प्रवासात एके ठिकाणी मी थांबलो होतो. एका मुलीने आपल्या आईला 'मम्मी' म्हणून हाक मारली.
मी त्या भोळयाभाबडया मुलीला विचारले, ''मम्मी'चा काय अर्थ होतो?'' तिने आईकडे बोट दाखवून म्हटले, ''दिसत नाही ती कोण आहे?'' '''ममी' चा हा अर्थ नाही होत.'' ''मग काय होतो?'' ''इजिप्त नावाचा एक देश आहे. तेथे प्राचीन काळच्या राजांची मोठमोठी थडगी आहेत. त्यांना पिरॅमिड म्हणतात. त्या पिरॅमिडमध्ये प्राचीन राजांची प्रेते ठेवलेली आहेत. ती टिकवण्यासाठी त्यात मसाले भरलेले आहेत. त्या प्रेतांकडे पाहिल्यावर वाटते की ती झोपलेली जिवंत माणसे आहेत अशा या प्रेतांना तिकडे 'मम्मी' म्हणतात.'' त्या बिचा¬या मुलीपुढे प्रश्न पडला की, या आपल्या जिवंत प्रसन्न आईला 'मम्मी' का म्हणायचं?
आपल्या संस्कृतीपासून तुटून गेलेल्या या शब्दांचा मुलांच्या कोमल अंत:करणावर काय परिणाम होत असेल? असे हे शब्द, त्यांचा अर्थ नीट समजून न घेता केवळ विदेशी नक्कल म्हणून घराघरातून स्वीकारले गेले आहेत.