ध्यास
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
तसे संघ शिक्षा वर्गाचे शिक्षण साधे, सरळ आहे. जर आपण मनापासून काम केले, तर आपले प्रथम, द्वितीय वा तृतीय वर्षाचे शिक्षण एकेका आठवडयात पूर्ण होऊ शकते. उरलेला वेळ त्याची उजळणी करून आपण ते पक्के करू शकतो. आता लोक मला विचारतील की, आपण तर कधी संघ शिक्षा वर्गाचे प्रथम वर्षही केले नाही, मग कोणत्या आधारावर असे म्हणू शकता? प्रथम, द्वितीय किंवा तृतीय वर्षाचे शिक्षण मी पूर्ण केले नाही, हे खरे आहे; परंतु योगचाप सोडून दंड, शूल, खड्ग, छुरिका इ. जवळजवळ सर्व शारीरिक कार्यक्रम सुरू झाले तेव्हा मी दंडाचा अभ्यास सुरू केला. जास्तीत जास्त 40-50 मिनिटे मला लागली असतील. तेवढया वेळात मी दंडाचा अभ्यास पूर्ण केला. आपले कार्यक्रम अगदी साधे आहेत. जर कुणाला ते जमत नसतील, तर त्याचा अर्थ त्याचे मन त्या कार्यक्रमात लागत नसेल किंवा त्यांच्यात शारीरिक दोष असेल.