जसा वेष तसे मन
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
आपले एक वृध्द स्वयंसेवक आहेत. एका क्षेत्राचे संघचालक आहेत. ते ज्या नगरात राहतात, त्या नगरात एकदा आपला संघ शिक्षा वर्ग झाला होता. ते सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस वर्गात उपस्थित असत. सकाळी हाफ पँटमध्ये आणि संध्याकाळी पूर्ण गणवेषात. त्यांचे वय किती असेल? कल्पना करा की, जेव्हा मी प्राथमिक शाळेतून इंग्रजी शाळेत गेलो तेव्हा ते त्या काळचे यशस्वी वकील होते. ते किती मोठे आहेत याची आपण कल्पना करू शकता. असे ते वृध्द! तरीही ते सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेस संघस्थानावर उपस्थित रहात. सर्व वर्गातून माझा प्रवास होता, त्याही वर्गात मी गेलो. त्या वर्गात मी त्यांना म्हटले, ''आपल्याला सर्वाधिकारी म्हणून जे काम दिले आहे त्यात आपल्याला काही कष्ट तर होत नाहीत ना!'' त्यांनी म्हटले, ''कष्ट बिलकुल नाहीत.'' मी म्हणालो, ''आपले वय झालेले आहे शरीरात कुठे त्रासही आहे.'' ते म्हणाले, ''हे खरे आहे की वय झालेले आहे, शरीरात त्रासही आहे; परंतु जेव्हा मी हाफ पँट घालतो तेव्हा वाटते की, मी तरुण आहे आणि मग मी मोठया आनंदाने काम करतो.'' ते मोठे विनोदी आहेत. ते म्हणाले, ''महाभारतात ज्या युध्दाचे वर्णन आहे त्या युध्दाच्या सुरुवातीला अर्जुन म्हणाला की, मी लढणार नाही. जर त्या वेळी भगवान श्रीकृष्णाला हाफ पँट काय आहे हे माहीत असते, तर त्याला अठरा अध्यायांची गीता सांगण्याची आवश्यकताच पडली नसती. अर्जुनाला जर हाफपँट घालायला दिली असती, तर लगेच त्याने म्हटले असते की, आता मी लढतो.'' म्हणजे याचा अर्थ असा की, आपण जो वेष घालतो त्या वेषामुळे जीवनात एक प्रकारचे पौरुष येते, उत्साह येतो, तारुण्याचा अनुभव येतो.
 
त्यामुळे जसा वेष असेल, त्याप्रमाणे मनात तशा प्रकारची भावना जागृत होईल.