विश्वासाचे फळ
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
माझ्या ओळखीचे एक सज्जन गृहस्थ होते. त्यांनी संन्यास घेतला आणि ते साधू बनले. इकडे तिकडे भटकत भटकत ते इंग्लंडला पोहोचले. ते लंडनमध्ये एक लहानशी खोली घेऊन राहू लागले. ते भगवद़्गीता, उपनिषद इ. वर प्रवचन करत. परंतु त्यांच्या प्रवचनास चार-दोन माणसेच येत असत.
 
लंडनमध्ये राहणारे एक सन्माननीय शीख सद़्गृहस्थ आपल्या एकुलत्या एक मुलीच्या कारणाने जरा चिंतीत होते. सरदारजींच्या त्या मुलीचे डोके भयंकर दुखत असे. सरदारजींनी इंग्लंडमधील मोठमोठया डॉक्टरांना दाखवले पण कोणाच्याही औषधाचा उपयोग झाला नाही. मुलगी खूप दु:खी होती. तिचे लिहिणे, वाचणेही बंद झाले होते. त्यामुळे सरदारजींना आपल्या मुलीची फारच चिंता लागून राहिली. सरदारजींच्या कानावर आले की, भारतातून कोणी योगी येथे आला आहे. आपल्याला माहितीच आहे की, परदेशात कोणी योगी आला आहे असे कळले की, लोक लगेच त्याच्या मागे लागतात. सरदारजीही आपल्या मुलीला घेऊन या साधू महाराजांपाशी आले. बाहेर एक माणूस बसला होता. सरदारजींनी त्याला विचारले की, स्वामीजी आत आहेत का? त्याने सांगितले की, होय आहेत. सरदारजींनी त्या माणसास सांगितले की, आपण स्वामीजींना जाऊन सांगा की, मला भेटायचे आहे. तो माणूस आत गेला, त्याने विचारपूस केली आणि बाहेर येऊन सरदारजीला सांगितले की, आपण आत जाऊ शकता. सरदारजी आपल्या मुलीला घेऊन आत जातात न जातात तोच त्या साधूने सहजपणे एक वाक्य उच्चारले. सरदारजी ते वाक्य ऐकून अचंबित झाले. विचार करू लागले की, अजून मी यांच्याशी बोलायला सुरुवातही केली नाही आणि हे माझ्या मनातले ओळखून असे कसे काय बोलले. त्यांनी साधूंना विचारले, ''काय, आपण आता जे वाक्य उच्चारले ते माझ्यासाठीच आहे का? कारण मी माझ्या या मुलीला घेऊन आपल्याकडे आलो आहे. ही माझी मुलगी आजारी आहे. तिला बरे करण्याकरता आपल्याला काही विचारण्यासाठी मी आलो आहे.'' साधू म्हणाले, ''ठीक आहे. ती बरी होईल. जो उपाय सांगितला तो करा.'' सरदारजींचा विश्वास बसला. साधू महाराजांनी जो उपाय सांगितला त्या उपायाने त्या मुलीची भयंकर डोकेदुखी दोन-तीन दिवसातच नाहीशी झाली.
 
साधू महाराजांनी काय सांगितले होते? त्या मुलीने उंच टाचेचे बूट घातले होते. साधूने सांगितले होते की, तिने जे बूट घातले आहेत त्या बुटाच्या टाचा कमी करा. सरदारजीने साधूवर विश्वास ठेवून तसे केले. सरदारजी बाजारात गेले आणि साधा बूट घेऊन आले.
 
साधू महाराज मोठे अंतर्ज्ञानी आहेत आणि ते चमत्कार करतात अशी चर्चा कर्णोपकर्णी सर्वत्र पसरली. मग सांगायचे कामच उरले नाही. साधू महाराजांच्या प्रवचनाला हीऽ गर्दी होऊ लागली.
 
सांगण्याचे तात्पर्य हे की, जेथे शक्ती असते तेथे जग झुकते. तेथेच यश मिळते, सन्मान मिळतो, यात संदेह नाही. जगात म्हणूनच केवळ शरीर आणि मनच नव्हे तर बुध्दीही समर्थ बनली पाहिजे.