आला ना झोप. हे सारे मी, सूर्यनमस्कार आणि थोडासा प्राणायाम, याच्या जोरावर करू शकलो. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात इतके चैतन्य देण्याची शक्ती आहे. यासाठी मी म्हणतो की, सूर्यनमस्कार घाला, दीर्घ श्वसन करा. यामुळे शरीरात चैतन्य आणि स्फूर्ती टिकून राहील.
 
मी तरुणपणी रोज अडीचशे सूर्यनमस्कार एका दमात घालत असे. आजकाल जेव्हा एखादा तरुण स्वयंसेवक शाखेत न येण्याचे कारण परीक्षेचा अभ्यास, तसेच खेळामुळे येणारा थकवा आणि झोप असे सांगतो तेव्हा मला आपल्या स्वत:च्या अनुभवांची आठवण होते.