'त्यांचे' काय ?

प्रादेशिक राष्ट्रवादाचा आग्रह धरणारी, हिंदू राष्ट्र ही संकुचित, असहिष्णु, द्वेषपूर्ण व हिंदूंना न शोभणारी संकल्पना आहे, असे प्रतिपादन करणारी मंडळी अगदी 'जितं मया' या भावनेने असा प्रश्न विचारतात की, ''अहो, तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता, तर या देशात जे 13 कोटी मुसलमान व 2 कोटी इसाई आहेत, त्यांचे काय करणार ? त्यांना समुद्रात नेऊन बुडविणार की त्यांची कत्तल उडविणार ? त्यांचा वेगळा उपासना पंथ असला, म्हणून ते परके कसे ठरतात ?''
काहीसा गोंधळ व हिंदूंचा बुध्दिभेद करणाऱ्या या प्रश्नाचे मोठे सडेतोड उत्तर श्रीगुरूजींनी देऊन टाकले आहे. ते उत्तर त्यांच्याच शब्दात असे -
''एखाद्या विशिष्ट भूप्रदेशात एखादी व्यक्ती जन्माला आली वा वाढली, तरी केवळ तेवढयामुळेच तिला त्या भूप्रदेशाचे राष्ट्रीयत्व प्राप्त होत नाही. त्याच्याशी सुसंगत अशी त्या व्यक्तीची मनोवृत्तीही असली पाहिजे. मानसिक निष्ठा हीच खरे म्हणजे सर्व जगाने मान्य केलेली राष्ट्रीयत्वाची कसोटी आहे.''
''आपण संघाचे स्वयंसेवक अंतर्बाह्य हिंदू आहोत. त्यामुळे सर्वच पंथ आणि धर्मश्रध्दा याविषयी आपल्या मनात आदर आहे. इतर धर्ममतांविषयी असहिष्णु असणारा मनुष्य हिंदू असूच शकत नाही. परंतु आपल्यापुढे मुख्य प्रश्न हा आहे, की ज्या भूमीने त्यांना वाढवून मोठे केले, तिच्याशी ते कृतज्ञ आहेत काय ? खाल्ल्या मिठाला ते जागणारे आहेत काय ? आपण याच भूमीची व येथील परंपरेची लेकरे आहोत, तिची सेवा करणे हे आपले कर्तव्यच आहे, त्यातच आपल्या जीवनाची कृतकृत्यता आहे, असे त्यांना का वाटत नाही ? धर्मांतराबरोबरच राष्ट्राबद्दलचे त्यांचे प्रेम व भक्तीही नष्ट झाली आहे.''
''हे केवळ एवढयावर थांबले नाही. या भूमीच्या शत्रुंशी त्यांची अंत:करणे एकरूप झाली आहेत. त्यांना अजूनही असे वाटते की, स्वत:चे राज्य स्थापन करण्यासाठी ते येथे आले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, हे केवळ धर्ममतात परिवर्तन नसून त्यांच्या राष्ट्रीयत्वातही बदल झालेला आहे. आपल्या मातृराष्ट्राला संकटात सोडून शत्रूच्या गोटात सामील होणे हा राष्ट्रद्रोहच नव्हे काय ?''