नियमित जीवन
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
एकदा मी एका शाखेत गेलो होतो. त्या शाखेचे प्रमुख कार्यकर्ते मला नेण्यासाठी स्टेशनवर आले पण उशीरा आले. संघस्थान मला ठाऊक होते. त्यामुळे स्टेशनवरून मी थेट संघस्थानावर येऊन पोहोचलो. माझ्याबरोबर दुसरा कोणी कार्यकर्ता नव्हता. शाखा लागलेली होती. मी ध्वजप्रणाम करून शाखेत उभा राहिलो. थोडया वेळाने प्रार्थना झाली. प्रार्थनेच्या वेळी मी माझ्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन उभा राहिलो. शाखा विकिर झाल्यानंतर स्वयंसेवक कुतुहलापोटी माझ्या आसपास एकत्र जमले. माझा परिचय विचारू लागले. मी त्यांना सांगितले की, मी नागपूरहून आलो आहे, कामधंदा काही न करता भटकत असतो. मी आपल्या शाखेत रोज जात नाही, कधीतरी जातो. मी असे सांगितल्यावर एक स्वयंसेवक मला म्हणाला की, ही गोष्ट चांगली नाही. शाखेत नियमितपणे गेले पाहिजे. एकाच शाखेत रोज जात नाही हेही ठीक नाही. आपल्याला एकाच शाखेत जाऊन नित्य कार्यक्रम केले पाहिजेत.
 
तो स्वयंसेवक जेव्हा मला समजावत होता तोपर्यंत स्टेशनवर मला घेण्यासाठी गेलेले कार्यकर्ते मला स्टेशनवर न पाहिल्यामुळे धावत पळत संघस्थानावर पोहोचले. त्यांनी आमच्या गप्पागोष्टीतील शेवटचे वाक्य ऐकले होते. त्यामुळे ते स्वयंसेवकांना दटावू लागले, की अरे तुम्ही असे कसे स्वयंसेवक! यांना तुम्ही ओळखत नाही की ते कोण आहेत?
 
सांगण्याचे तात्पर्य, आपल्या प्रत्येक स्वयंसेवकाला ठाऊक आहे की शाखा आणि शाखेतील कार्यक्रम कधीही चुकवता कामा नयेत, ही प्रत्येक स्वयंसेवकाची जबाबदारी आहे. माझ्या भाग्याने मलाही हा उपदेश ऐकायला मिळतो आणि मी तो मानतोही.
लक्ष्य जितके मोठे, त्याला अनुरूप तितके मोठे बंधन स्वीकारून लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
रोजच्या रोज आपण जितके नियमाने वागू तितक्या गतीने आपण आपली बुध्दी स्थिर ठेवू.