स्वगृही या

या सर्व प्रकाराला श्रीगुरूजींनी 'धार्मिक गुलामी' असे म्हटले आहे व असे तळमळीने आवाहन केले आहे की, "त्यांनी परक्यांचे दास्य आणि वर्चस्व यांच्या खुणाही झुगारून द्याव्या आणि आपल्या पूर्वजांच्या निष्ठांचा व राष्ट्रीय जीवनाचा स्वीकार करावा. आपल्या समाजाची ही सर्व वाट चुकलेली लेकरे स्वगृही परतल्यावर आपण फार मोठा दीपोत्सव साजरा करू."
"आपण आपला पराक्रमवाद पुन्हा जागृत केला पाहिजे. शरणागती मार्गाचा त्याग केला पाहिजे. आपण निस्संदिग्ध शब्दांत सांगितले पाहिजे की, जो जो अहिंदू येथे राहात असेल, त्याला एक राष्ट्रधर्म (राष्ट्रीय उत्तरदायित्व) आहे, एक समाजधर्म (समाजविषयक कर्तव्य) आहे, एक कालधर्म (पूर्वजांविषयीचे कर्तव्य) आहे. त्याने त्याचे पालन केले पाहिजे. त्याला फक्त आपला व्यक्तिधर्म म्हणजे स्वत:चा उपासनामार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा प्रकारे व्यक्तिगत जीवनाच्या काही भागांपुरते त्याला स्वातंत्र्य आहे. परंतु बाकी सर्व बाबतीत त्याने राष्ट्रीय प्रवाहाशी एकरून होऊन राहिले पाहिजे. खरे एकीकरण ते हेच"
हा उतारा जरा विस्तृत स्वरूपात अशासाठी दिला आहे की, मुसलमान व ख्रिस्ती समाजांविषयी, राष्ट्रीयत्वाच्या संदर्भात, श्रीगुरूजींना नेमके काय म्हणावयाचे होते, याविषयी कोणाच्या मनात संभ्रम राहू नये. "अगदी तर्कसंगत, व्यवहार्य आणि योग्य दृष्टिकोन कोणता असेल, तर तो हाच आहे," असे श्रीगुरूजींचे प्रतिपादन होते. 'राष्ट्रीय एकात्मता', 'भावनिक एकात्मता' आदी शब्दप्रयोग राजकीय पुढारी सर्रास करतात. या आशयासंबंधी श्रीगुरूजींचे सुस्पष्ट प्रतिपादन असे: 'ज्यावर सर्वांनी एकत्र यावयाचे ती समान भावना, तो समान आधार कोणता ? आपल्या राष्ट्रीय जीवनाला संघटित, पुनरूज्जीवित, वैभवसंपन्न करणारे ते मूलस्त्रोत कोणते आहेत ?'