गोस्वामी तुलसीदासांच्या 'रामचरितमानसा'वर माझे फार मोठे प्रेम आहे. त्याचे कारण, मोगलांच्या अत्याचारांमुळे असे वाटत होते की, आता हिंदूंचा विनाश होईल, तेव्हा लोकांचा धर्म आणि संस्कृतीच्या उदार तत्त्वांवर विश्वास राहिला नव्हता, अशा संकट काळात या ग्रंथाने आस्था आणि विश्वास दोन्ही टिकवले. समाजात विश्वास उत्पन्न करण्याचे फार मोठे बहुमोल कार्य या ग्रंथाने केले आणि हिंदू जीवन वाचवले.
माझी मातृभाषा हिंदी नाही. पण जेव्हा मी माध्यमिक विद्यालयात शिकत होतो, माझ्या हिंदीच्या पुस्तकात रामचरितमानसाचे काही वेचे होते. ते वेचे मला खूप आवडले. मी संपूर्ण रामचरितमानस वाचलेले आहे. त्याचे अनेक वेचे मी मुखोद़्गत केले.
परंतु आजकालच्या कॉलेज विद्यार्थ्यांना या श्रेष्ठ ग्रंथाची ओळखही नाही. एकदा मी उत्तर प्रदेशच्या दौ¬यावर गेलो होतो. त्या वेळी तेथे 'हिंदी चाहिये अंग्रेजी नही' आंदोलन चालले होते. कॉलेज विद्यार्थ्यांच्या बैठकीत मी विचारले की, गावोगावी ज्याचा नित्य पाठ चालतो ते गोस्वामी तुलसीदासांचे रामचरितमानस किती जणांनी वाचले आहे? केवळ पंधरा टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही ते वाचले आहे.
तेव्हा मी त्यांना म्हणालो की, असले कसले हे हिंदी प्रेम? इंग्रजी विरोध, हिंदी प्रेम बनू शकत नाही.