सर्वत्र विजय प्राप्त होईल
श्रीगुरुजी (मराठी)   28-Mar-2018
आजकाल लोक माझ्या प्रकृतीविषयी फारच काळजी करीत असल्याचे दिसून येते. ठाण्याच्या बैठकीत पहिल्या दिवशी जेव्हा मी असे म्हटले की, संघकार्य हे आता तुम्हा सर्व लोकांना करावयाचे आहे. माझी तर त्यात आता काही साथ मिळू शकणार नाही. तेव्हा काही प्रमुख कार्यकर्ते मजजवळ आले आणि म्हणाले, आपण असे बोलावयास नको होते. मी म्हणालो, जे काही खरे होते ते मी सांगून टाकले. त्यानंतर पुन्हा या शरीराची क्षमता अतिशय वेगाने क्षीण होत गेली. इतकी क्षीण होईल असे मलासुध्दा वाटले नव्हते. शरीराची ही जी अवस्था झाली आहे ती तात्कालिक ठरेल आणि शरीर काही काम करू शकेल, अशी मी आशा करतो, आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि डॉ. थत्ते यांना मी सांगितले आहे की, सर्व संघशिक्षावर्गांना भेटी देण्याचे कार्यक्रम आखून घ्या; मग पुढे जे काही व्हावयाचे असेल ते पाहता येईल. कार्यक्रम आखून आपल्याजवळ तयार असावा. जाऊ शकलो तर ठीकच. न जाऊ शकलो तर सांगून टाकू की, नाही जमले. असे वाटते की, कार्यक्रम तयार झाला तर तो ठीक पार पाडता येईल. पाहू काय होते ते !
आपणा सर्वांना एका गोष्टीचा विचार करावयाचा आहे तो असा की, हा माणूस असला काय आणि नसला काय त्यामुळे संघटनेचे काही नुकसान होणार नाही, परंतु आपल्या देशाचा प्राचीन आणि आजकालचाही इतिहास असा आहे की, संस्था काही दिवस तर चांगल्या चालतात, परंतु मग आपसात काही मतभेद उत्पन्न होतात. तसे मतभेद कमीच असतात, व्यक्तिभेदच जास्त उत्पन्न होतात. लोक असे म्हणत असत की, काँग्रेससह सर्व संस्थांत फूट पडून त्या मोडल्या. केवळ जनसंघ हाच एक पक्ष असा आहे जो मोडला नाही, परंतु त्या पक्षाच्याही एका जुन्या कार्यकर्त्यास पक्षाबाहेर घालविण्याची पाळी आली याचा लोकांना मोठा आनंद झाला आहे. आता लोकांच्या मनात अशी आशा निर्माण झाली आहे की, जनसंघाचे कार्यकर्ते संघाशी संबंधित आहेत. त्यामुळे जनसंघात जी फूट पडली आहे तिचा परिणाम हळूहळू संघावरही होईल. याच आशेचा तंतू पकडून वृत्तपत्रांतून अशा वार्ता जुळवाजुळव करून पेरल्या जात आहेत की, सरसंघचालकाच्या पदाबाबत संघात खूप ओढाताण सुरू झालेली आहे. त्यांना अशी आशा वाटते की, संघातही कधी ना कधी फूट पडेलच.