श्रीरामकृष्ण आश्रमाचे मुख्य केंद्र बेलूर तसेच अन्य आश्रम केंद्रांशी माझा जवळून संबंध राहिलेला आहे. एक सांगण्यासारखे उदाहरण आहे. एकदा आम्ही नागपूरमधील श्रीरामकृष्ण आश्रमात स्वामी माधवानंदांना भेटावयास गेलो होतो. स्वामी माधवानंद नंतर कधीतरी काही काळासाठी श्रीरामकृष्ण आश्रमाचे अध्यक्ष राहिले होते. त्यांना भेटून आम्ही निघालो. एवढयात ते म्हणाले की, प्रसाद घेऊन जा. त्यांनी मंदिरातून प्रसाद मागवला. त्यांच्याच खोलीत आम्ही प्रसाद घेतला.
नंतर मी म्हणालो की, हात धुऊन येतो. ते म्हणाले, ''माझा कमंडलु तेथे ठेवलेला आहे. त्यातले थोडेसे पाणी घ्या आणि व्हरांडयात हात धुवा''.
मी म्हणालो, ''आपण फार मोठे साधू आहात. मी आपला कमंडलु कसा घेऊ?''
ते म्हणाले, ''अरे तू म्हणतोस काय? तू तर आमच्यासारखाच सीनियर मेंबर आहेस. आम्ही गेल्यावर तुझाच तर नंबर आहे.''
अशा प्रकारचे अत्यंत प्रेमाचे, स्नेहाचे संबंध असल्यामुळेच मी त्यांच्याशी इतक्या मनमोकळेपणाने गप्पागोष्टी करू शकत असे.