योग्य अर्थ
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
मी हायस्कूलमध्ये शिकत असतानाची गोष्ट. आम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी नवीनच शिक्षक आले होते. ते आम्हाला पाठयपुस्तके शिकवत असत. एक दिवस ते कविता शिकवत असताना माझ्या लक्षात आले की, त्यांचे काहीतरी चुकले आहे. मी उभा राहिलो आणि म्हणालो, ''सर, आपण आता जो अर्थ सांगितला तो माझ्या दृष्टीने बरोबर नाही.''
त्यांनी सांगितले, ''नाही - नाही, जे काही मी सांगितले आहे तेच बरोबर आहे.''
 
मी म्हणालो, ''नाही, मला असे वाटते की, ह्याचा दुसरा अर्थ अधिक बरोबर आहे.'' त्यांनी विचारले, ''तो अर्थ काय आहे?'' मला जो अर्थ वाटत होता, तो सांगितल्यावर ते म्हणाले, ''हा अर्थ चुकीचा आहे.''
 
मी त्यांना म्हटले, ''माझी चूक कुठे आहे, हे कृपया सांगावे.''
 
त्यांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण पालथ्या घडयावर पाणी! मग त्यांनी मला विचारले की, तुला असं का वाटतं की, आपलाच अर्थ बरोबर आहे? तेव्हा माझाच अर्थ कसा बरोबर आहे मी हे त्यांना समजावून सांगितले.
यावर ते म्हणाले, ''ठीक, तुला भाषेचे पुरेसे ज्ञान नाही. तुला शिकायचे आहे आणि मी येथे शिकवण्यासाठी आलो आहे म्हणून मी तुम्हाला शिकवतो. मी जे काही सांगितले तेच बरोबर आहे आणि तू सांगितलेले बरोबर नाही. ते विसरून जा आणि मी जे काही सांगितले आहे ते लक्षात ठेव.''
 
त्यांनी जो अर्थ सांगितला तो पुस्तकाच्या गाईडमध्येही होता. म्हणून त्यांनी जेव्हा म्हटले की मी सांगतो तेच लक्षात ठेव, तेव्हा मी म्हणालो, ''मी या वर्गात शिकणार नाही.''
 
त्यांनी जेव्हा कारण विचारले तेव्हा मी सांगून टाकले की, जो शिक्षक गाईडवरून शिकवतो अशा शिक्षकाजवळ शिकण्याची माझी इच्छा नाही. आपण कवितेचा नीट अभ्यास केलेला नाही. गाईडमध्ये जे काही आहे तेच आपण सांगत आहात. ह्या गाईडवर माझा विश्वास नाही, म्हणून मी चाललो.
 
मी वर्गातून बाहेर पडलो. त्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांपाशी या विषयासंबंधी तक्रार केली. मुख्याध्यापकांनी मला बोलावले. मी मुख्याध्यापकांना सांगितले की, मी माझ्या गोष्टीवर दृढ आहे. गाईडमधून जे शिकवले जाते ते शिकण्याची माझी मुळीच इच्छा नाही.
 
मुख्याध्यापकांनीही मला समजावण्याचा प्रयत्न केला. ''तू विद्यार्थी आहेस. तुझे ज्ञान ते किती?'' इ. इ. परंतु मी आपल्या गोष्टीवर अडून राहिलो. मी म्हणालो की, गाईडमधून शिकवणा¬या शिक्षकाच्या वर्गात मी शिकण्यासाठी जाणार नाही. मी हिमतीने माझी बाजू मांडली आणि त्यावर अडून राहिलो.
 
हे सारे पंधरा दिवस चालले. त्या पंधरा दिवसात मी एकदाही त्या वर्गात गेलो नाही. मुख्याध्यापकांनी मला पुन्हा बोलावले आणि विचारले, ''अशा प्रकारे तू किती दिवस त्यांच्या वर्गात अनुपस्थित राहणार आहेस?''
 
मी म्हणालो, ''जो पर्यंत ते हा विषय शिकवतील तोपर्यंत. एकतर त्यांनी तो विषय शिकवू नये किंवा हा विषय अशा शिक्षकांना दिला जावा जे गाईडचा आधार न घेता आपल्या स्वतंत्र ज्ञानाच्या आधारे शिकवतील, नाहीतर मी वर्गाच्या बाहेरच राहीन. जर आपण माझी अनुपस्थिती मांडली, तर कदाचित या वर्षी मी परीक्षेस बसू शकणार नाही. तसे झाले, तर मी पुढल्या वर्षी परीक्षेस बसेन. एक वर्ष वाया गेले तर जाऊ दे.''
 
माझे बोलणे ऐकून मुख्याध्यापक चकित झाले. त्यांचे माझ्यावर जेवढे प्रेम होते, तेवढाच विश्वासही होता. म्हणून त्यांनी म्हटले की, मी या संबंधी ज्येष्ठ शिक्षकांशी बोलेन.
 
त्यांनी इंग्रजी शिकवणा¬या ज्येष्ठ शिक्षकांशी विचार विनिमय केला. त्या वेळी एका वृध्द शिक्षकाने सांगितले की, ह्या मुलाचे सांगणे बरोबर आहे आणि ह्या आमच्या सहकारी शिक्षकाने लावलेला अर्थ चुकीचा आहे. चूक मान्य करण्याऐवजी निष्कारण बभ्रा करण्यात काय अर्थ आहे? यावर मुख्याध्यापक काहीही बोलू शकले नाहीत.
 
मला पुन्हा बोलावले गेले. मुख्याध्यापक मला म्हणाले, ''तू एवढा आडमुठा का बनलास? तुमचे शिक्षक जे काही सांगतात त्याचा मान नको का ठेवायला? माझ्यातच हिंमत आहे आणि माझ्या शिक्षकात नाही असे सांगण्याएवढा गर्व तुला झाला आहे काय?''
यावर मी उत्तर दिले, ''तुम्हाला हे मान्य करावे लागेल की संपूर्ण प्रांतात इंग्रजी शिकवणारे जे ख्यातनाम शिक्षक आहेत त्यातील एक माझे वडीलही आहेत.'' ते म्हणाले, ''तू म्हणतोस ते बरोबर आहे.'' शिक्षकाच्या रुपाने माझ्या वडिलांची अशी मोठीच प्रतिष्ठा होती. गाईडच्या आधारे ज्ञान संपादन करण्याच्या प्रवृत्तीला माझा एवढा तीव्र विरोध का, याचे रहस्य मुख्याध्यापकांच्या ध्यानात आले. ह्या बाबतीत मी वडिलांचा वारसा चालवत आहे हे त्यांना जाणवले. आपला विद्यार्थी इकडे तिकडे भटकतोय असे त्यांच्या लक्षात आले, तर त्याचे ते तसे भटकणे, ते शिक्षक या नात्याने आपला घोर अपमान समजत असत. तीस वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. या प्रदीर्घ काळात त्यांनी जे विषय शिकवले त्या विषयांसंबंधी त्यांच्या विद्यार्थ्यांना अन्य कोणाकडून मार्गदर्शनाची आवश्यकता कधी पडली नाही.