गरीबी हटाओ
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
लोक गरीबी दूर करण्याकरता त¬हेत¬हेच्या घोषणा करतात. इच्छा असणे ठीक आहे; परंतु घोषणांनी काही होणार नाही. जो पर्यंत मनात पीडित व्यक्तीविषयी खरीखुरी प्रेरणा उत्पन्न होणार नाही तोपर्यंत परिश्रम कोण करेल? यामुळे 'गरीबी हटाओ' या घोषणांची विकृत रूपे पहायला मिळतात. एकदा निवडणूक प्रचारासाठी आपल्या केंद्र सरकारचे एक फार मोठे नेते एका ठिकाणाहून दुस¬या ठिकाणी विमानाने जात होते. योगायोगाने मीही त्यावेळी मुंबईच्या त्या विमानतळावर उपस्थित होतो. मलाही संघकामासाठी जायचे होते. मी आपल्या मित्रांबरोबर बसलो होतो. विमान सेवेचा एक मोठा अधिकारी यावेळी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ''महाराज! आपल्या बरोबर ही जी माणसे आहेत, ती सटर फटर नाहीत ना!'' मी म्हणालो, ''आपण काय बोलता! सटर फटर शब्दाने तुम्हाला काय म्हणायचे आहे!'' तो थोडासा घाबरला आणि म्हणू लागला ''नाही, नाही! माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही''. मी म्हणालो, ''जरा नीट बोलत चला.'' त्यांच्याबरोबर एक पोलिस अधिकारीही होता. दोघेही निघून गेले. मी विचार करू लागलो की, अशा प्रकारची विचारपूस करण्याचे कारण काय असावे? विचारपूस केल्यानंतर समजले की, या विमानाने केंद्राचे जे मंत्रीमहोदय चालले आहेत त्यांच्यासमोर कोणी गरीब माणूस येऊ नये म्हणून धडपड चालली आहे. विमानतळावर काही काम चालले होते, तेथे काम करणा¬या मजुरांना एका पिंज¬यात पडदा लावून बंद केले होते. मंत्रीमहोदय जेव्हा विमानाने निघून गेले तेव्हा त्या मजुरांना सोडून देण्यात आले. माझ्या मनात आले ही गोष्ट तर 'गरीबी हटाओ' नसून 'गरीब हटाओ' अशी आहे.