राष्ट्र संकल्पनेचे स्वरूप

निरनिराळया देशांत, निरनिराळया काळात होऊन गेलेल्या थोर विचारवंतांनी राष्ट्राची कल्पना आपापल्या परीने स्पष्ट केली आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांतून व व्याख्यानांतून साररूपाने काही सरळ सोपे निष्कर्ष श्रीगुरूजींनी काढले आहेत. राष्ट्रसिध्द होण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक मानून एक व्याख्याही त्यांनी दिली आहे. त्या आवश्यक गोष्टी अशा -
1) शक्यतो नैसर्गिक भौगोलिक सीमांनी निश्चित झालेला एक सलग भूप्रदेश.
2) त्या विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या लोकांच्या मनात ही आपली मातृभूमी आहे, आपण या भूमीचे लेकरे आहोत, अशी प्रेमाची व आदराची भावना असली पाहिजे.
3) जीवनाचे समान आदर्श, एकच संस्कृती, समान भावभावना, समान आदर्श, समान निष्ठा आणि समान परंपरा यामुळे त्यांची एक जीवनपध्दती विकसित झालेली असली पाहिजे.
या निष्कर्षांनुसार राष्ट्राची व्याख्या श्रीगुरूजींनी सांगितली ती अशी -
''थोडक्यात म्हणजे, एखाद्या विशिष्ट भूभागावर त्या भूमीचे लेकरे म्हणून राहणाऱ्या आणि समान परंपरा व आकांक्षा, भूतकाळातील सुखदु:खांच्या अनुभवाच्या समान स्मृती, शत्रुमित्रत्वाच्या समान भावना आणि सर्वांचे हितसंबंध एकमेकांशी निगडित असलेले, अशा एकसंध जनसमुदायाला राष्ट्र म्हणावे.''
या सर्व निकषांवर - जे आधुनिक विद्वानांनीही मान्य केलेले आहेत - भारतात हिंदू समाज हाच केवळ उतरतो व अर्थात तोच येथे राष्ट्रस्वरूप असल्याचे श्रीगुरूजी ठामपणे सांगत. यासाठी इतिहास, जीवनपध्दती, आदर्श, समान संस्कार, भावना आदींची प्रचुर उदाहरणे देत. उपनिषदे, रामायण, महाभारत, संस्कृत साहित्य इत्यादीतून आधार प्रस्तुत करीत. त्या तपशिलात शिरणे या लेखाच्या मर्यादेत शक्य नाही. पण 'हिंदू राष्ट्र' म्हटले की कावरेबावरे होणाऱ्या महाभागांच्या एका प्रश्नाचे जे उत्तर श्रीगुरूजींनी दिले आहे, ते मात्र पाहणे आवश्यक आहे.