भारताची नियती

प्रश्न असा आहे की, शतकानुशतके जीवघेणे आघात होऊनही हा समाज व हे राष्ट्र काळावर मात करून आजही जिवंत कसे राहिले, का राहिले ? या प्रश्नावर श्रीगुरूजींचे उत्तरे असे की, हे राष्ट्र जगले व जगेल कारण परमेश्वराचीच ती योजना आहे. हे आपले राष्ट्र स्वत:पुरते व स्वत:साठी नाही. जगात हिंदू राष्ट्राचे एक जीवनकार्य आहे. या राष्ट्राचे एक World Mission आहे. ते हे, की जग कितीही उन्मार्गगामी झाले तरी त्याला पुन:पुन्हा आध्यात्मिक ज्ञानाची, मानवधर्माची भूक निर्माण होणारच आहे. अमृतत्त्वाची ओढ लागणारच आहे. या पवित्र भूमीच्या कुशीतून अशा 'स्वदेशोभुवनत्रय:' वृत्तीचे महात्मे सत जन्म घेत राहतील, की जे जगाची ही भूक शांत करतील. ते ज्ञानभांडार व अनुभूतीचे शास्त्र यांची जननी भारतभूमी आहे. हिंदूत्व आणि मानवता या वेगळया गोष्टी नाहीतच. या राष्ट्राच्या ईश्वरदत्त जीवनकार्याची पूर्ती भारतीय जीवनाच्या श्रेष्ठ गुणवत्तेवर आणि प्रभावशालित्वावर अवलंबून राहील. स्वाभिमानशून्य, नि:सत्त्व आणि दुबळया राष्ट्राला कोण विचारतो. भारतमातेला जगाच्या गुरूस्थानी आरूढ करावयाचे याचा अर्थ हाच आहे. हे mission ही भारताची नियती आहे.