आजकाल देशात आपापसात विरोध करणारी आंदोलने चालू आहेत. एका प्रांतात हिंदीच्या विरोधात आंदोलन चालू होते. त्याचवेळी मी तेथे पोचलो. आंदोलनाच्या एका प्रमुख व्यक्तीला मी विचारले की, या आंदोलनाने तुम्हाला लाभ कोणता? ते काही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तेव्हा मी त्यांना समजावून सांगितले की, जरा गांभीर्याने विचार करा. आज इंग्रजीचा बोलबाला दिसतो. पण दिवा विझण्यापूर्वी जसा मोठा होतो तशी आजची इंग्रजीची स्थिती आहे. इंग्रजी भाषा ज्या वेगाने आपल्या देशात पसरत आहे ते सांगणेही मोठी अवघड गोष्ट! मी स्वत: इंग्रजीचा फार मोठा विद्वान नाही. पण तरीही मी ओळखून आहे की, इंग्रजीचा तोरा मिरवणारे जे लोक आहेत त्यांचा इंग्रजीचा अभ्यास माझ्यापेक्षा कमीच आहे. मला स्पष्टपणे दिसतंय की, कोणी कितीही प्रयत्न केला, तरी इंग्रजी आता या देशात फार काळ राहू शकत नाही. विचार केला पाहिजे की, आता आपसातील व्यवहारासाठी भाषा कोणती असावी? असे दिसते की, लोकांमध्ये विचारांचे, व्यवहाराचे आदान प्रदान करण्यासाठी सामान्य भाषेच्या नात्याने जी सुगम आहे आणि फार पूर्वीपासून ह्या रूपात जिचा प्रयोग थोडयाफार प्रमाणात देशात होत आला आहे अशी भाषा म्हणजे हिंदी. आपल्यापैकी कोणी जर असे म्हणत असेल की, मी स्वत: हिंदी भाषिक असल्यामुळे असे म्हणतो तर ते खरे नव्हे. माझी मातृभाषा हिंदी नसून मराठी आहे. त्यामुळे कोणाचा पक्षपात करून बोलण्याचे मला कारण नाही. मी हिंदीचे वास्तविकपणे समर्थन करतो. अशा स्थितीत जर आपण आपल्या मुलांना आज प्रचलित असलेल्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत शिक्षण दिले, तर त्यांना आपण आपल्या प्रदेशातच कामधंदा देऊ शकू याची खात्री तुम्हाला वाटते का? त्यांना बाहेर कोठे जायला लागता कामा नये. ते सद़्गृहस्थ म्हणाले की, नाही, असे तर नाही होऊ शकत. त्यावर मी म्हणालो की, त्या प्रदेशात जर हिंदीत कामकाज चालत असेल तर तेथे ही मुले काय करतील? कमीत कमी आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याचा तरी विचार केला पाहिजे. ह्यावर ते सद़्गृहस्थ मोठया आवेशाने म्हणाले, ''आम्हाला कुणाची पर्वा नाही, आम्ही दुस¬या देशात जाऊन राहू.'' मी शांत चित्ताने त्यांना सांगितले की, असे म्हणणे सोपे आहे. आजकाल 'ब्रेन ड्रेन' शब्द प्रचलित आहे. याचा अर्थ असा आहे की, आपल्या देशातील बुध्दिमान लोक परदेशात जाऊन तेथे स्थायिक होतात. परंतु प्रश्न हा आहे की, ते तेथे किती दिवस राहू शकतील? ब्रह्मदेश जो भगवान बुध्दाला मानत असल्यामुळे आपल्याच धर्म-संस्कृतीशी निगडित आहे, तेथूनही पिढयान्-पिढया राहणा¬या भारतीय लोकांना हाकलून दिले गेले. सिंहल - द्वीपातूनही (श्रीलंका) आपल्या लोकांना हाकलून देत आहेत. आपल्या पूर्वेला आणि पश्चिमेला जे पाकिस्तान नावाचे शत्रुराष्ट्र अस्तित्वात आले आहे तेथील हिंदू तर पूर्णपणे नष्ट झाला आहे. यामुळे शेजारी पाजारी जाण्याची शक्यता नाहीच. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात जाऊन राहता येईल. परंतु त्या देशांचे आज जे धोरण आहे त्यानुसार तेथे बाहेरच्या लोकांना गुलामाप्रमाणे राहावे लागेल. तेथे स्वाभिमानाने राहणे कठीणच आहे.
पुन्हा मी त्यांना विचारले की, सर्व देशात हे असे चालले आहे. अशा स्थितीत जर तेथे स्वाभिमानाने राहू दिले नाही, तर आपण काय कराल? या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
तात्पर्य हे की, आपल्याला या जगात जर स्वाभिमानाने रहायचे असेल, तर आपल्या समाजाच्या सामर्थ्याच्या भरवंशावरच आपण राहू शकतो. आसेतु - हिमालय पसरलेल्या या हिंदू समाजात आत्मीयतेचे संबंध प्रस्थापित झाले तरच व्यक्तिगत, कौटुंबिक सर्व प्रकारची सुरक्षितता आणि सन्मान आपल्याला प्राप्त होऊ शकेल.