उलटी गंगा
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझे एक परिचित संन्यासी साधू परदेशात जाऊन आले होते. अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमधील निरनिराळया देशात ते गेले होते. त्यांनी मला सांगितले की, तेथील लोकांच्या जीवनात एक फार मोठे परिवर्तन होऊ लागलेले आहे. ते संपत्ती आणि सुखोपभोगाच्या साधनांना विटले आहेत. त्याविषयी त्यांच्या मनात रुची राहिलेली नाही. त्यामुळे ते भारताकडे मोठया आशेने पाहू लागलेले आहेत.
 
हे संन्यासी मला सांगू लागले की, त्यांच्यात इतक्या वेगाने बदल होत आहे की, काही दिवसानंतर अशी स्थिती उत्पन्न होईल की, ते आपल्या भारतीय तत्त्वज्ञान आणि भक्तीच्या मार्गावर खूप पुढे जातील आणि आपण तोपर्यंत त्या सा¬या गोष्टी विसरून गेलेले असू. अशा स्थितीत आपल्यावर त्यांना असे म्हणण्याची पाळी येऊ नये की, बाबांनो, आम्ही तर सगळे विसरलो आणि आता आम्ही तुमच्या चरणांशी येऊन पडलो आहोत, आता तुम्हीच आम्हाला या संबंधी शिक्षण द्या.