परिश्रम आणि धैर्य
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
मला एका स्वयंसेवकाचे पत्र आले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, ज्यांच्याजवळ धन आहे ते दक्षिणा समर्पणाच्या प्रसंगी काकू करतात, जाणून बुजून दुर्लक्ष करतात, तर हातावर पोट असणारे स्वयंसेवक मोठया धाडसाने स्वत:च्या मासिक उत्पन्नाच्या तुलनेत कितीतरी अधिक दक्षिणा समर्पण करतात. मी त्या पत्राचा अर्थ असा काढला की, ज्याच्याजवळ पैसा नाही, जो परिश्रम करून कमावतो आणि कमवून खातो, त्याच्या हृदयात एक प्रकारचे धैर्य आहे, अशी हिम्मत आहे की, खर्च करण्याची इच्छा झाली, तर पैसा कमवू शकेन. जो धनवान आहे, ज्याला परिश्रम पडत नाहीत त्याला सदैव भय सतावीत राहते की, आज जर माझा पैसा खर्च झाला, तर उद्या मी उपाशी मरेन. कारण आपण कमवू शकू अशी हिम्मत त्याच्याजवळ नाही.
 
ज्या स्वयंसेवक बंधूंच्या मनात असे विचार येत असतील की, जर गणवेषाचे बंधन नसते, तर आपण शिबिरात गेलो असतो, त्यांच्या दृष्टीने गणवेष करणे आर्थिक दृष्टया कठीणच आहे. मग असे म्हणावे लागेल की, त्यांच्यात हिंमत नाही. माझी अशी समजूत आहे की, संघात अनेक जण असे असतील की ज्यांचे उत्पन्न कमी असूनही संघाविषयी अंत:करणात असलेल्या आत्मीयतेपोटी, श्रध्देपोटी त्यांनी आर्थिक अडचणींवर मात करून गणवेष केलेला आहे.